सौ. सुचित्रा पवार

??

☆ दिवस सुगीचे… भाग 3 ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

(खरीप जोमात असला की शेतकऱ्याच्या पदरात भरभरून माप पडे.) इथून पुढे —

दिवाळी झाली की बैलांना जरा विश्रांती मिळायची. रब्बीसाठी शेत गहू, शाळू, हरभरा, करडा, जवस आदींची जुळवाजुळव व्हायची. बी राखेतच असायचे, कोण उधार उसणवार आणायचे. रब्बीसाठी कुणी कुणी बेवड राखायचे. बेवड म्हणजे शेतीत कोणतेच पीक सहा महिने घ्यायचे नाही. सारखी पिके घेतल्याने जमीन थकते, निकस होते, मरगळते म्हणून तिला विश्रांती द्यायची म्हणजे पुढचे पीक जोमात येते.

दिवाळी झाली की रब्बीच्या पेरणीला सुरुवात व्हायची. संक्रातीला गव्हाच्या ओंब्या टचटच भरायच्या. हरभऱ्याचर घाटे भरायचे. करड्याच्या लालसर पिवळ्या छटेच्या फुलांनी शेते नटत. त्यांचा दरवळ शेतातून घमघमत असे. पावट्याच्या, घेवड्याच्या पाट्यांवर पांढऱ्या फुलांच्या घोसांच्या जागी शेंगांचे भरगच्च तुरे डोलू लागत. शेंगांचा गर्द घनदाट वास शेतातून दरवळत राही. नुसत्या चटणी मिठाच्या देशी चुनुल्या पावट्याच्या कालवणाची चव जिभेवर दिवसभर रेंगाळत राही. घरोघरी पावट्याच्या शेंगा, ओल्या हरभऱ्याचे कालवण असायचे. पोरंठोरं ओल्या हरभऱ्याच्या डहाळ्यांवर तुटून पडत. शेकोटीत हावळा भाजला जाई.

बघता बघता होळी येई आणि पिके पिवळी पडत. गहू हरभरा कापणीला येई. कुणी चांदण्याने, कुणी पहाटे लवकर गहू काढायला जाई. (उन्हाच्या रटात ओंब्याची टोके हातात जोरात घुसतात म्हणून उन्हाच्या आधीच गव्हाचे काड कापले जातात. ) हरभरा उपटून जागोजागी कडवं रचली जात. गव्हाचे काड कापून पेंढ्या बांधल्या जात. शाळूच्या कडप्या ऊन खात पडत.

फाल्गुनाच्या मध्यावर किंवा शेवटी रब्बीचे धान्य घरात येऊन पडे आणि शेतकरी सुस्कारा टाकत, जरा निवांतपणा येई. शेते ओस पडत जत्रा, यात्रा, उरूस यामध्ये शेतकरी हरवून जाई.

सन ९०-९५पर्यंत तर सुगीचे दिवस, शेतातील ती लगबग, पारंपरिक शेती चालू होती. त्यापूर्वी ७२-७३मोठा दुष्काळ पडला होता. तरीही माणुसकीचे मळे मात्र हिरवेगार होते. शेतीला प्रतिष्ठा होती त्यामुळं शेतीवर प्रेम तर होतेच पण निष्ठाही होती. यामुळं लोक शेतीत कसून कष्ट करायचे. पीक कमी जास्त झाले तरी गुरांच्या वैरणीचा तर प्रश्न  मिटत होता. निसर्गाचे चक्र कधी सरळ फिरते, कधी उलटे. निसर्ग कधी कृपा करतो, कधी अवकृपा. प्रचंड प्रमाणातील वृक्षतोडीने हळू हळू पाऊस ओढ देऊ लागला. शेतीची प्रतिष्ठा, निष्ठा कमी झाली. निसर्गातील बारकावे, निरीक्षण, अनुभव सगळं मागं पडलं. शिकलेल्या मुला-मुलींना स्वतःच्या शेतात काम करायला लाज वाटू लागली. जनावरांना चारा पाणी करण्याची लाज वाटू लागली. लोकांच्या गरजा वाढल्या, शेतीचे स्वरूप बदलले. नगदी पिके घेण्याकडे कल वाढला. कडधान्यावर कीड पडू लागली शेतकऱ्यांनी देशी वाण मोडले. बेभरवशाची शेती झाली. न परवडणारी मजुरी आणि मजुरांची कमतरता यामुळं शेतीचे यांत्रिकीकरण झाले. गुरे कमी झाली. नांगर गेले, बैलगाड्या मोडल्या. ट्रॅक्टर आले, गावाशेजारील जमिनी भरारा प्लॉट पाडून विकल्या गेल्या. कीटकनाशकांचा वापर वाढला. त्यामुळं जैवसाखळीतील विशिष्ट प्रकारची झुडपे, गवत, भाज्या लुप्त झाल्या पर्यायाने त्या त्या झाडाझुडपावरील, गवतावर पोसणारी, अंडी घालणारी शेतीसाठी उपयुक्त कीटकांची, फुलपाखरांची मांदियाळी नामशेष झाली.

निसर्ग बिघडायला दुसरं तिसरं कोणी कारणीभूत नसून आपणच आहोत. निसर्गाच्या विरुद्ध आपण वागू लागलो, प्लास्टिकचा अति वापर, बेसुमार लोकसंख्या, बदलती भोग विलासी चैनवृत्ती निसर्गाचा ऱ्हास करत आहे इतका की त्याचे अस्तित्वच धोक्यात आलेय. जास्त उत्पन्न देणारे हायब्रीड आले आणि गुरांना आवडणारा आणि सकस असणारा देशी जोंधळ्याचा वाण संपुष्टात आला. क्वचित क्वचित भागातच आता मोत्यासारखा देशी जोंधळा पिकतो अन्यथा हायब्रीड आणि शाळूच पिकवण्याकडे त्या त्या भागातील लोकांचा कल वाढला. पारंपरिक शेती संपल्याने विकतची वैरण आणून जनावरे पाळणे परवडेना. त्यामुळं धष्ट- पुष्ट जनावरांचे गोठे मोडले. घरातले दूध-दुभते, दही, ताक, लोणी, चीक असलं अस्सल नैसर्गिक सकस पदार्थ शेतकऱ्याच्या ताटातून  हद्दपार झाले आणि खाऊन पिऊन समृद्ध असणारी पिढी सम्पली. याचबरोबर शेजारधर्म, आपुलकी परोपकार, एकमेकांच्या शेतात हुरडा खायला जाणे, एकमेकांच्या शेतातले पसामूठ आपापसांत घेणे देणे बंद झाले. मिळून मिसळून कामे करणे, मिळून मिसळून रानात नेलेल्या फडक्यावरील भाजीभाकरी एकत्र खाणे शेतीचे अनुभव, ज्ञान परस्परात वाटणे, ऐकणे, अनुकरण करणे संपले.

शेतातल्या सुगीबरोबरच मानवतेच्या सुगीचाही आताशा दुष्काळ पडू लागला आहे, कदाचित पृथ्वीवरील माणसाचे पिकच कधीतरी नष्ट होईल आणि निसर्गाचे चक्र मात्र पुन्हा नव्याने जन्म घेईल. . . . .

— समाप्त — 

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments