सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ बाप्पाला निरोप… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

गेली दोन वर्ष कोरोनामुळे सगळ्या सार्वजनिक उत्सव आणि कार्यक्रमाला मर्यादा आल्या होत्या. ढोल, ताशा, डॉल्बी यांचे आवाज घुमत नव्हते. मिरवणुका काढल्या जात नव्हत्या.  नकळत सगळ्या कार्यक्रमांना निराशेची झालर लागली होती. पण यंदा मात्र गणपती उत्सव धूम धडाक्यात चालू आहे.  माणूस हा उत्सव प्रिय आहे. त्यातून महाराष्ट्रात तर सार्वजनिक गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या विरोधात समाजाला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना प्रथम गणरायाला वंदन केले जाते. बुद्धीदाता गणेश आणि शक्ती- स्फूर्तीदायी शिवाजी महाराज या दोन्हींचा जयजयकार महाराष्ट्रात होतो. या दोन्ही उत्सवांचा उद्देश समाजात स्फूर्ती रहावी, जिवंतपणा रहावा, समरसता यावी असाच आहे.

पण अलीकडच्या काळात या सर्वांना थोडी वाईट गोष्टींची साथ येऊ लागली होती. कित्येक तास चालणाऱ्या मिरवणुका, सजावटीमधील अतिरिक्त स्पर्धा, तसेच गुंडगिरी, दारू पिऊन नाचणे यासारख्या अनेक गोष्टी गणेशोत्सवादरम्यान होऊ लागल्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की तिथे परमेश्वर हस्तक्षेप करतो असं मला मनापासून वाटते. कोरोनामुळे मोठ्या मिरवणुकांना बंदी आली. काही अनिष्ट गोष्टी आपोआपच कमी झाल्या. वैयक्तिक पातळीवर घराघरातून गणपती बसवले गेले. परंतु सार्वजनिक कार्यक्रम दोन वर्षे बंद होते. यंदा पुन्हा नव्या जोमाने गणेशोत्सव साजरा केला गेला. आता महानगरपालिका विविध ठिकाणी विसर्जनासाठी हौद, निर्माल्यासाठी कुंड, यासारख्या गोष्टींची व्यवस्था करते. त्यामुळे आपोआपच एक प्रकारची शिस्त लोकांना लागली आहे. पुण्याचा गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. देश, परदेशातही पुण्याच्या गणपतीचे महत्त्व फार आहे.

यंदा दोन वर्षानंतर गणपती उत्सव पुन्हा एकदा उत्साहात साजरा होत आहे. वैयक्तिक पातळीवर गणेशाचा उत्सव हा घराघरात साजरा होतोच. त्यानिमित्ताने कुटुंब एकत्र येते. एकमेकांबद्दलचे राग, द्वेष, मतभेद यांचे गणपती बरोबरच विसर्जन झाले पाहिजे. आणि चांगल्या भावना दुर्वांप्रमाणेच वाढीला लावल्या पाहिजेत. दुर्वा जशा जमिनीला चिकटून वाढत वाढत जातात, विस्तारत असतात, तसेच कुटुंबाने एकमेकांशी चांगले संबंध ठेवून समाजजीवनाचा विस्तार केला पाहिजे. शाडूच्या मातीचा गणपती आपण पाण्यात विसर्जन करतो. त्या गणपतीची माती विरघळून तळाशी एकत्र येते- पुन्हा पुढच्या वर्षी नवीन निर्मितीसाठी ! तशी आपली वृत्ती अधिकाधिक एकत्र येण्याची, चांगले समाजमन निर्माण करण्याची राहिली पाहिजे. इतर देवतांपेक्षा गणपती आपल्याला जवळचा वाटतो. प्राणप्रतिष्ठा करून आपण त्याला सजीव रूप देतो. तो गणराया दहा दिवसात आपल्याला कितीतरी गोष्टी शिकवून जातो. घरातील लहान मुलाबाळांपासून सर्वांनाच गणपतीचे आकर्षण असते. गणपती दुकानात ठरवण्यापासून ते विसर्जनापर्यंत सर्व घर गणपतीमय झालेले असते. अलीकडे तर शाळातूनही शाडूची गणेशमूर्ती करायला शिकवतात. तसेच बऱ्याच घरी स्वतः केलेल्या मूर्ती बसवल्या जातात. असा हा गणपती बाप्पा ! त्याचे विसर्जन करायचे दिवस आले की सर्वांनाच फार वाईट वाटते ! कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे पाच दिवस गणपती असतो.  काहींच्याकडे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन होते. अनंत चतुर्दशीला सर्वच गणपतींचे विसर्जन होत असते. या काळात पाऊस कमी झालेला असतो, परंतु काही वेळा बरेच दिवस पाऊस असतोही !. तरीही लोक उत्साहाने सार्वजनिक गणपती आणि त्यांचे देखावे बघायला जातात. एकूणच गणपतीचे हे दिवस उत्साहाचे असतात.

नुकताच मोबाईलवर एक व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये एक लहान मूल गणपती बाप्पाच्या विसर्जनाला तयार नसते आणि अक्षरशः रडत असते. त्यावरून मला महादेव शास्त्री जोशांची “मोर भट” नावाची कथा आठवली.त्या गोष्टीतील मोर भटजी गणपतीचे इतके भक्त होते की, गणपती विसर्जनासाठी पाण्यात सोडला की त्यांना अक्षरशः रडू येत असे. आणि तो रिकामा पाट घरी घेऊन येताना त्यांचे मन इतके विषण्ण होई की घरी येऊन त्या रिकाम्या मखरासमोर ते दुःखी चेहऱ्याने बसत असत. खरोखरच बाप्पाला निरोप देताना मन भारावून जाते आणि अंतरीचा उमाळा भरभरून वाहू लागतो आणि आपण पुन्हा पुन्हा म्हणतो –” गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..”

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments