सौ. सुचित्रा पवार
☆ दिवस सुगीचे… भाग 2 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆
(अकितीला अंगणात लावलेल्या पडवळ, दोडका, भोपळा, काटे वाळकं वेलीवर लोम्बकळत, बांधावरच्या गोल भोपळ्याच्या वेलीवर पिवळसर केशरी फुलांचा बहर यायचा.) इथून पुढे —-
आषाढाच्या भुरभुरीने पिकं गुढघ्याइतकी झालेली असत. श्रावणातील ऊन पावसाच्या खेळात पिकांना चांगलाच बहर यायचा. कुणाची कडधान्य फुलकळीला यायची तर काही कडधान्यांच्या फुलातून मूग, चवळी, श्रावण घेवडा, उडदाच्या कोवळ्या कोवळ्या शेंगांचे घोस लटकत. वेगवेगळ्या रंगांचे कीटक, भुंगे गुंजारव करत पिकांवर बसायची. रंगीबेरंगी फुलपाखरे इकडून तिकडे भिरभिरायची. काळ्या, शंखाच्या गोगलगायी चमचमीत वाटा सोडत इकडून तिकडे फिरत. पक्ष्यांचे आनंदी किलबिलाट रानोमाळ घुमत असत.
शेतातून आलेल्या बायका रात्री फेर धरून पंचमीची गाणी गात-
सासुरवासाच्या कथा सांगणारी आणि माहेरच्या आठवणी जागवणारी. ठिकठिकाणी झाडाला झोपाळे झुलायचे. शेताच्या कामातून थोडी सवड मिळालेली असायची. हिरव्याकंच कचगड्याच्या काकणाचे हातभर चुडे लेऊन बायका झोपाळ्यावर हिंदोळत रहायच्या. पंचमीची गाणी शिवारभर पिकांवर लहरत रहायची…
भादव्याला पावसाची उघडीप मिळाली असली तरी ढगांचे पुंजके आकाशातून वस्ती करायचेच. अंगणात गौरीच्या रोपांना लाल, पांढरी, गुलाबी फुले यायची. त्यावर रंगीबेरंगी फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी भिरभिरत रहायच्या.
ऊन चांगलंच भाजून काढायचं. पिकात शिरलं की गदमदुन जायचं. मूग, उडीद, अळसुंद(चवळीसारखेच पण तोंड काळे असते. देशी चवळी पूर्ण लाल असते किंवा पूर्ण पांढरी तोंड लाल)काळे श्रावण, कुशीचे हुलग्याच्या शेंगा वेलीवर तटतटू लागायच्या. बायका कम्बरेला वट्या बांधून वाळल्या शेंगा तोडू लागायच्या. जोंधळा कम्बरेला लागायचा. घरोघरी ओल्या मूग, अळसुंद, काळ्या श्रावणाची आमटी उसळ असायची. तोडून आणलेल्या शेंगा उन्हात वाळत पडायच्या, त्यांचा तटतट आवाज होऊन बी खाली पडायचे, टरफल मुरगळुन बाजूला व्हायची. उन्हाच्या रटाने लाल, पांढऱ्या अळ्या बाहेर पडू लागायच्या, चिमण्या त्यावर टपलेल्या असायच्या. जवळच्या बांबूच्या आड्यातल्या, कौलारू घराच्या वळचणीतून भुरदिशी चिमण्या यायच्या आणि बाहेर पडलेल्या अळ्या गट्टम करायच्या.
शेंगा चांगल्या वाळल्या की बडवून वाऱ्याला लावून स्वच्छ झाडून पाखडून किडके, मरके कडधान्य काढून स्वच्छ कडधान्ये पुन्हा कडकडीत ऊन खाऊन गरजेपुरती डब्यात बसायची, पुढील वर्ष्याच्या बियासाठी गाडग्या मडक्यातल्या, कणगीतल्या राखेत विसवायची आणि गरजेपेक्षा जास्त असतील तर बाजारात चार पैसे मिळवून द्यायची, तेलामीठाला हातभार.
कडधान्ये विसाव्याला ठेवेपर्यंत अश्विन येऊन टपकायचा. अंगणातल्या उंच उंच झेंडूच्या शेंड्याला फांदीच्या टोकातून इवल्या इवल्या कळ्या डोकवायच्या.
तुरीला फुलं-कळ्या यायला सुरुवात व्हायची. माळाच्या मटकीला कुठं फुलं कुठं शेंगा लागायच्या. जोंधळा पोटरीला आलेला असायचा, कधी निसवत असायचा. निसवलेल्या कणसावर इवली इवली फुले दिसायची. असंख्य मधमाशा कीटक इकडून तिकडे कणसावर भिरभिरत रहायचे. खाली पडलेल्या फुलांवर मुंग्या तुटून पडायच्या. भुईमूगाला पिवळी पिवळी फुले लागत. बहराला आलेली पिके वाऱ्यावर डोलायची. पिकातल्या वाऱ्याचा एक अनामिक नाद सगळ्या शिवारभर घुमत रहायचा. वाऱ्याच्या साथीने डुलणारे शेत पाहून शेतकरी मनही आनंदाने फुलून यायचे.
ढगांच्या प्रचंड गडगडाटात हत्तीचा पाऊस हजेरी लावून गेलेला असे. निवळसंख ओढे, ओघळी खळखळ वाहत असत. शेते जीव्हळून पांदीतून पाणी वहात असे. शेतातली कारळाची पिवळीधम्मक फुले वाऱ्यावर डुलत असत. सूर्यफूले एकेका पाकळीने उमलू लागत. उमललेली पिवळीजर्द फुले शेताला शोभा आणत. भुंगे, मधमाश्या फुलांना मिठी मारून बसत. जुंधळा हुरड्याला येई. ठिकठिकाणी शेकोटी पेटवून हुरडा भाजला जाई. टपोरी कणसे खुडून आगीवर खरपूस भाजून सुपात चोळून पाखडून त्यावर चटणी मीठ टाकून चविष्ट हुरडा शेतकऱ्याच्या घरात हमखास असे. मक्याची कणसात दूध भरलेलेअसे. उकडून, भाजून, सोलून, गरम फुपुट्यात खरपूस वाफवलेली कणसे पोटभर खायला मिळत. भूमीपूजनाला धपाटी, कढी, वडी, कडाकणी, बाजरीचं उंड, भेंडी, दही भाताचा नैवेद्य शेताला दाखवला जाई आणि काढणीला आलेली पिकं काढायची धांदल सुरू होई.
सरत्या अश्विनात आणि निघत्या कार्तिकात डासं वारं भिरभिरत असे. आकाश निरभ्र झालेले असे. डास्या वाऱ्याने त्वचा तटतटू लागायची. थंडीची चाहूल लागायची. भुईमुगाची पाने काळपट तपकिरी रंगावर यायची. उंच उंच जोंधळ्याच्या डोलत्या पिकांवर पाखरांचे थवे भिरभिरायचे. मचाणी बांधल्या जायच्या, गोफणी तयार व्हायच्या. म्हातारे कोतारे, तरणे शेतावर वस्ती करत, कुणी पहाटेच उठून पाखरं राखायला जायचे. शेताशिवारातून हाकाट्यांचे आवाज, रिकाम्या डबड्यांचे आवाज घुमू लागत.
पावसाने उकणून गेलेल्या खळ्यांची डागडुजी होई.
कार्तिकच्या मध्यावर किंवा शेवटी गाव ओस पडत. खुडणी कापणीला जोर येई. कणसं खुडायची, जोंधळा पाडायची एकच धांदल उडायची. धारदार विळे बोट कापत तर कधी पायात सड घुसत. आसपासच्या औषधी पाल्याला चुरून रस काढून जखमेवर लावून चिंधकाची दशी काढून पट्टी बांधली जाई. शेंगा काढणीला नांगराची तजवीज आणि तोडणीला बायका, पोरांना शेंगाच्या रोजावर बोलवायची धांदल उडे. शेंगांचा सॉड (उतार)बघून एकूण गोळ्यांची संख्या ठरे. जितका उतार जास्त तितकी गोळ्यांची संख्या जास्त. १४, १८, २० अश्या संख्येत गोळे ठरायचे. दिवसभर रोजगाऱ्याने तोडलेल्या शेंगांचे समसमान गोळे करून त्यातला १ गोळा म्हणजेच पाटी, अर्धी पाटी किंवा दीड पाटी शेंगा दिवसभर शेंगा तोडणाऱ्यास मिळत. दिवसभर नांगरलेल्या शेतातले वेल वेचणे, ढीग घालणे मग शेंगा तोडायच्या. माणसांच्या आवाजाने राने गजबजून जात.
मागतकरी झोळ्या घेऊन रानातून हिंडत. कुणाच्या शेतातून शेंगा, कुणाच्यातून कणसे मागत हिंडत. बऱ्याचदा कणसांची चोरी व्हायची, कधी तोडून ठेवलेल्या शेंगांचीही चोरी व्हायची.
पांढऱ्याखड शेंगा पोतीच्या पोती भरून गाडीतून घरला येत. खळ्यात मोत्यासारख्या धान्याची रास पडे. धान्याच्या पोत्यांच्या थप्पी जोत्यावर येऊन पडत. जेवढी थप्पी मोठी तितकी शेतकऱ्यांची छाती अभिमानाने फुलून येई. सहा-सात महिने रात्रंदिन गाळलेल्या घामाचे चीज होई आणि उरलेल्या कामाची लगबग होई.
जोंधळ्याच्या पेंड्यांची बुचाडे लागत, शेंगांचे भुस्काट निवाऱ्याला बसे. तुरीच्या शेंगा गडद तपकिरी होत. पाला पाचोळा वेचून जनावरांपुढे पडे.
तूर मटकी काढून झाली की खरिपाचा हंगाम संपे पण माणसांच्या आणि गुरांच्या वर्षभराच्या पोटा पाण्याची सोय होई. खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.
क्रमशः …
© सौ.सुचित्रा पवार
तासगाव, सांगली
8055690240
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈