डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ गरज सरो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

याही गोष्टीला खूप खूप वर्षे झाली.

सहज मनात आले, काय करत असेल सरोज आता? माझ्या दवाखान्यात ते कुटुंब नेहमी येणारे.

मी त्यांची फॅमिली डॉक्टर होते. त्यांच्या तिघी मुली,औषधाला यायच्या. दिसायला देखण्या. कॉन्व्हेंटमध्ये अगदी हौसेने घातलेले आईवडिलांनी.

परिस्थितीही छानच होती त्यांची. आईवडील नोकरी करत आणि या बहिणी आपले शाळा-कॉलेज सांभाळून

घराकडेही लक्ष देत.

 त्यादिवशी रंजूताई, म्हणजे मुलींच्या आई सरोजला घेऊन आल्या. “ ताई, सरोजला खूप खोकला झालाय हो.

आज आठ दिवस खोकतेय आणि डॉक्टरकडे चल म्हटले तर नकोच म्हणतेय. जरा चांगले औषध द्या तिला.”

 मी म्हटले, “ सरोज, वजन किती वाढलंय ग तुझं .काही व्यायाम करतेस  की नाही? “ 

 बोलत बोलतच मी तिला टेबलावर घेतले. स्टेथोस्कोप  छातीवर ठेवायला  घेणार, तर मला भलतेच दृश्य दिसले.

सरोजचे पोट केवढे मोठे झाले होते. मी नीट तपासले. मला चक्क बाळाचे हृदयाचे ठोके ऐकू येत होते. सरोज जवळजवळ आठ महिन्यांची गर्भवती होती.

 तिने माझी नजर चुकवली.

“ सरोज,हे काय?? तुला कल्पना आहे ना,हे काय झालेय याची?”

  मी हात धुवून बाहेर आले. तिच्या आईला म्हटले, ” सरोजला काय झालंय याची कल्पना आहे का तुम्हाला? ”

“ नाही हो बाई. काही गंभीर झालंय का.” 

“ रंजूताई, तुम्हाला मुद्दाम करताय म्हणू, का समजत नाही म्हणू .सरोजला दिवस गेले आहेत,आणि तिला आठवा महिना चालू आहे.आता पूर्ण डिलिव्हरी करण्या शिवाय इलाजच नाही. मी म्हणते , सरळ लग्न का लावून देत नाही जो कोण असेल त्याच्याशी? ” 

त्या एकदम पांढऱ्याच पडल्या. “अहो काहीही काय. कारटे, अग काय बोलताहेत या डॉक्टर बाई? मला कसे समजले नाही? “ त्या जोरजोरात रडू लागल्या.

 सरोजने सांगितले, की  चार महिने training ला आलेला  आणि त्यांच्याच घरी राहिलेला तिचा सख्खा चुलतभाऊ होता तो.

“ अहो मग आता द्या लग्न लावून.” 

त्यावर ती म्हणाली, “ मी नाही लग्न करणार त्याच्याशी. दारुडा आहे तो.”

रंजूताई म्हणाल्या, “ अहो,सख्ख्या चुलत भावाशी कोणी लग्न करते का? आमच्या घरी हे चालणारच नाही.” 

“ अहो, मग  हे आधी नव्हते का समजत? आणि आठ महिने गप्प बसलीस तू, हो ग? आणि तुझ्या संमतीनेच ना हे घडले? रंजूताई, चूक तुमचीही आहे. लांबून सुद्धा समजते दिवस असलेली बाई. तुम्हाला समजू नये हो?

काय म्हणावे तुम्हा मायलेकींना…. “ मीच हादरून गेले होते हा प्रकार बघून.

त्या घरी गेल्या. दुसऱ्याच दिवशी सरोजचे वडील भेटायला आले. त्यानी विचारले, “ बाई, काय करू मी…. 

तोंड दाखवायला जागा नाही ठेवली हो .तुम्हीच मार्ग सांगा.” ते माझ्या पायाशी वाकले.

“ अहो असे काय करता ? आपण तिची डिलिव्हरी करूया. दुसरा उपायच नाही. मग ते बाळ नाईलाजाने एखाद्या चांगल्या संस्थेला देऊ. ते देतील दत्तक, चांगल्या आई बापाना. काय हो हे….  इथे लोकांना मूल होत नाही म्हणून  लोक रडतात. माझ्याचकडे मी रोज देतेय किती जोडप्याना  ट्रीटमेंट… आणि इथे बघा. काय देव तरी.” 

मी हताश होऊन बडबड केली. मला आश्चर्य वाटत होते, ‘कमाल आहे हो या मुलीची. काय केले असते हिने?

मी जर तपासून सांगितले नसते तर?’

  त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचे renovation चालले होते. म्हणून मी आमच्या नेहमीच्या डॉक्टरांकडे तिची  डिलिव्हरी करायचे ठरवले. माझ्या सरांना ही सगळी कल्पना मी देऊन ठेवलीच होती. पुढच्याच आठवड्यात त्यांचा फोन आला.“ तुझी सरोज पेशंट आली आहे. ये तू.”

 मी लगेचच त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. सरोजला चांगल्याच कळा येत होत्या. एवढ्या मरण यातना होत असतानाही ती हू का चू करत नव्हती.

 सरोज ने एका मुलाला जन्म दिला. आठ पौंडी मुलगा होता तो.

 तिने एक रुपयाचेही औषध,टॉनिक काहीही न घेतासुद्धा ते इतके सुदृढ मूल जन्माला आले होते.

  मी, आमचे डॉक्टर सर, त्यांच्या डॉक्टर मिसेस, सगळे हळहळलो.

 बाई म्हणाल्या, “ काय ग ही  देवाची  लीला तरी.  मूल व्हावे म्हणून दोन बायकांची  केवढी मोठी  precedure कालच केली आम्ही. त्या तळमळत आहेत,मूल मूल करत. सरोज, काय करून बसलीस बाई.”

सरोजने ते बाळ बघितले. त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, आणि म्हणाली, “ न्या त्याला. देऊन टाका.” 

   आम्ही सगळे थक्क झालो. तिच्या डोळ्यात पाण्याचा टिपूस नव्हता, की केलेल्या कृत्याचा पश्चाताप.

मीच अतिशय हळहळले. सरांना म्हटले की ‘ किती गोजिरवाणे बाळ आहे हो हे. काय पाप या बिचाऱ्याचे.

कोण दत्तक नेईल, कुठे जाईल….. ‘ ते बाळ मजेत मुठी चोखत पाळण्यात पडले होते.

आधीच ठरवलेल्या आणि सर्व माहिती देऊन ठेवलेल्या संस्थेला मी फोन केला. एका तासात त्यांच्या सोशल वर्कर बाई आल्या. त्यांच्या हातात सुंदर कपडे, बाळासाठी  छान ब्लॅंकेट होते.

त्या मायेने सरोजजवळ गेल्या. त्यांनी तिच्याकडून फॉर्म भरून घेतला….’ मूल दत्तक द्यायला आपली हरकत नाही, मग ते परदेशात पाठवायलाही माझी परवानगी आहे,’ असा बराच मोठा फॉर्म होता तो.

 सरोजने सह्या केल्या.

 “ बाळा, तुला याचे काही नाव ठेवायचे आहे का?” त्यांनी तिला विचारले.

सरोज कडवट हसली. 

“ कसले नाव ठेवताय. नकोसा असताना आला जन्माला.. कर्णासारखा. ठेवा करण नाव त्याचे.”

तिने मान फिरवली. त्या बाई, मी,आमचे डॉक्टर हतबुद्ध झालो.

सर म्हणाले, “ अग, इतकी वर्षे मी हॉस्पिटल चालवतोय, पण अशी  पेशंट नाही बघितली.”

 आमच्या सर्वांच्या डोळ्यात अश्रु होते, पण सरोज मात्र निर्विकार. तिची आई ते बाळ मांडीवर घेऊन टाहो फोडून रडत होती.

 संस्थेच्या बाई ते बाळ घेऊन गेल्या. आम्हाला म्हणाल्या, “ तुम्ही काळजी नका करू. आमच्याकडे दोन दोन वर्षे वेटिंग लिस्ट असते मुलांसाठी. हे बाळ चांगल्या घरी देऊ आम्ही. नशीब असेल तर जाईलही परदेशात. कल्याणच होईल त्याचे.” 

दुसऱ्याच दिवशी सरोज डॉक्टरांना विचारून घरी निघून गेली. “ अग थांब एखादा दिवस,” असे म्हटले, तरी  न ऐकता गेलीच ती. त्या नंतर ते कुटुंब मला कधीच भेटले नाही.

 

  —-अशीच कधीतरी मलाच आठवण येते,

काय झाले असेल पुढे त्या बाळाचे?…. 

सरोजने लग्न केले असेल का?….. 

पण याची उत्तरे मला कधीच मिळणार नाहीत.

त्या  लोकांनी, माझी गरज संपल्यावर माझ्याशी सम्बन्धच ठेवला नाही!!!

‘ गरज सरो,वैद्य मरो,’ हे माझ्या बाबतीत तरी त्यांनी खरे ठरवले।

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments