? मनमंजुषेतून ?

 ☆ मनुष्य इंगळी, अति दारूण…लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री माधव केळकर ☆ 

“ पणत्या कशा दिल्या काकू? ”

“ नक्षीच्या ६० रूपये डझन आणि साध्या ४० रूपये डझन ”

“ मला ६ हव्यात.”

“ ६ नं कुठं दिवाळी होत असती का दादा? दोन्ही घ्या की एकेक डझन.. नव्वद ला देते मी..”

हो-नाही, हो-नाही करत करत शेवटी एक डझन पणत्या घ्याव्यात असा निर्णय झाला. ‘वैशाली’त उत्तप्पा मागवताना एवढा विचार नाही करत कुणी. पण पणत्या सहा घ्याव्या की बारा? याचा निर्णय घेण्यासाठी पाच मिनिटं घेतो आपण. माणसाची तऱ्हाच निराळी.

लग्न ठरवण्यासाठी भेटताना बरिस्ता किंवा सीसीडी मध्ये भेटून बिलासाठी पाचशे रूपयांच्या दोन नोटा देणाऱ्या तरूणाचं रूपांतर, लग्नानंतर एक किलोच्या भावात घासाघीस करून पाव किलो भाजी घेणाऱ्यात कसं होतं, ते आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल. याला दुटप्पीपणा म्हणता येणार नाही, ही स्वाभाविक वृत्ती आहे. कोणत्या गोष्टी गृहीत धराव्यात, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यावं, कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात, याच्या धोरणांमध्ये गडबड झाली की जगण्या-वागण्याची पुढची सगळी समीकरणं चुकतच जातात आणि आपल्याच चुकांमुळं हे घडतंय, हे बहुतांश लोकांच्या लक्षातही येत नाही.

“ हव्यात कशाला ढीगभर पणत्या? दारात लावायला दोन पणत्या पुरे झाल्या.” असं म्हणणाऱ्या गृहलक्ष्मीनं स्वत:चा चारखणी वाॅर्डरोब उघडून त्याचं ऑडीट करावं आणि मग पुढची प्रत्येक साडी खरेदी करताना “ हवेत कशाला ढीगभर कपडे? ” असं म्हणावं. जमेल का?

एका ग्राहकरूपातल्या गृहलक्ष्मीला समोरच्या विक्रेतीमधली गृहलक्ष्मी दिसू नये, हे स्वत:च्याच कोषात गुरफटून गेलेल्या कमालीच्या असंवेदनशील व्यक्तिमत्वाचं लक्षण आहे.

मंडई- तुळशीबागेपासून खरेदी सुरू होते, तेव्हा पाकीट लहान असतं, तिथल्या वस्तू महागड्या वाटतात. पुढं बेलबाग चौकातून डावीकडे वळलं की, तेच पाकीट प्रत्येक पावलागणिक आकारानं मोठं-मोठं व्हायला लागतं आणि खरोखरच्या महागड्या गोष्टीसुद्धा स्वस्त वाटायला लागतात. हा केवळ वस्तूंच्या खरेदी-विक्रीतला खेळ नाही, हा माणसांच्या जगण्याविषयीच्या अस्पष्ट आणि अंधुक कल्पनांचा खेळ आहे.

एक जुना प्रसंग सांगतो. जोगेश्वरीच्या बोळात एक विक्रेता मेणाच्या उष्णतेवर चालणाऱ्या पत्र्याच्या बोटी विकत होता. मला त्या बोटी हव्या होत्याच. मी त्या निवडून घेत होतो. एक तरूण वडील आपल्या मुलाला घेऊन आले. त्यांना एक बोट हवी होती.

“ केवढ्याला दिली रे? ”

“ साठ रूपये साहेब.”

“ साठ? अरे, खेळणं विकतोस की खरी बोट विकतोस? ”

“ खेळणंच आहे.”

“ साधी पत्र्याची तर आहे. माझ्या लहानपणी पाच रूपयांना मिळायची. आता साठ रूपये? वीसला दे.”

“ साहेब, माझी खरेदीच चाळीस रूपयाची आहे. वीसला कशी देऊ?”

तेवढ्यात त्यांच्या लहान मुलानं सूर लावला. “ पप्पा, मला प्ले स्टेशन देणार होतात तुम्ही. मला हे नकोय. हे एकदम थर्ड क्लास आहे.”

“ चल. देतो तुला प्ले स्टेशन.”

बाप-लेक निघून गेले. तीस हजार रूपयांचं प्ले स्टेशन घेताना त्यानं पाचशे रूपयांत मागितलं असेल का? “आमच्या वेळी तर असलं काहीच नव्हतं. म्हणून दे आता फुकट.” असं म्हटलं असेल का त्यानं? नक्कीच नाही. तो काय, कुणीच असं म्हणणार नाही.

“ दादा, हे गिऱ्हाईक दुसऱ्यांदा येऊन गेलं बघा. नुसतंच बघून भाव करून जातो. खरेदी तर करत नाही.” मी निरूत्तर होऊन त्याचा निरोप घेतला. पण तो मुद्दा मनात राहिला तो राहिलाच.

डाॅ. कलामांनी एकदा प्रश्न विचारला होता, “ जगातली सगळ्यात मोठी समस्या कोणती? ” त्यावर एका लहान मुलीनं उत्तर दिलं होतं, “ गरिबी.” त्या मुलीचं उत्तर किती खरं होतं, याचा प्रत्यय दरवर्षी दिवाळी आली की येतो. सणासुदीच्या वस्तू, ज्याला आजकाल ‘सिझनल्स’ म्हणायची पद्धत आहे, ती बाजारपेठ ही खरं तर आपल्या देशातली एक प्रचंड मोठी बाजारपेठ आहे. पण अन्य व्यवसायांच्या चकचकाटात तिची गर्भश्रीमंती आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही. या बाजारपेठेचे विक्रेते शालेय शिक्षणाच्या दृष्टीनं अडाणी असतीलही पण भारतीय मनांचं आणि सश्रद्धतेचं मर्म त्यांना अचूक उमगलेलं आहे. त्यांना या गोष्टींना ब्रॅन्डचं रूप देता आलेलं नाही, ही गोष्ट खरी आहे, पण त्याचं कारण कदाचित या बाजारपेठेचं असंघटित असणं हेही असू शकेल. त्यामुळे तो दोष माणसांचा नाही, असलाच तर तो चुकीच्या धोरणांचा आहे आणि कोरोनाच्या सावटाखालच्या या दिवाळीत तर त्याचा रंग अधिकच ठळकपणे दिसतो आहे.

वडापाव विकणारा, चहा विकणारा आणि झेंडूची फुलं विकणारा असे तीन विक्रेते एकाच रस्त्यावर शेजारी शेजारी उभे राहून व्यवसाय करतायत. त्यात वडापावच्या भावाची घासाघीस होत नाही आणि चहाचीही होत नाही. पण झेंडूची फुलं विकणाऱ्याशी मात्र जवळपास प्रत्येकजण घासाघीस करतो, हुज्जत घालतो. गजरे विकणाऱ्यानं दहा रूपये असं म्हटलं की, ‘ पन्नासला सहा देतोस का? ’ असं दहापैकी नऊ जण विचारतातच. पण वीस-पंचवीस वडापाव खरेदी करूनही ते वडापाव विक्रेत्याला हा प्रश्न अजिबात विचारत नाहीत, पैसे देतात. तसं पाहिलं तर, दोघेही रस्त्यावरचेच विक्रेते. मग हा फरक का?

फरक विक्रेत्यात नाही, फरक आपल्या दृष्टिकोनात आहे. आपल्याला स्वत:ला बदलावंच लागेल..!

लेखक : श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर,पुणे.

प्रस्तुती – श्री माधव केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments