डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ अर्ध्यावरचा डाव जोडला…. भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

असाच एक सोमवार… पंधरा दिवसातल्या एका सोमवारी मी इथे येत असतो. इथं चौकात समोर जे मंदिर दिसतंय ना? बरोबर त्याच्या समोर एक दृष्टीहीन जोडपं रस्त्यात भीक मागत उभं असतं… या जोडप्याला लॉक डाऊन मध्ये आपण मास्क आणि सॅनिटायझर तथा तत्सम वस्तू विक्रीसाठी दिल्या होत्या. 

हे दोघेही लहानपणापासून शंभर टक्के अंध…. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी की, यांना जी दोन मुलं आहेत ती पूर्णतः व्यवस्थित आहेत…एक लहान मुलगा आणि एक तरुण मुलगी….आणि हे दोघे…. इतकाच चौकोनी संसार !

“ती” आणि “तो” एकमेकांना सांभाळून घेत आयुष्य जगत आहेत… “ती” कधी शक्ती होते तर “तो” कधी सहनशक्ती ! 

त्याच्या लहानपणी आई-वडिलांनी दगड मातीचं घर अर्थात एक निवारा उभारला होता…. इतक्या वर्षात हा निवारा हळूहळू पडत गेला….. एक दिवस तर असा आला की, हे दोघे आपल्या मुलांना घेऊन उघड्यावरच झोपायचे. या दोघांना आणि मुलांना पाहून आसपासच्या अनेक दयाळू लोकांनी यांना पुन्हा निवारा बांधून देण्याचा प्रयत्न केला… तरीही हा निवारा पूर्ण झालाच नाही…. एके दिवशी गोळ्या-औषधं घेता घेता बिचकत तो मला म्हणाला, “डॉक्टर साहेब थोडं काम राहिलंय घराचं… तुम्हाला काही मदत करता येईल का ? मला मदत करा हो….”  तो अत्यंत कळवळून बोलत होता. …. 

कळकळ, तळमळ आणि वेदना या नेहमी डोळ्यात दिसतात … याच्याकडे तर डोळेच नव्हते…

पण ही वेदना आणि तळमळ त्याच्या आक्रसलेल्या चेहऱ्यावरून ओघळून वाहत होती अश्रू सारखी… ! 

तसा हा नेहमी हसत मुख असतो…….. पण म्हणतात ना टेबल जर स्वच्छ आणि टापटीप दिसत असेल तर समजावं, त्याचा ड्रॉवर खचाखच भरला आहे नको असलेल्या गोष्टींनी …! यानेही सर्व वेदना नक्कीच मनातल्या ड्रॉवरमध्ये    लपवून ठेवल्या असतील…. 

मी पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी गाडीवर बसलो….. समोर रस्त्याऐवजी त्याचा तो आक्रसलेला चेहरा आणि रात्री रस्त्यावर तरुण मुलगी, एक लहान मुलगा  आणि पत्नीसह असुरक्षित जागी राहणारा त्याचा संसार दिसत होता….!

त्याला खरी काळजी होती त्याच्या तरुण मुलीची….!!! 

या कुटुंबाचं नेमकं काय आणि कसं करावं? हा विचार करतच गाडी चालवत असताना एका ज्येष्ठ स्नेह्यांचा मला फोन आला. ते म्हणाले, “ अभिनंदन डॉक्टर, 14 एप्रिल रोजी आदरणीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या जयंती निमित्त आपणास ” भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” जाहीर झाला आहे…नक्की या. “

“ होय होय…. धन्यवाद सर “ म्हणत मी फोन ठेवला. 

मनात पुन्हा विचार आला…. आदरणीय बाबासाहेबांना अपेक्षित असणारं गाव / राज्य / देश अजून तरी निर्माण झालंय का ? माझा त्यात हातभार कितीसा आहे ?  इतक्या मोठ्या माणसाच्या नावे पुरस्कार घेण्याची माझी खरंच पात्रता आहे का ? ……. हा विचार सुरू असताना उघड्यावर राहणाऱ्या त्या  कुटुंबातील व्यक्तींचे चेहरे पुन्हा माझ्यासमोर फेर धरून नाचू लागले…. काय करता येईल या विचाराने मी अस्वस्थ झालो…! 

या अस्वस्थतेत पुन्हा फोन वाजला…. मी अनिच्छेने फोन उचलला…. पलीकडे माझे मित्र श्री जिगरकुमार शहा होते. सच्चा दिलदार माणूस ! 

“ काम कसे सुरू आहे ? काय चाललंय ? माझ्याकडून काही मदत हवी आहे का ? “ अशा प्रकारची चर्चा सुरू असताना, फोन ठेवते वेळी ते मला म्हणाले, “ डॉक्टर तुम्हाला तर मदत करतोच आहे…. पण त्यासोबत तुम्हाला जर कोणी अत्यंत अडचणीत असलेली, मदतीची नितांत आवश्यकता असलेली कुणी अंध / अपंग व्यक्ती सापडली, तर मला नक्की कळवा…..  या वर्षात मला अशा एखाद्या व्यक्तीला डायरेक्ट मदत करायची आहे…! “

….. माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना…. मला वाटलं गाडी चालवत असताना, गोंगाटामुळे मला चुकीचं काहीतरी ऐकू आलं असावं…..जवळपास किंचाळत मी त्यांना पुन्हा विचारलं, “ सर गाडीवर आहे, नीट आवाज आला नाही,  आवाज ब्रेक होतोय…. पुन्हा एकदा बोला शेवटची वाक्ये प्लीज …! “…. मी ऐकलं ते खरं होतं…. त्यांना तेच म्हणायचं होतं ! 

मी गाडी बाजूला घेऊन थांबलो….नुकत्याच भेटलेल्या दृष्टिहीन दाम्पत्याची कर्मकहाणी मी त्यांना सांगितली…. त्यांना डायरेक्ट मदत करण्याविषयी विनंती केली…. अगदी सहजपणे ते म्हणाले…., “ Okk Doc, I don’t have any problem…. तुम्ही सांगताय म्हणजे ती व्यक्ती आणि कुटुंब Genuine असणार याची मला खात्री आहे. आजपासून या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझी.”

जिगरकुमार शहा साहेब नुसतं एवढं बोलून थांबले नाहीत…. तर त्यांनी या दृष्टिहीन दाम्पत्याच्या घराच्या खर्चासह, त्यांच्या मुलामुलीच्या शिक्षणाची आणि त्यांच्या इतर सर्वांगीण विकासाची जबाबदारी स्वतःच्या डोक्यावर घेतली आहे… !… हे सर्व करायला नुसता पैसा असून चालत नाही…. मनामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी करायची “जिगर” असावी लागते…! 

आपल्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा होते ती “वेदना”…. परंतु जेव्हा दुसऱ्याला लागतं आणि आपल्या डोळ्यातून पाणी येतं तेव्हा जी होते ती “संवेदना”…!

….. अशा या संवेदनशील माणसाला मी मनातूनच साष्टांग नमस्कार घातला…. ! हरखून त्यांना म्हटलं, “ सर कधी करूया हे सर्व ? “

ते म्हणाले, “ १४ एप्रिलला मला सुट्टी आहे त्या दिवशी सर्व आटोपून टाकू…चलेगा ??? “ 

“ दौडेगा सर…” म्हणत मी गाडी मागे वळवली आणि त्या कुटुंबाला ही बातमी सांगायला परत निघालो…. 

यानंतर “तिच्या” आणि “त्याच्या” चेहऱ्यावर पसरलेल्या आनंदाचे चित्र रेखाटण्यास, माझी लेखणी असमर्थ आहे… ! 

उन्हानं…. घामानं आपला जीव कासावीस व्हावा …. घशाला कोरड पडावी…. आणि तेवढ्यात समोर आंब्याचं झाड दिसावं…. या झाडाच्या थंडगार सावलीत आपण टेकावं आणि इतक्यात कुणीतरी येऊन वाळा घातलेल्या माठातल्या थंडगार पाण्याने भरलेला तांब्या आपल्यासमोर धरावा…. घट घट करून, पाणी पीत आपण आपला जीव शमवावा आणि उरलेलं पाणी ओंजळीत घेऊन, चेहऱ्यावर त्याचे शिपकारे मारावेत…. यासारखी तृप्तता नाही…. ! 

…… “त्या “दोघांचे समाधानाने भरलेले चेहरे आणि जिगर साहेबांचा दिलदारपणा याने हीच तृप्तता मला लाभली… ! 

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी…. अर्ध्यावरचा डाव जोडला… अशी ही गोड कहाणी ! 

—–क्रमशः भाग पहिला… 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments