मनमंजुषेतून
☆ शिक्षक दिन मुबारक… सुश्री संध्या शिंदे ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆
वर्गातल्या सगळ्यांना भागाकार करता आला त्या दिवशी कित्येक कोटींची लॉटरी लागल्यागत सुखाची झोप लागणारा प्राणी आहे मी !
“मज्या आईनं विष पेलं रात्री. पण तुम्ही आज मॉनिटर निवडणार,म्हणून आलो शाळेत.मला मॉनिटर व्हयचंय मॅडम!” म्हणत काळीज चिरणारा, केस कापण्यासाठी पैसे नाहीत म्हणून हातानेच वेडीवाकडी कटिंग करणारा—- यश …
मी वर्गात चिडचिड केल्यावर जवळ येऊन हळूच “मिष्टर ला भांडून आलात का मॅडम?” म्हणणारी — तेजू…
शाळेच्या मागच्या गेटच्या पायर्यांवर बसलेल्या लहान बहिणीच्या जबाबदारी पोटी “बाथरूमला जायचंय” असं मला वारंवार खोटं बोलून वर्गाबाहेर, तिच्याकडे जाण्यासाठी माझा ओरडा खाणारा — माऊली….
केवळ माझ्या गाडीवर फेरफटका मारण्याची लहर आली म्हणून “मला घरी नेऊन सोडा.” असा हट्ट करणारी,आईचा नंबर माहीत असूनही तो न देता मला गावभर उन्हातान्हात फिरवणारी बालवाडीतली
टुचभर — सिद्धी….
पडलेला दात कंपासमध्ये जपून ठेवणारी, डोळ्यातलं बुबुळ कुत्र्याने दातांनी ओरबाडल्यावरही आईजवळ हट्ट करून, तिच्यासोबत शाळेत येऊन चाचपडत मला मिठी मारणारी—- वीरा…..
निसर्गाने आधीच दिलेले टप्पोरे डोळे अजूनच मोठे करून, दोन्ही कमरेवर हात ठेवून ” मी बुटकी आहे, म्हणून तुम्ही मला असं करतात ना?” असा चिमण्या आवाजात बिनाबुडाचे आरोप करणारी, मला पामराला सतत कचाकचा भांडणारी – थाक्ची….
“मला घरी आई नाही, पण शाळेत माझ्या मॅडम माझी आई आहेत.” असं शेवटच्या पानावरच्या निबंधात लिहिणारी — आकांक्षा….
बहिणीच्या लग्नासाठी आठ दिवसांची सुट्टी मिळवण्यासाठी मला साडीचं आमिष दाखवणारा — अर्णव…
मनाविरुद्ध, परिस्थितीसमोर हतबल होऊन आईसोबत ऊसतोडीला गेलेलं व सर्पदंशामुळे मातीआड झालेलं हसरं दुःख.. — सौरभ….
आपल्या बाळाला कडेवर घेऊन धावत धावत येऊन माझ्या वर्गात शिरलेली , ” माझं नाव या हजेरीत लिहा! “असं पोटतिडकीने म्हणणारी उध्वस्त— संगीता….
माझ्या साडीच्या निऱ्या धरून वर्गाबाहेर फरफटत आणून ” मेरकु चाय पीने का जी…. घरकु जान दो…नै तो तुम पिलाव चाय…तुमको दुवा लगेगी जी! ” असं जोरजोरात ओरडणारी डेंजर — अलिजा….
खोडरबरमुळे वहीवर होणारा कचरा साफ करण्यासाठी अब्बूचा दाढीचा ब्रश शाळेत घेऊन येणारी— जोया…
पर्समध्ये झुरळ बघितल्यावर मी किंचाळत टेबलवर चढल्यावर माझी उडालेली तारांबळ, फजिती माझ्याच मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपणारा मॉनिटर—- नयन….
एचआयव्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याक्षणी डेस्क लागून रक्तबंबाळ झालेला, मला अस्वस्थ अस्वस्थ करून सोडणारा — विश्वजीत….
काय काय अन् किती सांगू..? मर्यादा आहेत…
एकोणविसावं वर्ष सुरू आहे…
एकोणवीस बॅचेस…
असंख्य चालत्या फिरत्या जिवंत कादंबऱ्या वाचल्यात मी यादरम्यान………
या 19 वर्षांत एकही दिवस, एकही क्षण ह्या लेकरांनी माझ्यातल्या शिक्षकाला मरू दिलं नाही… मरु काय, झोपू दिलं नाही……. झोपूच काय…….. पण साधं पेंगू सुद्धा दिलं नाही…
कुठलंही सिस्टम, वर्क प्लेस म्हटलं की राजकारण, हेवेदावे, चढउतार हे आलेच.
पण का कुणास ठाऊक? वर्गाच्या चौकटीआत शिरताना ते सगळं सगळं टेन्शन दाराबाहेर ………
लेखिका – संध्या शिंदे
(अंबाजोगाई जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका)
प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈