सौ. सुचित्रा पवार

??

☆ माझे माहेर… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

‘पहिल्याच सरीचा ओला सुवास आला

माहेरच्या दिसांचा, क्षण एक भास झाला…’

होय,आषाढाचे सावळे गच्च मेघ आकाशात दाटी करतात,भिरभिर गार गार वारा चहूबाजूस भिरभिरू लागतो आणि मग मन आपोआपच पंढरीकडे धावू लागते. 

माझे माहेर पंढरी ।  आहे भीवरेच्या तिरी ।।

आषाढ लागताच माहेरची ओढ लागून रहाते.डोळ्यांपुढं पंढरीची वाट दिसू लागते . तन मनात टाळ मृदंग दुमदुमत रहातो अन सुरू होते माहेरी जाण्याची लगबग ! 

सामान ..सुमान ..आवराआवरी ..अहं ! माहेराला जाताना मुळी चिंता कसली? तिथं काळजी घ्यायला आहेत ना मायेची माणसे !आपण फक्त तिथवर जायचं बस्स ! संसारातल्या चिंता,कटकटी ,ताण तणावापासून मुक्त होऊन पुन्हा नव्यानं आव्हान स्वीकारायला सज्ज व्हायला माहेरात थोडे दिवस जावेच नै का ?

मोह मायेपासून थोडे दिवस का होईना अलिप्त व्हावं–संसाराच्या चिंता त्या जगंनीयंत्या विठू माऊलीच्या पायी वहायला…तो घेईल ना आपली काळजी, मग कशाला व्यर्थ चिंता ?आपण फक्त निश्चिन्त मनाने सगळं जिथल्या तिथं टाकून माहेराची वाट चालू लागायची. त्याला डोळे भरून पहाण्यासाठी, त्याला हृदयात जपण्यासाठी,अवघा देह त्याच्या त्या सावळ्या रुपात एकवटण्यासाठी !

एक पोत्याची खोळ , डोईवर तुळस ,चारदोन मोजके आवश्यक कपडे न टाळ– बस्स ! पंढरीचा प्रवास सुरु होतो –वाऱ्याच्या चिपळ्या दुतर्फा पिकांतून ,झाडाच्या पानातून वाजत रहातात—‘ जय जय रामकृष्ण हरी…’ त्यांना सुद्धा वर्षोनवर्षीच्या या जयघोषाची जणू सवय जडलीय.वारकरी चालू लागले की मग झाडांना ,पशु पक्ष्यान्नासुद्धा  त्या तालातच डुलावं ,झुलावं आणि गावं वाटू लागतं .भुरभुर पावसात आनंदाने चिंब होऊन ती सुद्धा विठुरायाशी एकरूप होतात. तहान भूक हरपून पावलं फक्त चालत रहातात ..नामघोष अंतर्मनी निनादत…तू कोण ? मी कोण? कुठला  ? नाव ? गाव ?– स्व विसरून त्या पंढरीच्या वाटेवरील गर्दीतला एक ठिपका ! पाय दुखतात,सुजतात पण पर्वा कसली? चालत रहायचं फक्त. क्षण एक विसावा घ्यावा, एकमेकांचा हालहवाल पुसावा अन झपझप आनंदाने चालू लागावं पाऊस वाऱ्याला झेलत.

माऊली ..माऊली ..येते ग्यानबा तुक्याची पालखी ..अन तल्लीन होतात सारीच गात्रे .. नुरते भान देहाचे मग काही … ओथंबते चिंब चिंब मन भक्ती रसात . मग पावलं चालत नाहीत तर मन चालत रहातं, पीस होऊन तरंगत रहातं  आभाळभर.

टाळांचा आवाज गगनाला भिडतो ,मृदंग खोल खोल काळजाला भिडतो, आणि माहेर  जवळ आल्याची ग्वाही देतो.

अवघे गरजे पंढरपूर । चालला नामाचा गजर..।।

पंढरपुरात घरंगळत घरंगळत कधी दाखल होतो कळतच नाही. चंद्रभागेच्या त्या वाळवंटात जिथं तिथं विठू हसतहसत बाहू पसरून आलिंगन देत रहातो सगळ्यांना आणि क्षेम विचारत रहातो, “ फार त्रास नाही नाझाला येताना ? सर्वजण आलात ना व्यवस्थित ? पाठीमागे नाही ना उरले कोणी? “

गार गार वाऱ्यात रात्री  विठूच्या मायेची सावळी उबदार घोंगडी अलगद सगळ्या लेकरांना कुशीत घेते. शांत शांत सुखाची झोप प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाईच्या कुशीत..कशाला हवी मऊ मऊ पिसाची गादी ,उशी अन उबदार दुलई ? आभाळाच्या मंडपाखाली सर्व भेदाभेद मिटून जातात. गरीब-श्रीमंत,उच्च -नीच ,लहान- मोठा…सगळे एकजात एकसारखे !

काकड आरती ,भजन कीर्तन ,नामसंकीर्तन– पावलं मन देह थिरकू लागतो तालासुरात …आनंदाचा पूर ओसंडून वहात रहातो मनामनातून पंढरपुरात. अबीर बुक्का,ओल्या तुळशीमाळेचा  सुगंध आसमंतात दरवळू लागतो. अवघा देह पंढरपूर होतो.

सावळे सुंदर …रूप मनोहर

राहो निरंतर हृदयी माझे….. 

झुंबड उडते दर्शनाला ….निमिषार्ध एक चरणावर डोकं ठेवून मागणं  मागायला ..पण काय बरं मागायच होतं ?

मागणे न काही सांगण्यास आलो

आम्ही विठ्ठलाच्या भजनात न्हालो

आत्तापर्यंत इतकी पायपीट केली ती काही मागण्यासाठी ?छे ! फक्त त्याचं रूप डोळे भरून साठवायला ..आणि तो क्षण येतो ..निमिषार्धात आपलं डोकं चरणांवर विसावतं  अन फक्त ‘ सुखी ठेव सगळ्यांना ‘ अशी विश्वकल्याण आणि विश्वसुखाची याचना होते, कारण मीपण मागेच कुठेतरी गळून पडते. नेत्री अश्रुधारा वाहू लागतात. सोडावे वाटत नाहीत ते चरण ..तरी सोडावे लागतात. गर्दीत पुन्हा कुणीतरी मागे खेचते अन पुन्हा एक जडभार ठिपका घरंगळत घरंगळत जातो वैष्णवांच्या गर्दीत.अणू रेणूत विठ्ठल साठवून.

कुंकू ,अबीर ,प्रसाद, लाखेच्या बांगड्या …आठवत रहातात माहेराला येताना पाय धरलेल्यांच्या मागण्या आणि सुरू होतो परतीचा प्रवास…नको वाटत असतो  तो प्रपंचाचा भार ,पण जावेच लागते माघारी, निदान उपकारापुरता तरी तो पेलण्यासाठी ..जड जड पावलांनी आणि अंतःकरणाने …काहीतरी विसरलेय, चुकलंय ही अनामिक हुरहूर मनात घेऊन …… 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments