श्री सुहास सोहोनी
मनमंजुषेतून
☆ मन एक गुरू त्राता ☆ श्री सुहास सोहोनी ☆
कधी वाटले, पुन्हा एकदा –
घ्यावा वेध, अपुल्याच मनाचा –
होतो जैसा, तसाच आहे –
किंवा बदल घडे का साचा ॥
वाचावी उलटुनिया पाने –
अपुल्या जीवनगाथेची –
निरखावी आपुलीच प्रतीमा –
तटस्थ बुद्धीने साची ॥
मूल्यांकन आपुलेच आपण –
कसे करावे समजेना –
करून तुलना दुसर्याशी मग –
जाणावे, उमगले मना ॥
गुणवैगुण्ये आणि परिस्थिती –
लाभली मज जी दैववशात् –
जोखावी तोलुन दुसर्याशी –
ज्यास लाभली भाग्यवशात् ॥
बुद्धी क्षमता कार्यचतुरता –
त्याची माझी तोडीस तोड –
सौख्ये मजला कमी न मिळती
परि त्याची चाले घोडेदौड ॥
तरीही कौतुक मनात त्याचे –
हेवा नाही तिळमात्र –
परंतु काटा वैषम्याचा –
मनात सलतो दिनरात्र ॥
तुलना करता कुणी खालती –
तसेच वरचढ दिसती कुणी –
वरची पायरी कुणी गाठता –
न्यूनगंड का रुजे मनी ॥
विचार चुकीचा मलाच कळले –
अन कळले की विचारण्याला –
गुरू न कोणी अंतर्मनसा
मार्ग योग्य तो दाखविण्याला ॥
सूर मारला नि:शंकपणे –
खोल मनाच्या डोहात –
वेगाने गाठला तळ जसा –
मीन पोहतो दर्यात ॥
उघड्या नेत्री धुंडाळुनिया –
कोनकोपरा अंतरिचा –
शोध घेतला गूढ मनाचा –
उत्कटतेने बिनवाचा ॥
दूर दिसे देव्हारा त्यातच –
दिसले मजला आंतरमन –
समाधिस्थ योगिसे बैसले –
घालुन चक्री पद्मासन॥
मी काही बोलणार त्याच्या –
आधिच त्याने खुणाविले –
करोनिया स्मितहास्य तयाने –
निकटी मजला बैसविले ॥
“जाणून होतो येणारच तू” –
कथिता त्याने दिग्मुढ मी –
“झाला भ्रम बुद्धीस तुझ्या जो –
निवारितो मी एक क्षणी” ॥
आंतरमन मग सांगू लागले –
“तन मन बुद्धीची शुचिता –
प्रामाणिक राहून स्वत:शी –
जपणे रे आपुली स्वत:” ॥
“आत्मपरीक्षण करून घेण्या –
विचार सुचला तुला भला –
उत्तर मिळण्या परी तुवा जो –
मार्ग निवडला तो चुकला” ॥
“मूल्य जाणण्या स्वत: स्वत:चे –
तुलना तर करण्यास हवी –
परंतु दुसर्यासवे करुनिया –
वाट न धरि खोटी फसवी “ ॥
“तुलना करणे असेल तर मग –
फक्त करावी स्वत: स्वत:ची –
नैतिक आणि सनदशीर ती –
गाठील सज्जनतेची उंची ॥
“कालच्याहुनी अधिक चांगला –
आहे का मी आज पहावे –
सत् प्रत्यय भूषीत सर्व गुण –
जमतिल तितुके मिळवावे” ॥
बोलुन इतुके लुप्त जाहले –
आंतरमन अदृश्यात –
मी ही परतलो मनडोहातुन –
पिऊन उपदेशाचे अमृत ॥
अपुली बुद्धी, नशीब अपुले –
अपुल्या निष्ठा, अपुले संचित –
मिळकत माझी कां तोलावी –
व्यर्थ दुज्याच्या तराजुत ॥
कधीच नाही नंतर केली –
तुलना दुसर्या वा तिसर्याशी –
माझा मीच यशस्वी झालो –
प्रामाणिक राहून स्वत:शी ॥
वैषम्यासम न्यूनगंड अन् –
भाव नकारात्मक मनिचे –
कसे वितळले गळून गेले –
भाव सकारात्मक सजले ॥
रचना : सुहास सोहोनी, रत्नागिरी