डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ डॉ. रॉबर्ट्स— आमचा शेजारी ☆ डॉ. ज्योती गोडबोले☆
सातआठ वर्षांपूर्वी अमेरिकेला लेकीकडे गेले होते तेव्हाची गोष्ट.
मुलीच्या शेजारी नवीन झालेल्या घरात एक नवीन कुटुंब खूप सामान उतरवताना दिसले. आफ्रिकन अमेरिकन कुटुंब दिसत होते ते. खूप मोठा ट्रक भरून सामान येत होते. ३ लागोपाठची मुले, आईवडील असे दिसले.
इकडे लगेच शेजाऱ्याच्या घरात घुसून चौकश्या करायची अजिबात पद्वत नाही. पण चार दिवसानी तो तरुण शेजारीच आमच्या घरी आला. अतिशय अदबीने बोलत होता आणि मी डॉक्टर आहे म्हटल्यावर सहज त्याने सांगितले की तो oncologist म्हणजे कॅन्सर तज्ञ आहे आणि त्याची बायको आहे स्त्रीरोगतज्ञ. हे ऐकून तर आमचे डोळेच मोठे झाले. आधीच अमेरिकेत डॉक्टर तुफान पैसा मिळवतात, आणि त्यात हा कॅन्सर तज्ञ म्हणजे विचारूच नका.
हळूहळू त्यांची मुले बॅकयार्डमध्ये खेळताना दिसली. मुलगी मोठी होती आणि दोन मुलगे लहान. एक माझ्या नातीएव्हढाच असेल.डॉमिनिक त्याचे नाव. बोलता बोलता डॉ. रॉबर्ट्सने सांगितले, की हे लोक मूळ जमैकाचे.
त्याच्या आई वडिलांनी अतिशय कष्ट करून या मुलांना न्यूयॉर्कमध्ये आणले. हा डॉ.रॉबर्टस खूप हुशार होता म्हणून तो शाळेत तरी जाऊ शकला. अफाट कष्ट आणि फार उत्तम ग्रेडस मिळवून तो डॉक्टर झाला. तिथेच त्याला ही सिंथिया भेटली. तीही अशीच हैतीहून आलेली गरीब मुलगी. पण जिद्दीने डॉक्टर झाली आणि पुढे स्त्रीरोगतज्ञ सुद्धा.
मला फार कौतुक वाटायचे या डॉक्टरचे. दिवसभर राबून घरी आला,की कपडे बदलून लागलाच बागेत कामाला. खूप छान छान झाडे आणली त्याने आणि राबराबून स्वतः लावली देखील. त्याला बाहेरची माणसे बोलावून बाग करणे अशक्य होते का?– मी त्याच्याशी बोलताना आमच्या कंपाऊंड मधून विचारायची हे. तो हसून म्हणाला,” ग्रँडमा, हा माझा आनंद आहे. माझा स्ट्रेस रिलीव्हर आहे ही बाग. मला खूप आनंद मिळतो चिखलात हात भरले की.”
हळूहळू डॉ.रॉबर्ट्सची बाग सुंदर रूप घेऊ लागली. त्याने लावलेल्या गुलाबांना अक्षरशः शंभर शंभर कळ्या आल्या. त्या उमलल्यावर तर त्या झाडाचे देखणे रूप नजर ठरेना इतके सुरेख दिसू लागले. मला या तरुण मुलाचे फार कौतुक वाटायचे.
या उलट त्याची बायको ! सिंथिया कधीही बागेत काम करताना दिसली नाही. तिला मी एकदा विचारले तर हसून म्हणाली,”ओह। तिकडे हॉस्पिटलमध्ये कामाने दमून जाते मी आणि घरी ही तीन पोरे कमी देतात का त्रास. मला नाही आवड बागेची . रॉबर्ट्स करतोय ते बास झाले.”
तो रॉबर्ट्स असा सज्जन की कधीही मदतीला बायकोला बोलवायचा नाही .तीही पठ्ठी खुशाल त्याला बोलवायची आणि म्हणायची,” डिअर, जरा पिझा लावतोस का ओव्हनला? मी जरा वाचणारे उद्याच्या पेपर प्रेझेंटेशनचे.”
बिचारा निमूट हात धुवून आत जायचा – अदिती म्हणायची, “ बघ बघ, .किती गुणी कामसू नवरा आहे. मनात आणले तर आपल्यालाही विकत घेईल तो. काय भारी पगार असेल ना त्याला? पण किती नम्र आहे बघ.”
सिंथिया बाई जरा आळशीच होत्या. या तीन मुलांसाठी त्यांनी घरी २४ तास राहणारी गोरी मेड ठेवली होती. तिला वेगळी स्वतंत्र कार दिली होती. बघा तरी, एक काळा माणूस चक्क गोऱ्या लोकांना नोकर म्हणून ठेवू शकत होता.
खूप पगार तो सहज देऊ शकत होता तिला.. ही गोष्ट पण कौतुकाचीच होती ना? मला हेही भारी कौतुक वाटले.
पूर्वी वाचलेले ‘ एक होता कार्व्हर ‘ पुस्तक आठवले ,आणि त्या गरीब बिचाऱ्या बुकर टी.वॉशिंग्टनने अफाट सोसलेले कष्ट आठवून डोळ्यात पाणीच आले माझ्या. आज त्यांच्याच वंशातला एक मुलगा, एक गोरी बाई सहज नोकर म्हणून ठेवू शकतो हे केवढे कौतुक… आम्हाला या कुटुंबाचे नेहमीच कौतुक वाटायचे.
सिंथिया एकदा आमच्या घरी केक घेऊन आली होती. वर म्हणते, “ मी नाही हं केला.मला तितकीशी आवड नाही स्वयंपाकाची. डॉ.रॉबर्ट्सने केलाय. “— मनात म्हटले,’ बायो,अग किती ग गुणी नवरा मिळालाय तुला.”
मग आम्ही तिच्या बाउलमध्ये साबुदाण्याची खिचडी पाठवली. लेक म्हणत होती, “ आई,कमालच आहे तुझी बाई. हे खिचडी बिचडी त्यांना आवडेल का तरी? आपण देऊ कुकीज. उगीच काय तुझे काहीही.”
मी म्हटले “ देऊ या ग.नाही आवडले तर न का खाईनात.”— दोन दिवसानी हातात एक वही पेन्सिल घेऊन डॉ सिंथिया घरी आली.–“ ते काय होते केलेले ?ते डॉ.रॉबर्ट्स आणि माझ्या डॉमिनिकला खूप आवडले. काय आहे त्याचे नाव? त्याची रेसिपी सांगा ना प्लीज. मी करीन घरी.”
मी मनातल्या मनात कपाळावर हात मारून घेतला. आता हिला मी साबुदाणा कुठे मिळतो इथपासून तो कसा भिजवायचा हे कसे काय सांगू .मी तिला म्हटले “ सिंथिया,बाई,ही रेसिपी इंडियन आहे,तुला जमणार नाही ग. जेव्हा केव्हा खावीशी वाटेल तेव्हा मला सांग.मी देईन करून.”
सिंथिया हसली आणि म्हणाली,” ओह! Seems difficult hmm। ग्रँडमा, please u do it for me hmm.”
लाघवी होती खरी पोरगी. नंतरही आम्ही अनेकवेळा खिचडी करून दिली, आणि डॉमिनिक आणि त्याचा डॅडी आम्हाला,’वावा’ असे हात करून दाद द्यायचे.
अदिती नेहमी म्हणायची, ‘ डॉ.रॉबर्टस इथे नक्की राहणार नाही. तो खूप मोठ्या आलिशान,४ गराज असलेल्या घरात शिफ्ट होईल बघ लवकरच. तो नक्की त्यांच्या हॉस्पिटलजवळ असलेल्या खूप भारी आणि रिच कम्युनिटीमधेच घर घेणार एक दिवस. आमचीही कम्युनिटी आहेच भारी आणि उच्चभ्रू, पण हा याहूनही खूपच श्रीमंत वस्तीत जाणार बघ.” – अगदी तसेच झाले . मी भारतात परत आल्यावर काहीच महिन्यात रॉबर्ट्स कुटुंब तिथून हलले.
त्यांनी अदितीच्या कुटुंबाला त्यांचे नवे घर बघायला बोलावले होते. अदिती म्हणाली, “ काय सुंदर आहे घर त्यांचे.
केवढेच्या केवढे प्रचंड. लेक साईडजवळचे, राजवाड्यासारखेच—इथे असली घरे प्रचंड किमतीलाच मिळतात.
डॉ.रॉबर्ट्स ने अतिशय हौशीने सजवलेही आहे फार सुरेख. तू आलीस की तुला घेऊन ये असे नक्की स्पेशल आमंत्रण आहे बरं तुला. “
कधी मी जाईन का नाही हे मला माहीत नाही, पण जमैकासारख्या ठिकाणाहून आलेल्या एका जिद्दी डॉक्टरची ही झेप मला खरोखर फार कौतुकास्पदच वाटली.
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈