श्री उदय गोपीनाथ पोवळे
☆ प्रवास… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना
हरलो का जिंकलो, काही उमजेना
जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो
आलेल्या प्रसंगाशी लढत राहिलो —
खाच खळगे, काट्या झुडपातून मार्गस्थ झालो
धडपडत, चाचपडत, पडून, उभा राहिलो
तरतरीत, टवटवीत होऊन ताजातवाना झालो
पुढे मखमली गालिच्यावरून चालत राहिलो पण —
गालिच्याखालची टोकेरी दगड टोचत राहिली
जमिनीवरच्या मातीची आठवण देत राहिली —
काही प्रसंगी हरून जिंकलो
तर काही प्रसंगी जिंकून हरलो
काही लढाया डोक्याने लढलो
तर काही लढाया मनाने जिंकलो
—डोक्याच्या लढायांना सर्व साथीला होते
मनाच्या लढायांना फक्त हृदयच साक्षीला होते —
काय कमावले, काय गमावले हिशोब जुळत नाही
काय जमवले, काय हरवले काहीच कळत नाही—
सुख दुःखाच्या खेळामध्ये कठपुतळी झालो
नशिबाच्या लाटेवर तरंगत वहात राहिलो —
सुख काय, दुःख काय, सारे सारखे वाटत गेले
त्याच्या पलीकडे जाऊन—
माणूस होऊन, दुसऱ्यांसाठी, जगावेसे वाटत राहिले —
होतो कुठे, आलो कुठे, काही कळेना
हरलो का जिंकलो, काही उमजेना
पण महत्वाचे हे की —
जीवनाच्या प्रवासात चालत राहिलो
सुखदुःखाच्या पलीकडे बघत राहिलो —
आणि—
आणि फक्त नी फक्त—
आनंदाची देवाण घेवाण करत राहिलो
आंनदाची देवाण घेवाण करत राहिलो
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈