सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
☆ माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षण… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆
….. काल 19 ऑक्टोबर 22 हा अख्खा दिवस फारच आनंदात गेला. कोथरूडला कमिन्स कंपनी समोर, मुलींच्या अंधशाळेच्या शेजारी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान आहे. त्यांच्यातर्फे २१ तारखेला धन्वंतरी पूजनाचा मोठा कार्यक्रम असतो. त्यासाठी त्यांनी हा संपूर्ण आठवडा दिनांक २३ पर्यंत तेथील जंगल पाहण्यासाठी आवाहन केले होते. आम्ही मैत्रिणी काल सकाळी नऊ वाजताच घरातून उत्साहाने निघालो. खूप लांबून लांबून कोणी कोणी आल्या होत्या. साडेदहापर्यंत तिथे सगळ्या एकत्र जमलो. सौ पल्लवी जमदग्नी ही माझी मैत्रीण आहे. तिने उत्साहाने आमचे स्वागत केले .त्यानंतर संपूर्ण जंगल पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी सुसज्ज आधुनिक कॅमेरा देऊन एक पुरुष आणि एक महिला आमच्याबरोबर दिली. त्या ठिकाणी खूप मोठे जंगल आहे. त्याला “ मियावाकी जंगल “ म्हणतात.
मियावाकी हा जपानी शास्त्रज्ञ आहे. त्याने पडीक जमीन जिथे असेल तिथे औषधी वनस्पती लागवड करावी अशी सूचना केली. त्याप्रमाणे या संस्थानने या ठिकाणी भरपूर आयुर्वेदिक झाडे लावली. काही आपोआप देखील आली. पण अनेक वैशिष्ट्यपूर्ण झाडांची त्या ठिकाणी रेलचेल आहे. सुदैवाने काल वरुणराजाची कृपा झाली. चक्क ऊन पडले होते. त्यांनी आम्हाला मोठ्या मोठ्या छत्र्या दिल्या, ऊन लागू नये म्हणून. पण जंगलात शिरताच खूप सावली होती. तेथील सेवक अतिशय उत्साहाने प्रत्येक झाडाची माहिती देत होते. आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडले पण त्यांनी न कंटाळता आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. तेथील आवळ्यांनी डवरलेले झाड पाहताच किती वय झाले तरी आमच्या महिला एकदम हरकून गेल्या आणि आम्हाला आवळी भोजनाला इथे परवानगी द्याल का असे बिनधास्त विचारले. त्यांनी देखील हसून परवानगी दिली. ते सारे जंगल, त्यातील पायवाटा, त्यातील अनोखे वृक्ष, त्यांना लगडलेल्या वेली, त्यावर आलेली फळे, फुले पाहून आम्ही देहभान हरपून गेलो.
दोन तास त्या ठिकाणी हिंडत होतो .अधून मधून त्यांचे सेवक ट्रेमधून ग्लासातून स्वच्छ थंडगार पाणी आणून आम्हाला देत होते. अखेर त्यांनी एकच बाजू दाखवली आणि हॉलमध्ये आम्हाला येण्यास सांगितले. तिथे प्रत्येकाला स्वतंत्र बेंच, समोर खूप मोठे डेस्क होते . एकदम शाळेत गेल्यासारखे वाटले. तिथे गेल्या गेल्या अमृततुल्य चहा मिळाला. त्यानंतर काही भाषणे झाली. तेथील एका डॉक्टर महिलेने आयुर्वेदाविषयी अतिशय सुंदर माहिती दिली. आमच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देखील दिली. त्यानंतर सर्वांना राजगिरा लाडू, केळी असा पौष्टिक खाऊ दिला. खूप सुंदर वाटले. खाली धन्वंतरीची सुबक मूर्ती होती. त्याची सुंदर पूजा ,रांगोळी मांडली होती. तो सगळा परिसर भारावून टाकणारा होता. अगदी “आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे ” अशी अवस्था झाली होती . त्यानंतर आम्ही घरी परतलो पण येताना पल्लवी म्हणाली, तुम्ही जंगल निम्मेच पाहिले आहे पुन्हा याल तेव्हा उरलेले निम्मे दाखवते.
हे सारे जंगल त्यांनी अवघ्या तीन वर्षात उभे केले आहे. कमाल आहे की नाही? आम्ही तर फोटो काढलेच पण तेथील सेविकेने भरपूर सुंदर फोटो काढून आज आम्हाला पाठवले. अगदी तृप्त तृप्त वाटले. ज्यांना हे जंगल पहायचे आहे त्यांनी खालील नंबर वर कृपया संपर्क साधून हा आनंद जरूर घ्यावा.
सुश्री पल्लवी जमदग्नी
8668514969
लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈