सौ कल्याणी केळकर बापट
मनमंजुषेतून
☆ नवरात्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆
नवरात्र — सगळीकडे चैतन्याची,उत्साहाची उधळण. देवीचं अस्तित्व हे मन प्रसन्न करणारं, शक्ती प्रदान करणारं. ह्या नवरात्रीतील नऊ दिवसांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवींचे मुखवटे, त्या मुखवट्यांवरील तेज क्षणात नजरेसमोर झळकतं. निरनिराळी पीठं असणाऱ्या मखरातील देवींची रुपं आणि अगदी रोजच्या आयुष्यात सहवासात येणाऱ्या चालत्या बोलत्या हाडामासाच्या स्त्रीशक्तीची रुपं आठवायला लागतात. ह्या नवरात्रीच्या चैतन्यमय नऊ माळाआपल्याला चैतन्य, उत्साह ह्यांचं वाण देतांनाच खूप काही शिकवतात सुध्दा.
ह्या नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवी- म्हणजेच वेगवेगळ्या शक्तींची आठवण होते. ह्या शक्ती आत्मसात करण्यासाठी मनात नानाविध विचार, योजना आकार घ्यायला लागतात.
सगळ्यात पहिल्यांदा, ह्या शक्ती आपण आत्मसात करुच शकणार नाही असं वाटायला लागतं. पण लगेच “ प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे ” ह्या म्हणीनुसार ‘आपण करून तर बघू. पूर्ण अंगिकारता नाही आले तरी निदान काही तरी तर निश्चितच हाती लागेल ‘ हा सकारात्मक विचार मनात बाळसं धरु लागला.
पहिल्यांदा, आपण आपल्यात चांगले बदल हे कोणी मखरात बसविण्यासाठी वा आपला उदोउदो करण्यासाठी करावयाचे नसून ते फक्त आणि फक्त आपल्या सर्वांगीण विकासाकरीता,आपल्यात सकारात्मक जागृतता येण्याकरिता करावयाचे, हे आधी डोक्यात फिट केले. त्यामुळे आपल्यातील चांगले बदल हे कोणाच्या निदर्शनास नाही आले तरी चालतील पण आपलं स्वतःचं मन स्थिर झालं पाहिजे. फळाची अपेक्षा न करता फक्त सत्कर्म करणे ह्याकडे आपला कल झुकला पाहिजे, आणि हा बदल औटघटकेचा न ठरता कायमस्वरूपी झाला पाहिजे यावर कटाक्ष राहिला पाहिजे, हे मनाशी ठरविले.
सगळ्यात पहिल्यांदा अष्टभुजादेवी आठवली. सतत उन्नतीकरिता आठ हात वापरुन कामाचा उरका पाडणारी,अष्टावधानी होऊन बारीकसारीक गोष्टींकडेही लक्ष पुरविणारी– ही अष्टभूजा तर आपण व्हायचं हे ठरवलं, पण संसार,नोकरी ह्यावरची तारेवरची कसरत सांभाळतांना,आठ आठ हातांनी काम करतांना आपली दमणूक होऊ द्यायची नाही हे पण ठरविलं. ह्या सगळ्या जबाबदा-या हसतहसत आनंदाने पार तर पाडायच्या, पण त्या पार पाडतांना आपणच आपली स्वतःची काळजी घेऊन आपलं मनस्वास्थ्य आणि प्रकृतीस्वास्थ्य पण जपायचं, हा पण मनाशी निश्चय केला.
दुसरी देवी आठवली सरस्वती, म्हणजेच बुध्दीची देवता. ह्या देवीकडून चिकाटीने ज्ञान मिळवायचं. कारण दरवेळी ह्या देवीला नजरेसमोर ठेऊन उघड्या जगाकडे दृष्टी टाकली तर आपण जे शिकलो त्याच्या कित्येक पटीने जास्त शिकायचं अजून शिल्लकच आहे ह्याची जाणीव होते. सरस्वतीदेवीकडे बघून अजून एक गोष्ट प्रकर्षांने जाणवली ती म्हणजे आपल्याला आत्मसात झालेलं ज्ञान, कला, ही निस्वार्थ हेतूने सगळ्यांमध्ये वाटली तरच त्याचा चांगला विनियोग होईल. त्यामुळे ह्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतांना, म्हणजेच देतांना वा घेतांना हात आखडता राहणार नाही ह्याची खबरदारी घ्यायची हे लक्षात आलं.
मग आठवली देवी अन्नपूर्णा. खरचं सगळ्यांना तृप्त करणारी ही अन्नपूर्णा म्हणजे शक्तीचा एक अद्भुत चमत्कार. ही अन्नपूर्णा होतांना एक मात्र ठरविलं- आपल्या ह्या शक्तीचा वापर खरंच गरज असणाऱ्यासाठी आधी करायचा. ओ होईपर्यंत आकंठ खाऊन झालेल्यांवर आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा भुकेल्यावर,गरजूंवर ह्या शक्तीचा वापर करण्याला प्राधान्य द्यायचं. आपली ही शक्ती आपल्या लोकांसाठी, घरच्यांसाठी कामी आणायची, विशेषतः लेकाला घरचंच अन्न गोड लागावं, बाहेरचे अन्न, हॉटेलच्या डिशेस ह्यांनी पैशाचा चुराडा करून प्रकृतीची हेळसांड करुन घेण्यापेक्षा घरच्या अन्नाला मुलांनी प्राधान्य द्यावं ह्याकडे मी कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे, तरच ह्या अन्नपूर्णेच्या शक्तीला पूर्णत्व येईल. नाईलाजास्तव बाहेरचं अन्न खावं लागणं आणि घरी असतांना चोचले पुरविण्यासाठी बाहेरचं अन्न मागवून खाणं ह्यात जमीन अस्मानाचा फरक असतो.
मग दुर्गा, महिषासुरमर्दिनी आठवली– सगळ्या संकटांना हिमतीने तोंड देणारी, संकटकाळी धावून जाणारी, तितक्याच तीव्रतेने आपल्यावर होणारा अन्याय सहन. न करणारी.
आणि मी मनापासून एक बँकर, एक शिक्षक असल्याकारणाने आठवली आर्थिक डोलारा सांभाळणारी लक्ष्मीदेवी. धनाचा संचय तर करणारी, पण त्याचबरोबर त्याचा अपव्यय न होऊ देणारी, काटकसरीत धन्यता मानणारी, पण खरोखरच्या गरजा भागवतांना मागे पुढे न पाहणारी, भवितव्यासाठी पैसा जमवितांना त्याची लालसा मात्र न करणारी.
नवरात्राची पहिली माळ जिच्यासाठी असते ती शैलपुत्री पार्वती. यक्षपुत्री देवी सती आणि महादेव ह्यांच्या अपमानाने क्रोधीत आणि व्यथित झालेली देवी सती देहत्यागासाठी तयार होते. देह नश्वर असल्याने तो विलीन होतो, परंतू आत्मा मात्र हिमालपुत्री म्हणजेच शैलपुत्रीच्या रुपाने परत येतो. “ देह नश्वर आणि आत्मा अमर “ हे ज्ञान, ही शिकवण, दुर्गेच्या नऊ रूपांपैकी पहिलं रुप असणाऱ्या शैलपुत्री पार्वती हिच्याकडून शिकण्यासारखी.. दुर्गेच्या नऊ रूपांपैकी आणखी एक रुप म्हणजे देवी ब्रह्मचारिणी. भगवान शिव ह्यांचा पतीरुपात सहवास घडावा ह्यासाठी देवी ब्रह्मचारिणी हिने वर्षानुवर्षे बिल्वपत्र वाहून, उपवास करून भगवान शिवाची आराधना केली आणि आपल्या निरंतर तपस्येने शिवाला प्रसन्न केले. म्हणूनच मनःपूर्वक तपस्येचा दाखला म्हणजे हे देवी ब्रह्मचारिणी, दुर्गेचे दुसरे रुप. देवीपुराणानुसार देवी ब्रम्हचारिणी नित्य तपस्येत आणि आराधनेत लीन असल्याने तिचे तेज उत्तरोत्तर वाढत गेले अशी आख्यायिका आहे. त्या तेजामुळे त्यांना गौरवर्ण व तेज प्राप्त झालं असं म्हणतात. ब्रम्हचारिणी हा शब्द संस्कृतच्या दोन शब्दांपासून बनला आहे.ब्रह्म ह्याचा अर्थ ” घोर तपस्या ” आणि “चारिणी”चा अर्थ आचरण करणे,अनुकरण करणे. म्हणूनच देवी ब्रह्मचारिणी हिच्या एका हातात कायम उपासना करणारी ” जपमाळ ” , तर दुसऱ्या हातात कधीही कुठल्याही त्यागासाठी तयारीत असल्याचे प्रतीक म्हणून कमंडलू असतं. योग्य अशा एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावासा वाटला तर तो किती मनापासून घ्यायला हवा, त्यासाठी एखादी तपस्या करावी तसे किती प्रयत्न आणि कष्ट घ्यायची तयारी असायला हवी, आणि त्यासाठी कुठल्याही त्यागासाठी मन कसे तयार असायला हवे हेच शिकवणारी ही देवी ब्रह्मचारिणी.
ह्या सगळ्यांमध्ये स्वतः ला विसरून वा वगळून चालणारच नाही. अशी सगळी देवींची अनेक रुपे डोळ्यासमोर फेर धरुन नाचू लागली आणि त्यांच्यातील सगळे सद्गुण हळूहळू का होईना अंगिकारायचे ठरविणारे हे माझे आजचे रुप मलाच खूप भावून गेलं, स्वतःवर पण प्रेम करायला शिकवून गेलं.
© सौ.कल्याणी केळकर बापट
9604947256
बडनेरा, अमरावती
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈