सौ कल्याणी केळकर बापट
मनमंजुषेतून
☆ अर्थपूर्ण प्रथा… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
सोमवारी संध्याकाळी गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घरं अगदी सुनंसुनं झालं. ह्या विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच एक हूरहूर लागलेली असते. वास्तविक पहाता माहित असतं बरं का, की हे गौरी गणपती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेत. तरीही त्यांच्या विसर्जनानंतर चैन पडत नाही ही पण गोष्ट खरीच. त्यांच्या आगमनाने आपले मन तसंच घरचं वातावरण खूप उत्साहवर्धक झालेलं असतं. घर कसं भरल्या भरल्यासारखं वाटतं.
ह्या सणावारांच्या निमित्ताने का होईना, आम्ही नोकरदार बायका देवासमोर चार घटका जरा शांत बसतो. नैवेद्य कुळाचार ह्या निमित्ताने चार निरनिराळे साग्रसंगीत पदार्थ करतो. ह्या निमित्तानेच आपल्याकडून रितीरिवाज, नेमधर्म पाळल्या जातात. चार माणसे, नातलग,आपले नेहमीचे रुटीन बदलून गौरीगणपतीच्या निमित्ताने एकत्र येतात. अशी एकमेकांची मनं जुळण्यासाठी, एकमेकांचा सहवास लाभण्यासाठीच जणू ह्या सणावारांचं नियोजन असतं. परस्परांशी एकोप्याने वागणे आणि जमेल तितकी मदत करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो.
आपण गौरीगणपतींना निरोप देतो खरा, पण निरोप देतांनाच पुढील वर्षी ह्याच मुहूर्तावर परत इतक्याच ओढीनं येण्याची कमिटमेंट घेतो. जणू पुढील वर्षी परतण्याच्या बोलीवरच आपण ह्यांना निरोप देतो. जरी गौरीगणपतींना निरोप देणं अवघडं जातं असलं, तरी ते एक संतुलित आखीवरेखीव ऋतूचक्र आहे हे पण विसरून चालणार नाही. गौरी म्हणजे माहेरवाशिणींचे प्रतिक आणि गणपती म्हणजे घरचा खंदा दिपकच जणू, ज्याला कर्तव्यपूर्तीसाठी एकाच जागी स्थिर राहताच येणार नाही. ज्याप्रमाणे माहेरवाशीण एकदा माहेरी चक्कर मारून
येते, तेथील सगळं क्षेमकुशल आहे ह्याची तिची खात्री पटली, की मग तिला आपल्या स्वतःच्या घराची ओढ लागते, त्याप्रमाणेच गौरी ह्याही माहेरवाशिणी. त्या औटघटकाच येणार. पण त्या अल्पकालावधीत पुरेपूर सौख्याचा आणि आनंदाचा शिडकावा करुन जाणार, प्रेमाची, मायेची पखरण करुन जाणार. त्यामुळेच मन त्यांच्या विरहानं जरा झाकोळलं असलं तरी आपल्याला गरज असतांना ह्या मदतीला धावून येणारच ही मनात खात्री आणि विश्वास पण तेवढाच असतो. जरी बाप्पाचे विसर्जन झाले तरी त्याच्या पूजेचा मान हा प्रथमच. त्यामुळे बाप्पाचंही अस्तित्व कायम मनात ठायी ठायी जाणवतं असतं बघा.
आपण गौरीगणपतींना निरोप देतांना शिदोरी म्हणून दहीपोहे किंवा दहीभात व मुरड-कानवला देतो. मुरड-कानवला म्हणजे हलक्या हाताने सारण भरून केलेली करंजी आणि त्याला हाताने घातलेली नाजूक एकसारखी मुरड. मुरड-कानवला दिल्यानंतर देव किंवा व्यक्ती मुरडून, म्हणजेच वळून परत आपल्याकडे येतेच असा समज आहे.
सहज करता येण्यासारख्या गोष्टी, आणि जुन्या प्रथा, ज्या केल्याने आपले नुकसान तर काहीच होत नाही, झालाच तर फायदाच होतो, त्या प्रथा करण्याचा प्रयत्न करावा. अर्थात हे माझे मतं. म्हणून सौ.आईने शिकविलेल्या गोष्टी– उदाहरणार्थ प्रवासाला, परीक्षेला, महत्वाच्या कामाला निघालेल्या आपल्या माणसांच्या हातावर दही देणे, तसेच कामानिमित्त प्रवासास बाहेरगावी जातांना देवाजवळ पैसासुपारी ठेवणे, अशा सहज गोष्टी ज्या माझी आई अजूनही कटाक्षाने पाळते, त्या मनोमन पटतात.खरचं ह्या प्रथा पूर्ण विश्वासाने केल्या तर अर्थपूर्ण असतात.
परत एकदा गौरीगणपतींना “ कायम आमच्यावर कृपादृष्टी असू द्या “ ही हक्काची विनंती करते.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈