श्रीमती माया सुरेश महाजन
☆ मनमंजुषेतून ☆ नमस्कार मंडळी ☆ श्रीमती माया सुरेश महाजन ☆
वाल्याकोळ्याची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. त्याने अयोग्य जीवनप्रणाली अंगिकारिली होती. परंतु जेव्हा त्याला त्याची जाणीव झाली तेव्हां त्याने प्रायश्चित्त घेतले. परिणामतः वाल्याचा एक महान ॠषि वाल्मिकी झाला. ही गोष्ट परत-परत ऐकताना एका गोष्टीची मला तीव्रतेने जाणीव झाली. ‘प्रायश्चित्त’! हे एव्हडे सोपे होते का? कि पाप करायचे-प्रायश्चित्त घ्यायचे आणि परत पुण्यवान् व्हायचे!नाही मंडळी!यात खरी विचार करण्याची आणि घेण्याची गोष्ट आहे ती म्हणजे- ‘चुकीची जाणीव होणे- पश्चात्ताप होणे आणि प्रायश्चित्त घेणे; म्हणजेच सुधारणा करणे. चुकीची पुनरावृत्ती न होऊ देणे-हेच खरे प्रायश्चित्त आहे.
आज या कोरोनाच्या धांदलीत ही गोष्ट आणि त्यातील स्व-सुधारणेची गोष्ट परत-परत डोके वर काढत आहे. तुम्ही म्हणाल काय संबंध? तर विचार करता असे लक्षात येते की चूक-जाणीव- पश्चात्ताप-प्रायश्चित्त -ही साखळीच माणसाला सुधारण्याच्या मार्गावर नेते आणि त्यायोगे प्रगती साधली जाते.
कोरोना भारतात प्रवेशला ही काही आपली चूक नाही. परंतु त्याचा फैलाव इतक्या वेगाने झाला , होतो आहे ही मात्र नक्कीच आपली चूक आहे. कारण आपल्यात स्वयंशिस्त, स्व-अनुशासन या गोष्टींची कमालीची कमतरता आहे. साध्या-साध्या गोष्टींतूनही ही कमतरता जाणवते. फक्त प्रशासनाला दोष देऊन काय ऊपयोग? प्रशासनाने काळजीपूर्वक आखलेल्या योजना कागदावर किती छान वाटतात !पण मग त्यांचे अपेक्षित परिणाम का दिसत नाहीत? तर ऊत्तर परत तेच आहे-स्वयंशिस्त नाही. शिस्त आपण तर पाळायलाच हवी, परंतु इतरांनाही पाळायला लावायला हवी. आज तर ‘ माझ्यापुरतेच ‘ पहाण्याचा अलिखीत नियमच झाला आहे जणूं!वेगाने पसरणार्या या महामारीचा आवेग एकट्या-दुकट्याला आवरणारा नाही. समूह-संसर्गाला समूहशक्तिच आटोक्यात आणु शकते. विलगीकरण हाच जर उपाय आहे तर तो तितक्याच प्रखरतेने पाळायलाच हवा. विलगीकरण हे आपले प्रायश्चित्त आहे. ते जितक्या काटेकोरपणे पाळले जाईल तितक्या लवकर वाल्याकोळ्याचे पाप नाहीसे होईल. प्रायश्चित्तातील कठोरताच शांत जीवनाचे फळ देईल.
म्हणूनच स्वयंशिस्तीचा झेंडा फडकवायला हवा. स्वयंशिस्त हीकाही आताचीच गरज आहे असेही नाही. सदा सर्वदा सदाचारी समाज घडविण्याची ती एक गुरूकिल्ली आहे किंवा व्यवहारी भाषेत बोलायचे यर असे म्हणता येइल की काही दिल्याशिवाय काही मिळत नसते. म्हणूनच स्वयंशिस्त पाळा, म्हणजेच स्व-संतुलन राखा तरच प्रगती होइल. प्रत्येक गोष्ट जशी मला हवी तशीच ती दुसर्यालाही हवी हे ध्यानात घेतले पाहिजे. माझे सुख मिळवण्यासाठी मी इतरांच्या सुखाला पायदळी तुडवू नये. ‘स्व’ ला अनुशासित ठेवा तरच निरोगी , सभ्य, स्वच्छ, सदाचारी समाज निर्माण होईल.
© सुश्री माया सुरेश महाजन
मो.-९८५०५६६४४२
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
या “करोना” च्या संर्दभात अापण केलेली सूचना “स्वयंशिस्त” अगदीयोग्य अााहे.