सौ. उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ 📘शब्द व्हावे सारथी… भाग-1 लेखिका – डॉ. विजया वाड ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆ 

‘‘लंगडीच राह्य़चंय का तुला आयुष्यभर?’’ डॉ. बेडेकर मला विचारीत होते.

‘‘आयुष्यभर म्हणजे?’’ मी विचारलं.

‘‘आईएवढी, माझ्याएवढी झालीस तरी!’’

‘‘नाही नाही. मला धावायचंय, पळायचंय. सायकल चालवायचीय.’’

‘‘मग साठ इंजेक्शने घ्यावी लागतील न रडता. मुंगी चावल्यागत वाटेल.’’

माझे वय साडेपाच वर्षांचे होते. आधी वर्षभर माझ्या पायात मांडीपासून टाचेपर्यंत बूट होता. आईने वाचायला शिकविले होते नि मला न हसणारे, न चिडवणारे दोस्त आणून दिले होते- पुस्तकं! तेव्हापासून मला साथ देणारे माझे जिवाभावाचे सोबती.

‘‘मी घेईन. न रडता घेईन.’’

अशी साठ इंजेक्शने या बारक्या, काटकुळ्या पोरीने शूरपणे घेतली, न रडता आणि ती दोन पायांवर उभी राहिली. आईचा हात धरून सातव्या वर्षी एकदम दुसरीच्या वर्गात बसली नि ‘हुश्शार’ म्हणून गोडांबेबाईंची लाडुकली झाली. ती मी. विजया नरसिंह दातीर. माझे बाबा वयाच्या पंचेचाळिसाव्या वर्षी गेले. मी केवळ अकरा वर्षांची होते. बाबा पुण्याचे सिटी मॅजिस्ट्रेट होते. डॉ. अमीन कलेक्टर होते. ते म्हणाले, ‘‘मिसेस दातीर, तुम्हाला पाच मुलं. गृहिणी आहात. दातीरांना पेन्शन बसणार नाही. मी दोन्ही मुलांना नोकरी लावून देतो. घर स्वाभिमानाने चालेल.’’

असे दादा, नाना, बाबांचं तेरावं करून नोकरीवर रुजू झाले. दादाला जेलर म्हणून येरवडय़ाला क्वार्टर्स मिळाल्या. दोन्ही बहिणींनी लग्ने केली सहा महिन्यांत. नाना राहुरीस होता. घर फक्त तिघांचं. मी, दादा, आई. माझ्यात नि भावंडांत फार अंतर होते. आठ, नऊ, तेरा वर्षांचे; पण दादा माझा बाप झाला नि माझे जीवन त्याच्यामुळे फार सुकर झाले.

‘‘कोणी विचारले, बाबा काय करतात तर रडायचे नाही. सांगायचे, जेलर आहेत.’’ इतुके प्रेम-इतुकी माया. माझे बीएस्सीपर्यंतचे शिक्षण, लग्न, बाळंतपण सारे सारे दादा, नाना यांनी केले. आक्काही जबाबदारी उचले.

पण तेव्हा ना, अतिमध्यम परिस्थितीचे काही वाटायचे नाही. आई मला कॉलेजात जाताना स्कर्ट घालू देई, पण घरी आल्यावर साडीच! केमिस्ट्री प्रॅक्टिकल्सला कपडय़ांना भोके पडतात म्हणून स्कर्ट हो! के.जे. सोमैय्यांतून मी बीएस्सी होता होता टेबल टेनिस, बुद्धीबळ या स्पर्धात आंतरकॉलेज स्पर्धात नि बुद्धीबळमध्ये मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. मला ‘बेस्ट गर्ल स्टुडंट’चा गौरव ज्युनिअर बीएस्सीला मिळाला; पण या नादात माझा फर्स्ट क्लास गेला. ‘‘आता लग्न करा.’’ आईने आदेश दिला. मी रेल्वे क्लबवर  ‘टे टे’ खेळायला जायची. तिथला माझा मित्र दोन दिवस मला घरी सोडायला आला. तेव्हा आईने त्याला दम भरला, ‘‘मी रोज गणपतीला जाते. मला कोणी घरी पोचवायला येत नाही. कळलं का? विजूला सोडायला यायचं नाही. ती फक्त लग्न ज्याच्याशी करेल.. त्याच्याबरोबरच येईल- जाईल.’’ तो इतका घाबरला. मला दुसऱ्या दिवशी म्हणाला, ‘‘बाप रे! तुझा भाऊ जेलर नि आई जगदंबा.’’ पण मला त्याच्याबद्दल काही मृदू वाटत होते. आमचे पासपोर्ट साइज फोटो आम्ही एकमेकांस दिले होते, पण बस्! त्या कोवळिकीचे अ‍ॅबॉर्शन हो! रेल्वे क्लब बंद.. बंद!

लग्न ठरले. कॅप्टन विजयकुमार वाडांना मी म्हटलं.. ‘‘असं प्रेम जडलं होतं.’’

‘‘आता नाही ना?’’

‘‘छे हो!’’

‘‘अगं, काफ लव्ह ते. तो फोटो टाकून दे. माझा ठेव.’’

संपलं. ओझंच उतरलं.

मला एका गोष्टीचे फार दु:ख होई, की माझा नवरा मला बॉर्डरवर नेत नाही. ‘‘मला पीस पोस्टिंग नाही. फिल्ड पोस्टिंगला कसे नेणार?’’ या उत्तराने माझे कधीही समाधान झाले नाही; पण मग दोघी मुलींनी जन्म घेतला चौदा महिन्यांच्या अंतराने आणि मी आयुष्यातला सर्वोच्च आनंद उपभोगला. मुली बापासारख्या नाकेल्या नि सुरेख निपजल्या. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे  ‘मुलगा हवा’ असे ना सासू-सासऱ्यांनी म्हटले ना पतीने. मला पंचविशीत करियर करायची होती, शिकायचे होते, लिहायचे होते. निशूच्या (निशिगंधा वाड) जन्मासोबत माझी पहिली कादंबरी ‘मेनका प्रकाशन’ने प्रकाशित केली होती. ‘स्त्री’, ‘किर्लोस्कर’ नि रविवार पुरवण्या यांत माझे लेख जसे येऊ लागले तसे ‘विजया वाड’ या नावाला लोक ओळखू लागले.

अनेक वर्तमानपत्रांच्या संपादकांनी मला सातत्याने लिहायला दिले. लेखन प्रसिद्ध केले. एका वर्तमानपत्रात तर सलग साडेपाच वर्षे मी लिहीत होते. ‘आकाशवाणी’वर मी तेरा तेरा भागांच्या पंधरा बालमालिका लिहिल्या, तर ‘दूरदर्शन’वर आबा देशपांडे यांच्याकडे शालेय चित्रवाणी सतत अकरा वर्षे नि ‘ज्ञानदीप’चे कार्यक्रम खूप केले. एक दिवस अशोक (‘डिंपल प्रकाशन’चा) माझ्याकडे दिलीप वामन काळे यांना घेऊन आला नि सुरू झाला दर चार-पाच महिन्यांनी एका पुस्तकाचा सिलसिला. दिलीपने माझी ३१ पुस्तके दहा-बारा वर्षांत काढली. १२४ पुस्तकांची आई आहे. अजूनही लिहितेच आहे..

क्रमशः…

लेखिका – डॉ. विजया वाड 

संग्राहिका –  सौ. उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments