सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ बंध राखीचे… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

रक्षाबंधन निमित्ताने विवेकची…माझ्या भावाची आठवण येते. सण साजरा होतो.

भावाला प्रेमाने नारळीभात, मिठाई खायला घालतो.त्याला ओवाळतो. भाऊही भेटवस्तू देऊन

बहिणीला खूश करतो.राखी पौर्णिमा साजरी होते !

पण मला आठवतो तो दिवस, जेव्हा विवेकने माझे खरोखरच रक्षण केले होते! त्याच्या विश्वासावर मी भरलेला ओढा पार करून गेले होते!

जवळपास ४०/४५ वर्षांपूर्वीची गोष्ट! मी तेव्हा हाॅस्टेलवर शिकायला होते.आणि माझा भाऊ नुकताच इंजिनिअर होऊन एस् टी मध्ये नोकरीला लागला होता.मी तेव्हा सांगलीत रहात होते आणि तो कोल्हापूरला होता.आई-वडील तेव्हा मराठवाड्यात नांदेड जवळील एका लहान गावात नोकरी निमित्ताने रहात होते.वडिलांची प्रमोशनवर बदली रत्नागिरीहून नांदेडला झाली आणि युनिव्हर्सिटी बदल नको म्हणून मी सांगलीलाच होते.दिवाळीच्या सुट्टीत घरी जायला मिळत असे.

त्या वर्षी नेहमी प्रमाणे मला सुट्टीसाठी नांदेडला पोचवायला विवेक येणार होता. तेव्हा एस् टी च्या गाड्याही फारशा नव्हत्या. संध्याकाळी कोल्हापूर -नांदेड अशी सात वाजता बस असे. ती दुसऱ्या दिवशी सकाळी

९-३०/१० पर्यंत नांदेडला जाई. अर्थात वाटेत काही प्राॅब्लेम नाही आला तर! त्यावर्षीचा तो प्रसंग मी कधीच विसरत नाही. दिवाळीच्या सुट्टीला जाण्यासाठी मी आणि माझा भाऊ सांगलीहून एस् टीत बसलो तेव्हा पाऊस होताच. कदाचित मिरजेच्या पुढे ओढ्याला पाणी असण्याची शक्यता होती. त्या मोठ्या ओढ्याचं नाव होतं हातीदचा ओढा! विवेक एसटीत असल्याने त्याला हे सर्व माहीत होते, पण नंतर वेळ नसल्यामुळे ‘आपण निघूया तरी’ असे त्याने ठरवले. मिरजेच्या स्टॅण्डवर त्याने ब्रेड, बिस्किटे,फरसाण असा काही खाऊ बरोबर घेतला होता. ठरल्याप्रमाणे आम्ही निघालो. शिरढोणच्या दरम्यान ओढा भरभरून वाहत होता. रात्रीचे नऊ वाजले होते. बाहेर धुवाधार पाऊस! रात्रभर आम्ही ओढ्याच्या एका तीरावर एस् टी मध्ये बसून होतो. पावसामुळे बाहेरचे वातावरण आणखीनच भयाण वाटत होते. कधी एकदा सकाळ होईल असं वाटत होतं!

एकदाची सकाळ झाली. गाडीतून खाली उतरून बाहेर पाहिले तर दोन्ही तीरावर भरपूर गाड्या अडकून पडल्या होत्या. कंडक्टरने सांगून टाकले की पाणी थोडं कमी झाले आहे, आपापल्या जबाबदारीवर पलीकडे जा आणि तिकडच्या एस टी.त  बसा! एक एक करत लोक ओढा पार करत होते. सामान डोक्यावर घेऊन चालले होते. माझे तर काही धाडसच होत नव्हते! भाऊ म्हणाला, ‘आपण जर असेच बसलो तर पलीकडे जाऊ नाही शकणार!’ आणि ओढा क्रॉस करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. शेवटी तो स्वतः एकदा ओढा पार करून  पाणी कितपत आहे ते पाहून आला. विवेक चांगला पोहणारा होता आणि मला तर अजिबात पोहता येत नव्हते. पाण्याची भीती वाटत होती, पण त्याने मला धीर दिला. मला म्हणाला, ‘ मी हात घट्ट पकडतो, पण तू चल .’ आणि खरंच, त्याने एका हातात सामान आणि दुसऱ्या हाताने माझा हात घट्ट धरून ओढ्यापलीकडे मला न्यायला सुरुवात केली. ओढ्यामध्ये काटेरी झुडपे, लव्हाळी यात पाय आणि साडी अडकत होते.. माझी उंची कमी असल्याने अधूनमधून पाण्यात पूर्णडोके खाली जाई, आणि गुदमरल्यासारखं होई. पण मला धीर देत आणि माझं मनगट घट्ट धरून विवेक मला नेत होता. कसेबसे आम्ही ओढ्यापलीकडे गेलो. नंतर बॅगमधील सुके कपडे आडोशाला बदलून दुसऱ्या गाडीत बसलो. आणि पुढचा प्रवास पार पडला! आयुष्याच्या प्रवासात असा एखादा आठवणींचा प्रवास माणसाला अंतर्मुख करतो. भावाचं नातं आणखीनच दृढ करतो… इतकी वर्षे झाली तरी मला तो दिवस तेवढाच आठवतो!

आणि भावाने बहिणीचे संरक्षण करायचं असतं ते कृतीने दाखवणारा माझा भाऊ डोळ्यासमोर उभा राहतो.. आता विवेक पंचाहत्तरीकडे वाटचाल करत आहे. पण अजूनही आमचे भाऊ बहिणीचे नाते तितकेच घट्ट आहे! ….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments