सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
☆ पँपरींग… लेखिका – सुश्री शितल ☆ प्रस्तुती – सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ ☆
खरंतर या इंग्लिश शब्दाला मराठीत खूप छान अर्थ आहेत—- लाड , कोड, कौतुक , जपणूक, सांभाळणे , गोंजारणे ……अर्थातच या सगळ्या क्रिया किंवा इतिकर्तव्य ही आपल्या आसपास असणाऱ्या लोकांनी एकमेकांसोबत करायची असतात. आपले कुटुंबिय किंवा आपले वडिलधारे लोक आपलं कौतुक करत असताना आपण लहानपणापासून पहात आलोय. तद्वतच आपणही आपल्या जवळच्या लोकांचं यथायोग्य कौतुक आणि लाड करतोच.
कौतुक आणि लाड हे समोरच्याने केले की त्याचा गोडवा वाढतो.
पण …पण…पण धावत्या जगाबरोबर आत्मकेंद्रित होत चाललेली माणसं, संकुचित आणि इर्षेखोर मनं , कामाच्या व्यापाच्या नावाखाली मी भोवती आखून घेतलेली नेणीवेची आवर्तनं, यांच्या वावटळात या पॅंपरिंगचाचा अक्षऱश: पाचोळा होतोय … मी आणि माझं काम हे सगळ्यात मोठं, दुसरा माझ्यापेक्षा मोठा होऊच नये ही भावना, किंवा मी माझ्या व्यापातून इतरांना वेळ देऊच शकत नाही, आता ज्याने त्याने स्वावलंबी व्हावं ही जाणीवेची धग, नात्यांच्या आणि भावभावनांच्या बंधांना एकटेपणाचे चटके देत राहतीय ..
बाहेरचे, परके, नातेवाईक वगैरे ठीक आहे. पण कधी कधी आपल्या घरच्या रक्ताच्या नात्यांकडूनही असाच अनुभव तरळून जातो, आणि मग येते एक विषण्णता, वैराग्य, किंवा चीड आणि क्रोध.
पण खरं सांगायचं तर हे सगळं आता इतकं पुढं गेलंय ना, की आपण ठरवलं तरीही यात बदल करु शकत नाही. सोशल लाईफ , सोशल मीडिया आणि सोशल एडिक्शनच्या तिकडीवर सोशल अवेयरनेसचं मात्र वाटोळं होत चाललंय ..
मी , माझा , माझं , मला , या ‘ म ‘ च्या आवर्तनात गुरफटलेला प्रत्येक माणूस समोरच्यापासून दूर आणि मग्रूर होत चाललाय. यात सगळेच आले– अगदी तुम्ही आणि मी सुद्धा …..
पण हे झालं समोरच्यासाठी. जेव्हा अशा पॅंपरींगची गरज मला स्वत:ला असते तेव्हा काय करावं बरं … आली का पंचाईत– म्हणजे दुसऱ्यासाठी विणलेल्या जाळ्यात आता आपणही अडकणार तर ?—– आज आता मला कुणाच्या तरी खंबीर खांद्याची, कुरवाळणाऱ्या हातांची आणि मायेच्या कुशीची गरज आहे, पण कुणीच नाहीये सोबत किंवा ते कुणी करत नाहीये ….
अशा वेळी तडक उठावं– मस्त आवडीचे कपडे घालावे– मोठा प्लान असेल तर बॅगच भरावी —–
आणि कर्तव्य, जाणीवा, व्याप, जबाबदारीची सगळी लक्तरं आपल्याच अंगणातल्या झाडाखाली ठेवून … सरळ स्टार्टर मारावा आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी जाऊन बसावं —- अगदी एकटं —-डोंगराच्या कड्यावर , नदीच्या काठावर , मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा निर्जन बेटावर — आपल्याला आवडेल अशा ठिकाणी जावं , आपल्याला आवडतं ते खावं , आपल्याला आवडतं ते संगीत लावावं, आवडेल तसं हसावं, आवडेल तसं रडावं , आवडेल तसं बागडावं, आवडेल ते……ते सगळं करावं —–
—–उघड्या माळावर बसून आपणच आपल्या कौतुकाचं एक छानसं भाषण करावं— आपणच त्यावर टाळ्या वाजवाव्या— आपल्याला आवडती फुलं आपणच गिफ्ट करावी—- रोमॅंटिक साँग लावून अगदी मध्यरात्री वाईनच्या ग्लाससोबत सोलो डान्स करावा —- आपणच आरशात बघून आपल्यालाच कॉम्प्लीमेंट द्यावी —- आपणच आपल्या फोटोला करकचून मिठी मारावी —- खळखळून हसावं, देखणं दिसावं, आणि स्वत:च्या मिठीत स्वत:च विसावावं …….. मस्त समुद्रावर जावून त्याच्या डोळ्यात डोळे घालून त्याची खोली मोजावी – आव्हान द्यावं सागराला — चल मोजून पाहू कोण जास्त गहिरं आहे – तुझं अंतरंग, की मी — माझ्या मनाचे तरंग.
—– मस्त मनसोक्त वागावं, मनसोक्त जगावं आणि दुःख, तणाव, व्याप, एकटेपणाची खेटरं भिरकावून द्यावीत खोल दरीत आणि शांत झोपी जावं ………
—– कारण सकाळी उठायचं असतं— पुन्हा एकदा त्याच आपमतलबी जगाशी सामना करायला —- नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने ——
लेखिका : सुश्री शितल
प्रस्तुती : सुश्री स्नेहलता दिगंबर गाडगीळ
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈