डॉ. सोनिया कस्तुरे
☆ पंढरीच्या वारी निमित्ताने… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
काय असेल विठोबाकडे ? इतकी का धाव या माऊलीच्या भेटीसाठी ? पाडुरंग भेटल्यावर समाधानी का होतात हे भक्त ? ही भक्ती खरी असते का ?
वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत का वाटते ? असे अनेक प्रश्न लहानपणी पडायचे.. आई म्हणायची
सखू निघाली पंढरपूरा
येशीपासूनी आली घरा !
घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखं दुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तल्लीन होतात.
” पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय ! “
हा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मिणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्यासारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.
माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दुसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडिलांना संकष्टी सुद्धा करू द्यायची नाही. फक्त एकादशी करायची. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होतं, पण आम्हीही वेगवेगळ्या पदार्थांच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरे केले जायचे. आईने सही करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. पण सगळे अभंग तोंडपाठ. तिचं बालपण कर्नाटकात गेलेलं. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडिओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थित करेल हा तिचा विश्वास होता. वडील नोकरीनिमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ।
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे ।।
तुकोबांच्या अभंगात ” आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे ” होऊन जगायची…
तुकोबांच्या अभंगांनी तिला नवे विचार मिळाले. तिने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला दिसले नाहीत. जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला तोच आपल्याला बळ देईल असे तिला वाटायचे..
सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी
देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी –
हे तिचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे, ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र तिला माहित नव्हतं, पण जगणं माहित होतं. सगळी सुखंदुःखं तुळशीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती. याचं मला राहून राहून आज आश्चर्य वाटतं. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिली संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली कामंसुद्धा ती न कंटाळता आनंदाने करायची. ” कांदा, मुळा,भाजी अवघी विठाई माझी.” म्हणत काम चालू असायचं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा हे गाणं ती नेहमी गुणगुणायची–
कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो ।
हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो ।।
बहिणाबाईची कविता – “ अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर “ –आईला माहीत होती. रेडिओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घातली तर विठोबा आपल्यालाही नक्की मदतीला येईल.
एकविसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नसे. असे होणे शक्य नाही असे वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसांमागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येतात. यात स्त्रियांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची opd , hospitals तुडुंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ संख्येने तसे खूप कमी आहेत. माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे… आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणं गरजेचं आहे. त्यांना बोलतं करणं, त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेण्याची गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच आहे. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थित होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे…!
तू नाहीस हे माहित आहे तरीही—– भेटी लागी जीवा | लागलीसे आस ||
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈