श्री अमोल अनंत केळकर
मनमंजुषेतून
☆ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं … श्रीधर जुळवे ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
साधा सर्दी खोकला झाला की आलं, तुळस काढा घ्यायचो,
पोट दुखलं की ओवा चावत जायचो – ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो
ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट, ना हॉस्पिटलच्या एडमिशनमध्ये अडकत होतो…
निरोगी आयुष्य जगत होतो..
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
राम राम ला राम राम, सलाम वालेकुम ला, वाले कुम अस सलाम
आणि जय भीम ला जय भीम नेच प्रेमाने उत्तर देत होतो
ना धर्म कळत होता, ना जात कळत होती, माणूस म्हणून जगत होतो…
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी
आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,
हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू, लंचचा चोचलेपणा आणि
डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारीपेक्षा दिवसभर भरपेट चरत होतो…
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो, रामायणात रंगून जात होतो,
चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो, ना वेबसिरीजची आतुरता, ना सासबहूचा लफडा ,
ना बातम्यांचा फालतू ताण सहन करत होतो… खऱ्या मनोरंजनाचा आस्वाद घेत होतो…
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
सण असो की जत्रा, सुट्टी मिळेल तेव्हा वेळ मस्त कुटुंबासोबत घालवत होतो,
चार मित्रांमध्ये मिसळत होतो, लोकांमध्ये उठत बसत होतो…
ना टार्गेटची चिंता होती, ना प्रमोशनचं टेन्शन होतं, ना पगार वाढीची हाव होती,
तणावमुक्त जीवन जगत होतो…
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
गावातले वाद गावात मिटवत होते, झाली भांडण तरी रात्री मंदिरात एकत्र येत होतो,
सकाळी पुन्हा एकत्र फिरत कामाला लागत होतो..
ना पोलीस केसची भीती, ना मानहानीचा दावा, ना कोर्टाच्या चकरा मारत होतो.
खरोखर सलोखा जपत होतो.
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
कुटुंबाला प्रेमाने पत्र लिहीत होतो, पत्राची वाट बघत होतो,
पत्राच्या प्रत्येक ओळीत प्रेमाचा ओलावा अनुभवत होतो…
ना मोबाईलवर कोरडी बोलणी, ना फॉरवर्ड मेसेज,
ना ऑनलाइनची निरर्थक चॅटिंग, उगाचच फक्त दिखावा करत नव्हतो
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
मातीच्या घरात रहात होतो, सारवलेल्या अंगणात बागडत होतो,
ऐसपैस अर्धा एकरभर जागेत सुखात सगळे नांदत होतो…
ना एक बी एच के मध्ये कोंबलो होतो, ना बाल्कनी साठी भांडत होतो ,
ना मास्टर बेडरूममध्ये स्वतःला कोंडून घेत होतो…
मस्त मोकळ्या हवेत ढगाखाली मोकळा श्वास घेत होतो…
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …
अडाणी असताना सुशिक्षितात जाऊन त्यांचे आयुष्य जगावे अशी स्वप्न पाहत होतो ,
त्या साठी मेहनत करत होतो,
आणि जेव्हा सुशिक्षित झालो,– त्या भपकेबाजीत घुसू लागलो, ढोंगी ते जग बघू लागलो,
आणि मग परत वाटू लागलं…….
साला मी अडाणी होतो तेच बरं होतं …….
— श्रीधर जुळवे ( वॉलवरून )
प्रस्तुती : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com