डॉ.सोनिया कस्तुरे
मनमंजुषेतून
☆ विपरीत घडेल..! ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
तिच्या मनात दाटलेले काळे ढग
कुणाला दिसतील का ?
तिने पापण्यांपर्यंत अडविलेला पाऊस
कुणाला जाणवेल का ?
वादळातही मन सावरुन
इतरांसाठी झटणारी ती
कधी कुणाला उमगेल का ?
आशा, आकांक्षा जपण्यासाठी तिला
वेळीच साथ मिळेल का ?
का तिने सोडून द्यावे त्याग, समर्पण सारे ?
मुक्त वावरावे अनिर्बंध
स्वतःला शोधण्यासाठी ?
ती म्हणते कधीकधी तळमळून
“नकोच बाईपण, ओझ्याने थकलेले आईपण
माणूसपणाच्या सागरात
डुंबू दे ना मलाही..!”
वेळीच आवरा, माणूस म्हणून सावरा
नाहीतर विपरीत घडेल !
आई, आईपण गोठून जाईल !
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈