मनमंजुषेतून
☆ “सोन्याची गट्टी फू”… भाग-3 – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
(माझे अजाण नातवंडं.. अंगणात नागड्याने बागडते आहे…) इथून पुढे —-
सुमित्र किती भाग्यवान! त्याच्यावर त्याच्या अलौकिक आजोबांनी दोन बालकविता लिहिल्या आणि एका गाजलेल्या कवितेचा उगम त्याच्या निरागसपणे रांगण्याने झाला. पपा त्याच्याकडे बघून नेहमी म्हणत, “हा माझा आजा बाबा बामण आहे. तोच पुढे माझे नाव चालवणार आहे.” खरंच पपा द्रष्टे होते…..
१९९८ साली सुमित्र उपकरणशास्त्रात द्विपदवीधर झाला. नंतर त्याने त्याच्या आवडीनुसार संगणकक्षेत्रात प्रवेश केला. आपल्या अलौकिक आजोबा गदिमांचे साहित्य नवीन तरुण पिढीपर्यंत पोहोचवायचे असेल तर ते त्यांच्या आवडीच्या संगणक इंटरनेट माध्यमात देणे आवश्यक आहे, हे त्याने ओळखले. १ ऑक्टोबर १९९८ रोजी गदिमांच्या जयंतीचे निमित्त साधून त्याने मराठी साहित्यातील लेखकाची पहिली मोठी वेबसाईट – गदिमा डॉट कॉम ही निर्माण केली. यासाठी त्याने रात्रंदिवस १८, १८ तास काम केले. काही दिवसातच महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्रातून बातमी झळकली…. “गीतरामायणाचे सूर आता इंटरनेटवर…..” जगभरातल्या मराठी रसिकांनी या वेबसाईटचे मनापासून, भरभरून स्वागत केले. जगभरात जिथे मराठी शब्द कानावरही पडत नव्हते, अशा परदेशस्थ मराठी बांधवांच्या घरा-घरातून गदिमा – बाबूजींचे गीतरामायण ऐकू येऊ लागले. ई मेल-वरूनही असंख्य प्रतिक्रिया सुमित्रला येऊ लागल्या. “आज तुमच्या साईटवर गीतरामायण ऐकले आणि मी इंग्रजी माध्यमातून शिकल्यामुळे काय गमावले हे लक्षात आले.” अशा असंख्य प्रतिक्रिया देशा परदेशातून नव्या पिढीकडून येऊ लागल्या.
या नंतर त्याने गीतरामायणावर स्वतंत्र वेबसाईटची निर्मिती, Sony Music च्या बरोबर ‘जोगीया’ हा music album केला व गदिमांच्या गीतरामायण, चित्रपट गीतांच्या संगणक सीडी/डीव्हीडी/पेन ड्राईव्हचीही निर्मितीही सुमित्रने केली. त्या वेळी आपल्या आजोबांची दुर्मिळ गाणीही मिळवून वेळप्रसंगी पैसे मोजूनही विकत घेतली. त्या वेळी जे पैसे त्याला मिळत, ते सर्व तो त्याच्या आजोबांच्या वेबसाईटसाठी खर्च करत असे.
अलीकडे आपल्या आजोबांच्या अनेक हृद्य आठवणी तो लिहून ‘ग.दि.माडगूळकर’ या फेसबुक पेजवर टाकतो. गदिमाप्रेमी रसिकांची त्याला छान दादही मिळते. गदिमा शताब्दीत त्याने महाराष्ट्र शासनाच्या मदतीने चार दिवसांचा स्वतंत्र गदिमा सांस्कृतिक महोत्सव, चित्रप्रदर्शन पुण्यात भरवले होते, ‘तो राजहंस एक’, ‘गदिमान्य’सारखे गदिमांच्या गाणी-आठवणींवर स्टेज शो त्याने केले, अलीकडेच मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘वसंत व्याख्यानमालेत’ त्याने गदिमांच्या आठवणी सांगून रसिकांना मुग्ध केले होते.
गीतरामायणाला ६० वर्षे पुरी झाल्यावर त्याने गीतरामायणाचे फेसबुक पेज निर्माण केले. तसेच आपल्या मोबाईलवर गीतरामायण ऐकता येईल, असे एक ऑडिओ ॲपही त्याने तयार केले होते. आपल्या अद्वितीय आजोबांची महती जाणून त्यांचे साहित्य तरुण पिढीपर्यंत पोहोचावे, यासाठी त्याची जी तळमळ आहे ती माझ्या मातृहृदयाला खूप सुखावते. गदिमांच्या स्मारकासाठी तो झटतो आहे, गेल्या वर्षी त्याने पुणे महानगरपालिकेकडून गदिमांचे स्मारक कोथरूड येथे मंजूरही करून घेतले, लवकरात लवकर ते आता मार्गी लागावे, राजकीय निष्क्रियतेमुळे फक्त सरकारी कागदावरच राहू नये, असे वाटते.
समृद्ध वारसा जतन करणे आणि तो परत आपल्या पुढच्या पिढीच्या हातात देणे आणि त्यांनी तो वसा आणखी पुढे नेणे, यासारखे दुसरे समाधान नाही.
पपा खूप वेळा खादी सिल्कचा झब्बा घालत असत. एकदा त्यांच्या झब्ब्यातले सिल्कचे कापड उरल्यावर ताईंनी मला दिले. मी त्यातून अगदी पपांसारखाच एक छोटासा सिल्कचा झब्बा सुमित्रला शिवून घेतला आणि छोटासा पांढरा पायजमा… तो ज्या दिवशी शिवून आला त्यादिवशी लगेच त्याने घातला.. अगदी आपल्या आजोबांसारखा झब्बा बघून तो आनंदाने नाचू लागला… पपांनाही त्याने त्याच्यासारखा झब्बा घालायला लावला.
मग त्या दिवशी संध्याकाळी पपांचे बोट धरून अंगणात त्याने त्यांच्यासह खूप फेऱ्या मारल्या. अजूनही सिल्कचा झब्बा घातलेले ते पाठमोरे पपा… आणि त्यांचे बोट धरून चालणारा, तसाच सिल्कचा झब्बा घातलेला सुमित्र… यांच्या पाठमोऱ्या आकृती मनावर ठसल्या आहेत….
अजूनही त्याने धरलेली आपल्या आजोबांची करांगुली त्याच्या हातात मला माझ्या अश्रूभरल्या डोळ्यांपुढे दिसते आहे….. ती अजूनही तशीच त्याच्या हातात आहे, असे मनोमन वाटते….
5 जून 2022! सुमित्र, तुझा वाढदिवस! खूप खूप मोठा हो, बाळा! आमच्या आशीर्वादाला काही शक्ती असतील तर त्या नेहमीच तुझ्या पाठीशी उभ्या राहतील. पपांच्या शब्दांत आशीर्वाद द्यायचा झाला तर…. “तव भाग्याला नुरोत कक्षा..”
तुझी आई,
— समाप्त —
लेखिका – सुश्री शीतल श्रीधर माडगूळकर
संग्राहिका – सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈