डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ सविताची व्यथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆ 

मध्यंतरी  एका शिबिरासाठी एका खेडेगावात गेलो होतो. शिबिर झाले, पण ड्रायव्हर येईपर्यंत म्हटले, जरा फिरुया बाजारात.– खेड्यातला तो बाजार. पण तो बघतानाही गम्मत आली आम्हाला.

सहज मागे बघितले तर चेहरा खूप ओळखीचा वाटला. मी हाक मारायच्या आधीच तिने मला हाक मारली.

“ अग, इकडे कुठे तू?” 

सविता मध्ये फारसा बदल नव्हता झाला. अंगाने भरली होती,आणि श्रीमंतीचे तेज मात्र आले होते अंगावर.

“ सविता, इकडे राहतेस तू? अशा खेड्यात ?”

“ हो ग..चल बघू घरी माझ्या.” –तिने मला ओढतच तिच्या घरी नेले. छानच होता तिचा बंगला. शहरी पद्धतीने बांधलेला, सगळ्या आधुनिक सोयी असलेला. तिने बाईला हाक मारून चहा आणि काही खायला आणायला सांगितले.

“ सविता, कित्ती वर्षानी भेटतोय आपण. पुण्याला येत नाहीस का  कधी? आणि मुलं ?”  मी विचारले.

“ मुलगी चित्रा लग्न होऊन दिल्लीला गेली. मुलगा कुणाल डॉक्टर झाला,पुढचे शिकायला ऑस्ट्रेलियाला गेलाय.”

सविताचे सगळे चांगलेच झालेले दिसत होते.

सविता म्हणाली,” आठवतंय तुला ? अठराच वर्षाची होते ग मी. रमेशच्या प्रेमात पडले. त्याची आमची जात वेगळी, आई बाबांनी केवढा तमाशा केला, त्यावेळी घरातून पळून जाऊन लग्न करणे म्हणजे दिव्यच होते. पण आमच्या समोर दुसरा पर्यायच नव्हता. तोही बिचारा शिकतच होता. मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला होता. त्याच्याही घरी विरोधच होता. तुला माहीत आहे की, तू आलेली होतीस मला भेटायला. नव्या पेठेत एका खोलीत रहात होतो बघ भाड्याने. तुला सांगते, नवीनवलाई संपल्यावर खाडकन डोळे उघडले दोघांचे. रमेशला कधीही कष्टाची सवय नाही,

घरून तो म्हणेल तितके पैसे यायचे .पण  हे सगळे बंद झाले. फार कठीण गेले ते आम्हाला. एका हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीची नोकरी धरली त्याने. पगार किती माहीत आहे? दोनशे रुपये. मी तर कॉलेज सोडूनच दिले होते.  आईबाबांनी माझे नावच टाकले. पण सुदैवाने रमेश पास झाला. हातात डॉक्टरची डिग्री तरी आली. मग गेला वडिलांना भेटायला. त्यांनी आधी खूप  तांडव केले. पण निदान,भर बाजारपेठेतली एक पडकी ओसरी दिली. रमेशने त्या जागेत दवाखाना सुरू केला. तिथेच मागे अर्ध्या जागेत आम्ही संसार थाटला. माझ्या मावशीने  लपून छपून दिलेली चार भांडी,यावर सुरू केला मी संसार. अतिशय हाल काढले बघ आम्ही. पण देवाचीच कृपा म्हणायची,

हळूहळू रमेशचा जम बसायला लागला. त्याच्या हाताला यश येऊ लागले. पेशंट वाढायला लागले. मग सासऱ्यानी दुसरी मोठी जागाही दिली. तिकडे रमेशने आधी एक मजला बांधला. तुमच्या पुण्याचेच सर्जन बोलावून आम्ही छोटेसे हॉस्पिटल सुरू केले. दर रविवारी पुण्याहून येत सर्जन..तेव्हा हे गाव इतकेही नव्हते वाढले ग. गरज होती इथे हॉस्पिटलची… किती काय सोसलेय सांगू तुला.” सविताच्या डोळ्यात पाणी आले. “ आता समजते बरं कोणाचाही आधार नसला की  काय वाटते ते. काय ग वाईट होते रमेशमध्ये. मी इतकी सामान्य, बुद्धीनेही,दिसायलाही.

पण नाही.आईने कायमच वैर धरले माझ्याशी. मला मुलगी झाली ना, तर आईबाबा बघायलाही नाहीआले.

कसले ग हे पीळ माणसाला—मीच माझे बाळंतपण करून घेतले. ठेवली एक बाई मदतीला. कसले ग ते  बाळंतपण.

पण रमेश सतत माझ्या बरोबर होता. आम्हाला होतेच कोण? सासरचे बघायला पण आले नाहीत मुलीला.”

सविताला खूप वाईट वाटत होते.

“ तू माझी अगदी शाळेतली मैत्रीण म्हणून मी हे सांगतेय तुला. तुलाही खूप हळहळ वाटली होती तेव्हा.”

“ हो ग सविता. मी तुला भेटायला आले होते, तेव्हाचा तुझा अवतार अजून आठवतोय. गळ्यात काळी पोत, आणि हातात नुसत्या काचेच्या चार बांगड्या.” 

“ हो ना.आणि त्या खोलीचे भाडे कसे देणार,ही चिंता. तुला सांगते,इतका पश्चात्ताप झाला दोघांना. नव्याचे रंग एका महिन्यात उडून गेले, जेव्हा बाहेरचे पिठामिठाचे भाव समजले.”

“ अग मग निदान रमेश डॉक्टर होईपर्यंत तरी का नाही थांबलात? रागावू नको हं मी विचारले म्हणून.”

“ कसे थांबणार होतो बाई.आईने कोंडून ठेवले होते मला. तुला माहीत आहे नं ती कशी होती ते. वर पुन्हा कोणतातरी मुलगा आणला, म्हणाली, ‘ चार दिवसात लग्न लावते बघ तुझे याच्याशी.’  मी कशीबशी निसटले. मग लग्न करण्याशिवाय पर्यायच नव्हता बघ.” 

एक सुस्कारा टाकून ती पुढे म्हणाली.,“ आता मागे वळून बघितले तर वाटते, मी हे धाडस का केले आणि त्यालाही करायला लावले. हा चकवा माणसाला भुलवतो, काही सुचू देत नाही बघ. कसले प्रेम अन काय ग. भूलच पडते बघ बुद्धीवर.” सविताला हुंदके अनावर झाले.

मी तिला जवळ घेतले, “अग वेडे,आता झाले ना सगळे छान? मुलगा डॉक्टर झाला, मुलगी शिकली-सुखात आहे सासरी. चांगली डॉक्टर सूनबाई आलीय. काय हवे अजून तुला?”

सविता म्हणाली, “ तेही खरेच ग. पण आधीच्या जखमा विसरू म्हणता विसरता येत नाहीत ना .मूर्खासारखी शिक्षण सोडून बसले. रमेशला पुढचे शिकता आले नाही.–असो. म्हणून मी एक धडा घेतला. मुलांना सांगितले,आपली शिक्षणे पूर्ण झाल्याशिवाय, पायावर उभे राहिल्याशिवाय लग्न नाही. मुले गुणी निघाली ग माझी. सून आणि मुलगा, पुढे शिकायला ऑस्ट्रेलियाला गेलेत. सून माझी डोळ्यांची सर्जन आहे आणि लेक मुलांचा डॉक्टर. केली की नाही जिद्द पुरी.”

“ सविता, खरोखर जिंकलेस हो, या यशासारखे दुसरे यश नाही.”

“ हो ग. पण या सगळ्यात माहेर तुटले माझे. आईबाबा कधीही आले नाहीत. मी गेले होते चार वेळा. पण त्यांनी दारही उघडले नाही मला.”

“ सविता,जाऊ दे ते. छान केलास की संसार.”

सविताने मला तिचे घर दाखवले. हॉस्पिटल दाखवले. रमेशलाही  खूप आनंद झाला मला भेटून.

‘आता मुलगा आला की आणखी दोन मजले वर बांधणार आहोत ‘ म्हणाला.

निघताना सविताने माझी ओटी भरून सुंदर साडी दिली. मला अगदी अवघडल्यासारखे झाले.

“नाही म्हणू नको ग. तू आमचे सगळे सगळे  दुर्दैवाचे अवतार बघितलेस. आता  आमचे हे  वैभवही  तू बघावेस ही देवाचीच इच्छा होती. नाहीतर तू असल्या खेड्यात कशाला येशील आणि आम्हाला भेटशील ? आता  लेकाचे मोठे हॉस्पिटल बांधून होईल तेव्हा नक्की येशील ना?”  रमेशने मनापासून विचारले.

“ नक्की येणार. भाच्याचे आणि सूनबाईचे कौतुक करायला.” मी म्हणाले.

सविता रमेशने मनापासून पुन्हा यायचे आमंत्रण देऊन मला निरोप दिला.

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments