श्री उदय गोपीनाथ पोवळे
☆ बाप्पा आणि तो… ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे☆
बाप्पा आलास काय आणि गेलास ही. अगदी आमच्या मुलासारखाच. तो पण पूर्वी असाच यायचा. शिकायला म्हणून अमेरिकेला गेला आणि तो कायमचा तिकडचा झाला. सुरुवातीला, आला की जरा स्थिरस्थावर होतो ना होतो, तोच आठ दहा दिवसांत परत जायचा. अगदी तुझ्यासारखाच. आता तू तरी दरवर्षी नित्यनियमाने ठरलेल्या वेळेस न विसरता येतोस. पण त्याचे तसे नाही. गेले कित्येक वर्षे तो येतो सांगून आला नाही. दरवर्षी तुझ्यासारखीच त्याचीही वाट बघतो पण काही खरं नसतं. येण्याच्या एक दिवस आधी त्याचा फोन येतो. कामानिमित्त त्याला घरी यायला जमणार नाही असे तो सांगतो तेव्हा हिच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात आणि नेमक्या त्या माझ्या भुरकटलेल्या डोळ्यांना दिसतात. पण तुझे मात्र तसे नसते. तू येतोस वेळेवर आणि जातोस ही वेळेवर. चटका लावून जातोस पण ठीक आहे. मनाला पुढच्या एक वर्षासाठी उभारी देऊन जातोस. मला आणि हिला जगण्याची एक नवीन उमेद देतोस आणि आशेची नवीन पालवी मनात उभी करतोस. आज ना उद्या तो घरी येईलच ह्याची मनात आशा निर्माण करतोस.
— बाप्पा खरं सांगू, आता आमचीच खात्री नाही रे. अरे आमचेच विसर्जन होते की काय असे वाटू लागले आहे. आता तूच सांग, आमच्या दोघांतील एकाचे विसर्जन झाल्यावर तू किंवा तो आलास तरी आत्तासारखे तुमचे लाड होणार आहेत का ? अरे पुढच्या वेळेला तुम्ही आलात आणि आमच्या दोघांतील एकाचे कायमचे विसर्जन झाले असेल तर तुम्ही आलात काय आणि परत गेलात काय, आम्हाला त्याचे अप्रूप राहील का ? म्हणूनच बाप्पा एक काम कर. तूच त्याचे कान उपट आणि त्याला बुद्धी देऊन आम्हाला भेटायला पाठव. अरे त्याला जरा समज दे आणि सांग, तो लहान असतांना त्याच्या हट्टापायीच आम्ही तुला घरी विराजमान केला होता ना. त्याच्यासाठी म्हणून तुझे सगळे लाड आम्ही पुरवत होतो ना. अरे आता आम्हाला वयानुसार तुझे साग्रसंगीत लाड करायला जमत नाही. पण तो येईल आणि आल्यावर त्याला सगळे पहिल्यासारखे दिसायला पाहिजे म्हणून आम्ही ते सगळे करतोय. पण आता थकलोय रे आम्ही.
बाप्पा, एक मात्र चांगले आहे. जशी तू पुढच्या वर्षी येण्याची आशा लाऊन जातोस, तसा तो लांब असला तरी कधीतरी येईल ह्याची आशा लागून रहाते. ह्याबाबतीत तरी आमचे नशीब थोर की तो आहे म्हणून, तो कधीतरी परत येईल ह्याची खात्री वाटते. बाप्पा तो, तुझ्या काय किंवा आमच्या दोघांच्या विसर्जनाला जरी आला नाही तरी त्याला मात्र तू उदंड आयुष्य दे आणि त्याला त्याच्या उतारवयात पोरका मात्र करू नकोस.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी नक्की या.
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
ठाणे
मोबा. ९८९२९५७००५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈