डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ काष्ठशिल्पाची कथा… ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
नारायण धारप, रत्नाकर मतकरी, या सिद्धहस्त लेखकांची मी जबरदस्त चाहती. त्यांच्या भयकथा, त्यातली पात्रे, त्या आफ्रिकेतली गूढ वर्णने, ते वाडे– सगळे मनावर विलक्षण गारुड करतात. असा त्यांचा एकही कथासंग्रह नसेल,जो मी वाचला नसेल. सांगायचे कारण, ते लिहितात त्या सगळ्याच काही कपोलकल्पित गोष्टी नसतात. काही सत्यकथाही असणारच—-कारण मलाही एकदा असाच एक भयंकर अनुभव आलाय—–
—– गोष्ट आम्ही युरोप टूरला गेलो तेव्हाची. त्यालाही झाली सहज १५ वर्षे. आम्ही तेव्हा फ्लोरेन्सला गेलो होतो.
तिथून पिसाही फार लांब नाही. आम्ही पिसाचा झुकता मनोरा बघितला,आणि हिरवळीवर छान पाय पसरून बसलो.
रोम, इटलीला आफ्रिकन लोक फार मोठ्या संख्येने दिसतात. नाना वस्तू ते विकताना आढळतात. मी आणि माझी बहीण अशा दोघीच एका कंपनीबरोबर टूरला गेलो होतो.
“ ताई,चल ना जरा मार्केट मध्ये चक्कर मारू “, स्मिता म्हणाली.
बाकीचे लोक म्हणाले,’ जा तुम्ही,पण लवकर या बरं का.उगीच कुठे चुकलात तर पंचाईत होईल.’
आम्ही मार्केट बघायला निघालो. काय सुरेख सुरेख वस्तू मांडून ठेवलेल्या होत्या. अर्थात युरोमध्ये किमतीही अफाटच होत्या म्हणा. नुसत्या की चेन्स दहा युरो खाली नव्हत्या. अतिशय सुंदर, लेदरच्या टोट बॅग्स बघूनच समाधान मानावे.
पुढे गेलो तर दोन आफ्रिकन मुले अतिशय गुळगुळीत केलेले असे टेबलवर ठेवायचे लाकडी मोठे शोपीस विकत होती. काय सुरेख होते ते केलेले. काळेभोर शिसवी लाकडाचे. पाच गुळगुळीत डोके असलेले पुरुष एकमेकांना वेढून गोल करून वाकून उभे होते—-असे ते सुंदर काष्ठशिल्प बघून मी थबकलेच. मला अतिशय आवडले ते .आमच्या हॉलमधल्या सेंटर टेबलवर काय मस्त दिसेल हे, असा विचारही आला मनात. मी जवळ जाऊन बघितले,तर त्यांचे चेहरे क्रूर वाटले मला. पण तरी मी त्या मुलाला विचारून उचलून बघितले ते शिल्प— आणि माझ्या अंगावर एकदम भीतीचा काटा उभा राहिला. मी ते पटकन खाली ठेवले—
— मला अशा संवेदना,इतरांपेक्षा जास्त तीव्र होतात आणि लगेचच समजते की हे चांगले नाही. हा सेन्स मला अगदी लहानपणापासूनच आहे. मला जाणवत होते की ते काष्ठशिल्प अगदी वाईट शक्तीने भारलेले आहे. पण तरीही मला ते घ्यायचा मोहच होत होता. तो मुलगा त्याची किंमत खूप कमी करायलाही तयार होता. मला तर तीव्रपणे असे जाणवले की कसंही करून ते विकून त्याला मोकळं व्हायचंय.
मी त्याला विचारले, “ हे कुठून आणलंय तुम्ही? ”
सुदैवाने त्याला बऱ्यापैकी इंग्लिश येत होते. म्हणाला की असेच कोणीतरी त्याला विकलेय. “ पण तुम्ही घ्या ना हे. बघा ना किती सुंदर काम केलंय, अगदी गुळगुळीत केलंय. तुम्ही कुठून आलात? इंडिया का ? इंडिया चांगला देश आहे असं ऐकलंय मी.” तो म्हणाला.
मी पुन्हा त्या पुतळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितले. माझ्या डोळयांसमोर अचानक अंधार आला— एकदम एखाद्या गूढ जंगलात कसले तरी पडघम वाजताहेत असा भास झाला. पण काही केल्या मला त्या पुतळ्यासमोरून हलताच येईना. आता तर मला त्यांच्या चेहऱ्यावर रागाचे भाव स्पष्ट दिसत होते. माझी बहीण स्मिता शेजारीच उभी होती.
तिलाही असं काहीतरी वेगळंच जाणवलं असावं. तिने माझा हात ओढला आणि म्हणाली, “ ताई नको घेऊ हे . फार भयानक दिसतंय. किती हिडीस दिसतायत ही माणसं. कसा काय आवडलाय हा पुतळा तुला .शी…. अजिबात नको घेऊ हं. “
त्या मार्केटमध्ये आम्हीच दोघी उरलो होतो. बाकी लोक निघून गेले होते. तो मुलगा तर आता असं म्हणायला लागला होता की “ मी हे तुम्हाला गिफ्ट देतो, पण हे घ्याच तुम्ही.” तो ते माझ्या हातात कोंबूच लागला. आणि माझ्या अंगावर भीतीच्या लाटा उसळू लागल्या—स्मिताला काहीतरी जाणवले. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, “ ताई इथे नक्की काहीतरी गडबड आहे. आपण अगदी मूर्खासारख्या उभ्या आहोत.– लवकर पळ इथून.” —-
तिने मला तिथून अक्षरशः खेचत पळत न्यायला सुरुवात केली . तरी मी मागे ओढ घेतच होते.
“ थांब ना !आपण घेऊया की ग तो गिफ्ट देतोय तर.” मी मागे बघत बघत म्हणत होते. स्मिताने आता धावायला सुरुवात केली. परका प्रदेश– परकी भाषा– रस्ते– काहीच माहीत नव्हतं .आणि आतातर आम्ही कुठे आलोय हेही आठवेना. तिने मला कसेतरी फरपटत लांब नेले. तो मुलगा हातवारे करून बहुतेक आम्हाला त्याच्या भाषेत वाईट शिव्या देत होता. धावत धावत आम्ही आमच्या लोकांना येऊन भेटलो तेव्हा जीव भांड्यात पडला स्मिताचा.
तरीही मी म्हणतच होते तिला, “ अगं, निदान परत एकदा जाऊन नुसतं बघून तरी येऊया. किती सुंदर केलेय ग ते.”
आमच्या ग्रुपमधल्या लोकांनाही हे माझं सगळं काहीतरी वेगळं चालल्याचं जाणवलं असावं. त्यांनी घाईघाईने मला कडक कॉफी दिली आणि लगेचच आम्ही बसमध्ये बसलो.
सुदैवाने आमचा तिथे रात्री मुक्काम नव्हता. रात्री मला फणफणून ताप भरला. मलाच विचारून स्मिताने माझ्या बॅग मधल्या गोळ्या मला दिल्या. मला गाढ झोप लागली. स्मिताने सकाळी मला उठवलं—” ताई, बरं वाटतंय का?”
“ हो मस्त वाटतंय ! का ग?”
“ का ग काय? मूर्ख कुठली। रात्रभर मी जागत बसलेय तुझ्या जवळ. काय बोलत होतीस अग रात्रभर. कोणत्या तरी अगम्य भाषेत कोणाशी तरी जोरजोरात वाद घालत होतीस. मला इतकी भीती वाटत होती ना ताई. मग कधीतरी तुझं ते विचित्र बोलणं थांबलं आणि तुला झोप लागली. नाही तर मी खरंच कोणालातरी आपल्या रूममध्ये झोपायला बोलावणार होते.– ताई,अग हे सगळे त्या पुतळ्याचे प्रताप बाई. काहीही नाहीये का आठवत?”
“ नाही ग. पण सॉरी स्मिता !खूप त्रास दिला ग मी तुला.खरंच सॉरी! पण तो पुतळा बघितल्यावर मला काहीच सुचेना.
जणू मोहिनीच पडली मला त्याची. कुठंतरी जाणवत होतं की ती वाईट शक्ती आहे. पण तरीही जणू ते शिल्पच म्हणत होतं की ‘ घे मला ‘. खरं सांगते आहे. “
स्मिता म्हणाली ,” अक्षरशः ओढत ओढत आणलं तुला तिथून.” पण मला हेही आठवत नव्हतं .
मग आम्ही तिथून आणखी दुसऱ्या शहरात गेलो. नंतर पुन्हा मला असा काहीच त्रास झाला नाही. आमची सगळी ट्रीप खूपच सुंदर झाली.
आमच्या ग्रुपमधले नव्याने दोस्त झालेले लोक म्हणाले, ‘ काय ज्योतीताई, आम्ही पण काय घाबरलो होतो त्या दिवशी. स्मिताताईंची तर वाटच लागली होती.”
— मला मात्र हे काहीही आठवत नाही. मी तो पुतळा बघितला एवढेच मला आठवते. पुढचे काहीही नाही.
म्हणूनच नेहमी लक्षात ठेवावे— परक्या माहीत नसलेल्या ठिकाणी काही घेऊ नये असे आपले पूर्वीचे जुने लोक सांगतात ते मुळीच चुकीचे नाही— हा अनुभव तर हे चांगलेच शिकवून गेला मला–आणि स्मिताला पण.
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
अंगावर काटा आला
स्मिताने तेथून ओढून आणले नसते तर —-.नुसत्या विचारानेच अंगावर सरसरून काटा आला.