सौ कल्याणी केळकर बापट
मनमंजुषेतून
☆ स्वप्न… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
“स्वप्नं” किती तरल, हळूवार, अलगद, नाजूक शब्द पण व्याप्ती किती मोठी. स्वप्ने जरूर बघावीत पण स्वप्नरंजन नको. स्वप्नांच्या मागे जरूर लागावे पण तेच अंतिम सुख आहे असे वाटणे नको. कधीकधी स्वप्नांमुळे उत्तुंग यशाचे शिखर गाठता येते, तर कधी ह्याच स्वप्नांच्या ध्यासामुळे आपण निराशेच्या गर्तेतही ढकलल्या जातो. स्वप्नांपेक्षाही वास्तवतेची कास धरा, सकारात्मक व्हा. जास्त अनुभव मिळतो .
मला स्वतःला जी लोकं उत्तुंग, आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने बघतात त्यांच्याबद्दल प्रचंड कौतुक, आदर वाटतो. पण मला स्वतःला स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर लहान लहान स्वप्नं बघण्यात जास्त आनंद मिळतो.एकतर लहान स्वप्ने आवाक्यातील असतील तर लौकर पूर्ण होतात आणि अल्प गोष्टीतही समाधान, सुख,आनंद शोधण्याची सवयच लागून जाते कायमची.
बरेचदा स्वप्ने बघतांना आपण पराकोटीची मेहनत करतो,ही चांगलीच गोष्ट आहे.परंतु ह्याचा दुष्परिणाम जर आपल्या प्रकृतीवर होत असेल तर तीच स्वप्नं आपल्याला महागात पण खूप पडतात. माझ्या मते स्वप्नं ही जिन्याच्या पाय-यांसारखी असतात. त्या एकेका पायरीवर क्षणभर विसावा घेऊन दुसरी पायरी चढावी, म्हणजेच दुसऱ्या स्वप्नाकडे वळावं. एका दमात पूर्ण जिना चढून जाण्याच्या प्रयत्नात ,सगळी स्वप्ने झटक्यात कवेत घ्यायच्या प्रयत्नात, शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचेस्तोवर आपला जोर, दम संपुष्टात येऊन त्याचा स्वाद घ्यायला ना आपल्यात जोर शिल्लक राहतो ना उत्साह. मोठ्या स्वप्नाच्या मागे लागतांना कदाचित आपण लहान लहान आनंदाला पण मुकून जातो.
स्वप्नांचे इमले चढवितांना ध्यास असावा पण हव्यास नको. स्वप्नांची पूर्तता करतांना माणसे तोडण्यापेक्षा जोडण्यालाच नेहमी प्राधान्य द्यावं. स्वप्ने पूर्ण व्हावीत ही इच्छा जरूर असावी पण अट्टाहास नको. शेवटी काय हो सगळ्या मानण्याच्याच गोष्टी. तुकडोजी महाराज म्हणतातच नं ,” राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या.” जशीजशी समज येते,आणि प्रगतीची कास धरावी वाटू लागते तशीतशी माणसाला स्वप्ने बघायची सवय लागत असावी असं वाटतं. अर्थात माणसाला स्वतःची उन्नती करावयाची असेल तर नुसतं स्वप्नं बघून पण भागणार नाही. ती स्वप्नं पूर्णत्वास कशी जातील ह्याचा पण विचार करायला हवा.साधारणतः किशोरावस्था ते अख्खं तरुणपण हा काळ स्वप्नरंजनासाठीच असतो जणू. मग नंतर कुठे वास्तविकतेचं भान येऊन आणि अनुभवाचे टक्केटोणपे खाऊन सत्य परिस्थिती सामोरी आल्यावर खरं भान येते.
स्वप्न हा विषय काल एका गमतीनं सुचला. स्वप्नं बघणं आणि स्वप्नं दिसणं ह्या दोन भिन्न बाबी आहेत. झोपेत ब-याचश्या व्यक्तींना स्वप्नं दिसतात. साधारण आपण दिवसभरात ज्या गोष्टी बघतो, अनुभवतो त्याच्याशी निगडित स्वप्नं पडतात. परवा एकदा टिव्हीवर बातम्या बघत असतांना एका बड्या व्यक्तीच्या घरं व प्रतिष्ठानांवर “ईडी”ची पडलेली धाड दाखवत होते.आजकाल नवीनच फँड आलंय. एकच बातमी आणि त्याच्याशी निगडीत फुटेज हे मेंदूवर हँमरींग केल्यासारखं वारंवार कित्येकदा दाखवलं जातं. दिवसभर ती ईडीची धाड बघितली. त्या को-या करकरीत नोटांच्या थप्प्यावर थप्प्या आणि सोने,चांदी, हिरे मोती,प्लँटीनम ह्यांचे घरातून निघालेले दागिने बघून मी बँकर असूनही मला चक्कर आल्यागत वाटलं. त्यानंतर होणारी ती झाडाझडती, ते आरोप, ते आपल्याच घरात चोरासारखं बसणं बघून वाटलं आपल्याकडे गरजेपुरतीच संपत्ती आहे हेच छान.
दिवसभर तेच बघितल्यामुळे असेल वा डोक्यात तेच बसल्यामुळे असेल मलाही रात्री माझ्या घरी धाड पडल्याचं स्वप्नात दिसलं. घरी दागिने, नोटांच्या थप्प्या काहीच नसल्याने मी स्वप्नातही नेहमीसारखीच निर्धास्त होते. पण स्वप्न आत्ता कुठे सुरू झालं होतं,आणि मस्त नाँनस्टाँप झोपेची सवय असल्यानं स्वप्नंही सुरुच राहणार होतं. त्या धाड टाकणा-या अधिका-यांनी सर्वप्रथम वाँर्डरोब कुठे आहे विचारले. दागिने, नोटांच्या थप्प्या नव्हत्याचं त्यामुळे त्या सापडण्याचा प्रश्नच नव्हता. त्या अधिका-याने सांगितले की ही ईडीने “साडी” ला संपत्ती समजून टाकलेली ” धाड” आहे. आता मात्र माझं धाबं दणाणलं.
वाँर्डरोब उघडल्याबरोबर माझी ईस्टेट म्हणजे माझ्या साड्यांची गिनती चालू केली. त्या साड्यांच्या थप्प्या ते भराभर उलगडून मोजू लागले. तरी नशीब मला सरसकट बायकांना त्या साड्यांच्या घडीत नोटा ठेवायची सवय असते ती सवय अजिबात नव्हती. नाहीतर अजूनच आफत होती.
त्या एकएक साडीबरोबर त्यांच्या घड्यांसारख्या त्याच्याशी निगडीत एकेक आठवणींचे पदर उलगडायला लागलेत. साड्या हा बायकांचा विकपाँईंट. आईनं, बहीणीनं, वन्संनी आणि सगळ्या जवळच्या लोकांनी दिलेल्या साड्या मी त्यांना खुलासा म्हणून एक एक प्रसंग ,साडी देण्याचं निमीत्त असलेलं सबळ कारण सांगू लागले. मी सांगतांना थकतं नव्हते पण ते अधिकारी मात्र ऐकतांना घामाघूम होत होते. ते म्हणाले हे बायकांचे एकमेकींना साड्या गिफ्ट द्यायचे फंडे आम्हा माणसांच्या लक्षातच येत नाही.
त्या अधिक-यांनी घामाघूम होत माझ्या साड्यांचे गठ्ठे मारले आणि एवढ्यात त्यांच्या कार्यालयात फँक्स आला म्हणे. साड्या हे अतिशय कष्टानं जमवलेलं, जीवापाड जपलेलं स्त्रीधन असल्याने त्यावर कुणीच कायद्यानं जप्ती आणूच शकत नाही. तेव्हा परत मनातल्या मनात स्वतःच्या नशीबाला दोष देत त्या अधिका-यांनी माझा जसा होता तसा साड्यांच्या व्यवस्थित घड्यांनी माझा वाँर्डरोब परत नीट लावून दिला.
तेवढ्यात फटफटल्यासारखं वाटलं आणि खडबडून जाग आली. सरावाने उठल्याबरोबर हात मोबाईलकडे वळला आणि बघते तो काय– वन्संनी माझ्यासाठी घेऊन ठेवलेले चार पाच साड्यांचे फोटो व्हाट्सएपवर माझ्याकडे बघून हसत होते. आणि मी सुद्धा परत एकदा वाँर्डरोब उघडून माझी संपत्ती डोळे भरून बघितली आणि रात्री पडलेलं हे एक दुःस्वप्नं होतं हे जाणून कामाला लागले.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈