? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-2 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆

(हा विचारही त्यांच्या हळव्या कविमनाला सहन झाला नव्हता…)इथून पुढे —-

या सगळ्या प्रसंगातून एका सुंदर बालगीताचा जन्म झाला…. ते बालगीत असे होते….

आल गट्टी –गाल गट्टी

सोन्याची गट्टी फू…

तुला मी खेळात घेणार नाही

जेम गोळ्या देणार नाही 

आलास तर घेईन गालगुच्चा 

अंगावर सोडीन भू….

                     

पं गाडी, कुक गाडी, 

मामाघरची हम्मा गाडी

आम्ही सगळे भूर जाऊ

एकटाच बस जा तू …..   

                        

पप्पू, बिंटी, वेदा, राणी

आम्ही खेळू छप्पा पाणी 

तूच एकटा बाथरूममध्ये 

रडवे डोळे धू……

किती गोड बालगीत आहे हे…. सुमित्र लहानपणी बोबडे बोलायचा. त्यामुळे ‘सोन्याशी’ न म्हणता पपांनी लाडिकपणे ‘सोन्याची’ असा शब्द वापरला आहे आणि नंतर आपली नाराजी व्यक्त केली आहे. खरे तर त्यांना त्याच्याशी करायचीय ‘कट्टी फू’, पण लाडक्या नातवाशी ‘गट्टी’ असल्यामुळे ‘कट्टी फू’ शब्द न वापरता ‘गट्टी फू’ असा शब्द वापरला आहे.

एकदा असेच रात्री जेवण झाल्यावर पपा सुमित्रचे बोट धरून पंचवटीच्या अंगणात शतपावली करत होते. समोर आकाशात चंद्र शोभून दिसत होता. त्याने पपांना प्रश्न विचारला, “हा चंदामामा कोण असतो? त्याला पाय नसतात. मग तो पळतो कसा? तो मामा असून घरी का येत नाही?” त्याला पपांनी योग्य ती उत्तरे दिली आणि दुसरे एक बालगीत जन्माला आले.

सांगा ना हो आजोबा 

कोण असतो चांदोबा? 

     

पंख नाहीत, पाय नाहीत 

फिरतो कसा कुणाला माहीत?

बघावे तेव्हा खुशीत असतो

हसत असतो वेडोबा.

    

आजी म्हणते ‘चंद्रदेव’ 

रागवेल तो, आधी जेव 

नाहीतर तुझा दूध भात 

पळवून नेतील बोकोबा.

‘चंदामामा’ म्हणते आई 

घरी कधी तो येत नाही 

असला कसला भाऊ तिचा हा 

उंचावरचा शहाणोबा.

बाबा म्हणतात “कळेल कळेल”

तुझे उत्तर तुला मिळेल 

मोठा हो, शाळा शिक 

आजच कसला खोळंबा?

अधांतरी हा फिरतो गोल

त्याला कसले देता मोल? 

चांद म्हणजे माती, दगड 

बडबड करिती दादोबा.

सुमित्र सहा सात महिन्याचा असताना बालकृष्णासारखा एक पाय ओढत घरभर रांगू लागला होता. पपा व्हरांड्यात लिहीत बसले असले तरी त्यांचे सुमित्रकडे बारीक लक्ष असायचे. तो रांगत रांगत व्हरांड्यात गेला की, पायऱ्यांवरून पडेल अशा भीतीने ते त्याला उचलून घेत आणि हाक मारत, “माया, हा इथे आलाय बघ रांगत रांगत…”, मग मी किंवा कोणीतरी त्याला उचलून आत आणून हॉलचे दार तो पपांना त्रास देऊ नये म्हणून लोटून घेत असू. तो बंद दारापर्यंत जाऊन परत मागे फिरत असे.

एकदा असेच त्याची अंघोळ झाल्यावर त्याचे अंग पुसून कपडे घालण्याआधी तो भराभर रांगत आपल्या आजोबांना भेटायला गेला. नुकत्याच वर्तमानपत्रात वाचलेल्या देशा- विदेशातल्या विचित्र घटना आणि त्याची कल्पनाही नसणारे निरागस, अजाणपणे वावरणारे त्यांचे नातवंडं याचा दुवा त्यांच्या मनात नकळत सांधला गेला आणि पपांच्या एका सुंदर कवितेने जन्म घेतला. कवितेचे नाव होते – ‘नागडे नातवंडं’ 

त्या कवितेचा भावार्थ असा होता….. आजकाल मानवतेची विटम्बना होईल इतकी समाजात नीतीमूल्ये ढासळत आहेत. एकत्र कुटुंबपद्धती मोडीत निघाली आहे. सत्यालाच न्याय मिळेल आणि त्याचा विजय होईल अशी शाश्वती राहिली नाही. जगावर स्वामित्व गाजवण्यासाठी सत्ताधारी देश तीव्र संघर्षापर्यंत पोहोचत आहेत. जगात ही जी विपरित परिस्थिती निर्माण होतेय, जी उलथापालथ होतेय – त्याची या भावी निरागस पिढीला काही कल्पना नाही. ती अजाणपणे, निरागसपणे, निश्चिन्तपणे जगात वावरते आहे. ‘नागडे नातवंडं’ म्हणजे ही निरागस, तिसरी पिढी! खूप सुंदर कविता आहे ती….

त्या कवितेतील काही ओळी अशा होत्या….

प्रलय जवळ आला आहे 

अनीतीचा कळस झाला आहे 

न्यायाचे नाव राहिलेले नाही 

सत्याला गाव राहिलेले नाही 

असे वाटते आहे की

आभाळातील नक्षत्रमाळ तुटून 

धरणीच्या मस्तकावर पडते आहे

माझे अजाण नातवंडं अंगणात 

नागड्याने बागडते आहे…

क्रमशः…

  – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर

संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments