सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
☆ आत्मसाक्षात्काराचा क्षण… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता गाडगीळ ☆
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. शनिवार होता, पारावरच्या मारुतीला एक भक्त शेंदूर लावत होता. कडेने एका हातात तेलाची बुधली आणि एका हातात रुईच्या पानांची माळ घेऊन बरीच मंडळी उभी होती. अचानक त्या मारुतीच्या अंगावरचं शेंदराचं आवरण गळून पडलं आणि….
…… आणि आत दिसली गणपतीची सुबक मूर्ती. लोक आश्चर्यचकित. आता हे तेल ओतायचं कुठं आणि ही माळ घालायची कुणाच्या गळ्यात ?
आपलही असंच होत असतं. परमेश्वर सगळ्यांना पृथ्वीवर पाठवतांना पाठवतो फक्त माणूस म्हणून. स्वच्छ कोरी मनाची पाटी, निखळ हसू आणि अत्यंत भावस्पर्शी नजर घेऊन. आपण दहा बारा दिवसातच त्याचं नाव ठेऊन
पहिला जातीचा शेंदूर फासून मोकळे होतो. मग हळूहळू त्याची पंचेंद्रिये काम करू लागतात. त्याच्या मनाच्या पाटीवर कधी घरातले, कधी बाहेरचे काहीबाही खरडून ठेवतात. घर, कुटुंब, गाव, शाळा, कॉलेज, समाज, यामध्ये वावरत असताना एकावर एक विचारांचे, विकारांचे लेप नुसते थापले जातात. आणि मग जणू हीच आपली ओळख आहे अशा थाटात आपणही वावरायला सुरुवात करतो. वरचेवर थापले जाणारे हे लेप, हे मुखवटे, मग आपल्यालाही आवडायला लागतात. माणसं, समाज काय तेलाच्या बाटल्या, हार घेऊन उभे असतातच. नजरेतला विचार हरपतो. त्याची जागा विखारानं घेतली जाते. आपल्यातल्या मूळ स्वरूपाची जाणीव हळूहळू नष्ट होते.
अचानक एक दिवस काहीतरी घडतं आणि ही शेंदराची पुटं आपोआप गळून पडतात. आतलं मूळ चैतन्य प्रकट होतं. तो क्षण आत्मसाक्षात्काराचा असतो. सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय सहसा हे घडून येत नाही. हा क्षण खूप मोलाचा असतो. खूप प्रयत्नपूर्वक सांभाळावा लागतो. नाहीतर गडबडीत आपणच परत आपल्या हाताने आपल्याला शेंदूर फासून घेतो. कारण त्या शेंदऱ्या स्वरूपाची सवय झालेली असते. लोकांच्या तेलाची, माळेची, नमस्काराची भूल पडलेली असते.
आणखी एक क्षण असा मुखवटे उतरवणारा असतो तो म्हणजे शेवटचा क्षण. परमेश्वर सगळे चढलेले मुखवटे, आवरणं, दागिने, एवढंच काय, कपडेसुद्धा काढून ठेवायला लावतो. ज्या मूळ शुद्ध स्वरूपात आणून सोडलं होतं त्या मूळ स्वरूपात घेऊन जातो. बरोबर येतं फक्त आपल्या भल्याबुऱ्या कर्माचं गाठोडं, ज्याचा हिशोब वर होणार असतो. म्हणून या जीवनप्रवासात जर अधेमधे कुठे हे शेंदराचे मुखवटे गळून पडले, तर तो आत्मसाक्षात्काराचा क्षण ओळखा…. त्याला जपा.
नाहीतर आहेच……
“पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननीजठरे शयनं…. “
लेखक : अज्ञात
संग्राहिका : स्नेहलता गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈