सौ. सुचित्रा पवार
☆ दिवस सुगीचे… भाग 1 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
दिवस सुगीचे सुरू जाहले –
ओला चारा बैल माजले—
अशी एक सुगीचे यथार्थ चित्रण करणारी फार सुंदर कविता आम्हाला तिसरी-चौथीत होती. शेतकऱ्यांसाठी सुगी म्हणजे धामधुमीचा काळ. त्यातल्या त्यात खरीप अर्थात दिवाळीपूर्वीचा हंगाम म्हणजे वेगवेगळ्या पिकांची काढणी,कापणी, मळणी आणि धान्य घरात आणेपर्यंतचा सर्व कालावधी हा अतिशय व्यस्त,धामधुमीचा आणि आनंदाचा असतो.आतापर्यंत केलेल्या वेळेचे, पिकाचे नियोजन, आणि शेतात केलेल्या कष्टांचे चीज सुगीत होणार असते. आणि वर्षभर शेतकऱ्यांचे कुटुंब, गुरा-ढोरांच्या पोटापाण्याची बेगमी, या सुगीवरच अवलंबून असते. पीक कसे आले?यावरही सुगीचे फलित अवलंबून असते. सुगीच्या दिवसात शेतकरी कुटुंबाला वेळकाढूपणा करून, टंगळमंगळ करून चालत नाही, की एखाद्या गावाला शिवालाही जाऊन चालत नसते. घरादाराला कुलूप घालून सर्वांची रवानगी शेतात करावी लागते. कधी कधी तर शेतावरच मुक्काम ठोकायला लागतो. त्यावेळी सर्वत्र कसे एकदम धावपळीचे चित्र असायचे.
खरे तर वैशाख सुरू झाला कीच बी बेवळा जमवण्याची तयारी सुरू व्हायची. मान्सूनचे वारे वाहू लागत आणि हवेतील उष्मा थोडासा कमी होई. भुईमुगाच्या शेंगा फोडायला सुरुवात व्हायची, कारण हे बी तयार करून ठेवायला लागायचे. बाकी कडधान्ये राखेत असत, ती पटकन चाळून घेता येत. पण शेंगदाण्याचे तसे नसते. घरच्याच पोत्यातील देशी शेंगांचे बी काढावे लागे. घरोघरी आयाबाया,पोरं- ठोरं शेंगा फोडायला सुरू करायची. हे कामसुद्धा रोजगाराने असायचे. चार-आठ आण्याला मापटाभर शेंगदाणे फोडून द्यायचे. सर्व शेंगा फोडून झाल्यावर मग मापट्याच्या हिशोबाने पैसे आणि थोडेसे शेंगांचे घाटे रोजगाऱ्यास मिळत. शेंगा फोडून झाल्या की बी अर्थात शेंगदाणे निवडण्याचे काम करावे लागे. फुटके,डाळी झालेले,बारीक बारीक शेंगदाणे वेचून, मोठे टपोरे शेंगदाणे पेरणीसाठी बाजूला काढावे लागत.आकाशात इकडे तिकडे पळणारे काळे काळे ढग आता स्थिरावू लागत. थंड हवा वाहू लागे आणि बियांचे आतून रुजणे सुरू होई.
उकाड्याने हैराण झालेल्या जीवास अचानकच आलेला एखादा पावसाचा शिडकावा दिलासा देई.वेगवेगळ्या पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज आसमंतात भरून जात. कोकीळ आणि पावशाचे प्रियाराधन तार स्वरात सुरू व्हायचे आणि शेतातील राहिलेला काडी कचरा वेचून ढेकळं फोडून जमीन एकसारखी करायला सुरुवात व्हायची. मृग नक्षत्र सुरू होताच इथं तिथं मिरगी किडे दिसत. बायका त्यांना हळदकुंकू लावून पूजत. पावसाची वर्दी देत गार गार वारे वाहू लागत आणि पाठोपाठ टपोऱ्या थेंबासह जलधारा कोसळू लागत.
घन घन माला नभी दाटल्या । कोसळती धारा ।।
असेच काहीसे वातावरण असायचे. मातीचा सुगंध चहूबाजूस दरवळू लागायचा. तप्त धरणी पाऊस पिऊन तृप्त व्हायची.
इकडं आमच्या शाळा सुरू व्हायच्या. पावसात भिजत भिजत शाळेला जायला नको वाटायचे. उलट कांबळी पांघरून घरातूनच पाऊस पहावा वाटायचा. कौलांच्या वळचणीच्या पाऊसधारा झेलाव्या वाटायच्या. शेतातल्या मऊ मातीत पाय रुतवू वाटायचे.सर्वांबरोबर शेतात जाऊन शेतातली कामे करावी वाटायची. चुलीपुढील ऊबीत बसावे वाटायचे. तरीही शाळेला जावे लागायचेच. कुणाची तरी जुनी पुस्तके अर्ध्या किंमतीने घ्यायची. वह्या लगेच मिळत नसत आणि तसेही प्राथमिक शाळेत पाटीचा वापर जास्त होत होता, वही एखादं दुसरीच.
राखेतला बी बेवळा चाळून काढायची धांदल उडायची. आठवणीने कुरी सांदीकोपऱ्यातून बाहेर येऊन सुताराकडे दुरुस्तीला किंवा सांधायला येऊन पडत. देशी चवळी, मूग, उडीद, मटकी, काळा श्रावण, कुशीचा हुलगा, तूर, ज्वारी राखेतून काढून चाळले जायचे. देशी पावट्याचे बी, सूर्यफुलाचे, कारळ मुरडान घालायला सोबत असायचे. पसाभर हावऱ्या (पांढरे तीळ) गठूळ्याच्या एका टोकाला आठवणीने बांधल्या जायच्या. पेरणी झाली की असेच विस्कटून द्यायच्या. अडशिरी पायलीभर हावऱ्या आरामात निघायच्या.
दहीभात,नारळ पेरणीच्या श्रीगणेशाला आणि धरणीच्या शांतीसाठी. घात अर्थात वाफस्याची वाट प्रत्येकजण पहात असायचा. ओल किती खोल गेलीय याची चाचपणी व्हायची अन पेरणीची एकच धांदल उडायची. बैलगाडीत कुरी,बी बेवळा टाकून घरदार पेरणीला निघायचं. गावात सकाळी सकाळीच सामसूम व्हायची. पेरणी झाली आणि लगेच पाऊस आला की आनंदाला उधाण यायचं, कारण बी व्यवस्थित मुजून रुजणार याची पक्की खात्री व्हायची.
वैशाख-जेष्ठ महिना अशा प्रकारे सुगीच्या तयारीच्या धामधुमीतच न पेरणीतच संपून जायचा.
आषाढाचे काळे काळे कुट्ट पाण्याने ओथंबलेले ढग आकाशात गर्दी करायचे अन भुर भुर पाऊस सतत चालू रहायचा. सोबत बोचरा भिरभिर वारा. बाया माणसं पोत्याची खोळ घेऊन शेताला जायचे. गुराखी पोत्याची खोळ,काठी घेऊन गुरे चारायला निघायची. सततच्या भुरभुरीने सगळीकडे हिरवे पोपटी गवताचे कोंब जिकडे तिकडे उगवत. माळराने, टेकड्या, डोंगर हिरवाई पांघरून बसत. जनावरांना ती हिरवाई भुरळ पाडायची आणि ती हावऱ्यागत इथं तिथं मनसोक्त चरत रहायची. उन्हाळ्यात कडबा खाऊन भकाळलेलं पोट आता चांगलंच टूमटूमित व्हायचं.शेतात वित दोन वित पीक वाऱ्यावर डोलायचं. पिकाबरोबरच तणही गर्दी करायचं, इतकं की पीक मुजुन जायचं. दिवस दिवस खोळ पांघरून बायका खुरप्याच्या शेंड्याने शेंड्याने अलवार पिकाच्या मोडाला धक्का न लावता तण वेचत रहायच्या. कधी अभंग, कधी सुखदुःखाच्या गोष्टी तर कधी पिकाचा अदमास बांधत शिवारे पोत्याच्या खोळीत आणि बांगड्यांच्या किणकिणीत गजबजून जायची. सततच्या रिपरिपीने सगळीकडे चिखल चिखल व्हायचा.
मूळ नक्षत्राच्या खिचड्याला बायकांची धांदल सुरू व्हायची. उखळीत जुंधळ कांडून चुलीवर रटरटत असायचे. करडं भिजवून उखळात चेचून त्यातून दूध काढलं जायचं. ओढ्या ओघळीच्या खळखळ पाण्यावर जनावरांना मोकळं सोडलं जायचं. गळ्याइतक्या पाण्यात म्हशी, रेडकं मनसोक्त डुंबत राहायची. मालक गोड शीळ घालत चिखलाने बरबटलेली अंगे दगडाने घासून घासून स्वच्छ करायचा. बैलांना ओंजळीनं पाणी मारत मारत मायेने हात फिरवत कांती तुकतुकीत करायचा. ओल्या गवताने तृप्त झालेली जनावरे धुतल्यावर अजूनच तजेलदार दिसायची आणि ही नवी कांती बघून शेतकरी प्रसन्न व्हायचा. खिचडा,आंबील खाऊन जनावरे सुस्त होत.
पुरणपोळीचा घास सगळ्या जनावरांना मिळायचा. नवे कासरे, शिंगांचे गोंडे आणि आरशाच्या रंगीबेरंगी झुली पाठीवर लेऊन लेझीम,वाजंत्र्याच्या गजरात सजलेले बैल मिरवणुकीत सामील व्हायचे. ( या दोन दिवसात किती पण अडचण, नड-अड असली तरीही शेतकरी बैल औताला अथवा बैलगाडीला जोडायचे नाहीत.) आंब्याच्या पानांची तोरणे मातंग समाजातील लोक गोठ्याला, घराला आणून बांधत. गावभर मिरवून दृष्ट काढून बैल गोठ्यात विश्रांती घेत. अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा,काटे वाळकं वेलीवर लोंबकळत. बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.
क्रमशः …
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈