सौ कल्याणी केळकर बापट

? मनमंजुषेतून ?

मानाचा सॅल्युट… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

आज उद्या सुट्टी. नुकतचं मोठं मंगलकार्य पार पडल्यानंतचा शीण आलाय. गणपतीगौरी विसर्जनानंतर आलेला हा मानसिक आणि शारीरिक थकवा असतो.

घरच्या गौरीगणपतींचं विसर्जन झालं आणि घर सुनं सुनं वाटायला लागलं. घरं जरी सुनं सुनं झालं तरी जरा बाहेर पडलं की चौकाचौकात बसलेले गणपती, त्या भोवतालची आरास, स्पिकरवरील भक्तीगीतं आणि आरत्या ह्यामुळे उत्साहवर्धक मंगलमय वातावरण होतं.

काल अनंतचतुर्दशी झाली. गावातील  बाप्पांच्या मुर्तींचं पण विसर्जन झालं आणि मग खरोखरच सगळं शहर निस्तेज, शांत भासायला लागलं. सणसमारंभ आटोपले की एक प्रकारचं चैतन्यच नाहीसं होतं, एक मरगळ आल्याचा फील येतो.

हा सण सुखरूप, निर्विघ्न पार पडल्यानंतर सर्वप्रथम आभार मानायचे तर त्या पोलीस खात्याचे आणि रहदारी वर नियंत्रण ठेवणा-या ट्रॅफिक पोलिसांचे मानावे लागतील. खरंच किती ताण येतं असेलं नं ह्या दोन्ही खात्यांवर. गणपतीच्या मिरवणूकीतील गर्दीवर नियंत्रण ठेवणे, नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क असणे, ह्या प्रकारची अनेक महत्त्वाची कामे अक्षरशः तहानभूक विसरून पण पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडतांना बरेचदा त्यांना वैयक्तिक अडचणींकडे कानाडोळा करावा लागतो.

अमरावतीमध्ये गणपती आणि नवरात्रात चिक्कार गर्दी असते. गणपती बघायला आणि नवरात्रात देवींच्या दर्शनासाठी आजुबाजुच्या कित्येक गावागावांतून कुटूंबासहित लोक येतात. या सगळ्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष ताण हा पोलीस खातं, वाहतूक नियंत्रण खातं आणि आरोग्य खातं ह्यावर येतोच. कितीतरी पोलीस पुरुष व महिला कर्मचारी सुध्दा ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तैनात असतात. ह्या कालावधीत ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांना अजिबात रजाही मिळत नाही. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे ह्या खात्यातील कर्मचाऱ्यांवर सोपवलेली असतात. गर्दीला आटोक्यात ठेऊन भक्तांची नीट रांगेत व्यवस्था करणे, कुणी लहान मूल चुकून त्या गर्दीत हरविले तर त्याला सुखरूप त्याच्या पालकांपर्यंत पोहोचविणे, वयोवृद्ध मंडळींकडे जातीने काळजीपूर्वक लक्ष पुरविणे, गर्दीचा फायदा घेऊन घुसलेल्या भुरट्या चोरांचा मागोवा घेणे, एकाच जागी जास्त व्यक्तींना वा वाहनांना थारा न देणे, आणि ही सगळी व्यवस्था त्यांना लगातार आठ दहा घंटे सतत फिरस्ती राहून चोख बघावी लागते. खरंच सलग इतके घंटे उभ्याने काम करुन अक्षरशः पायाचे तुकडेच पडत असतील त्यांच्या .

गणपतीत दहा दिवस, आणि मध्ये जेमतेम पंधरा दिवस तीन आठवडे उलटले की परत नवरात्रात सलग नऊ दिवस पुन्हा तीच व्यवस्था बघणे हे अतिशय अवघड, कष्टाचंच काम आहे. ही व्यवस्था बघतांना ते कर्मचारी तहानभूक विसरून ऊन,पाऊस ह्याची पर्वा न करता इमानेइतबारे आपले कर्तव्य बजावीत असतात. शिवाय वेगवेगळ्या निवडणूकांच्या काळात देखील ह्यांच्या संयमाची कसोटीच लागत असते. 

शेवटी काय प्रत्येक ठिकाणी व्यक्ती तितक्या प्रकृती .एखाद्या वाईट अनुभवाने सगळ्या खात्यालाच त्या पँरामीटर मध्ये तोलणे योग्य नव्हे. शेवटी ती पण आपल्यासारखीच हाडामाणसाची माणसे हो. त्यांना पण त्यांच्या आरोग्याच्या, वैयक्तिक, कौटुंबिक विवंचना ह्या असतातच.पण तरीही मनापासून सेवा देणा-या ह्या खात्यातील समस्त कर्मचाऱ्यांना मानाचा सँल्युट.  

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments