? मनमंजुषेतून ?

☆ ‘ब्रेन बेड…’ भाग – 1 – डाॅ. प्रदीप सुरवशे ☆ प्रस्तुति – सुश्री पार्वती नागमोती ☆

पुण्‍याच्‍या कोलंबिया एशिया हॉस्‍पिटलला न्‍युरोसर्जरी कन्‍सल्‍टंट म्‍हणून जॉईन होऊन मला एखादाच महिना झाला असेल. मुंबईच्‍या जे. जे. हॉस्‍पिटल मधून न्‍युरोसर्जरीची पदवी संपादन करुन, तिथे केलेल्‍या ५००० पेक्षा अधिक शस्त्रक्रियांचा प्रदीर्घ अनुभव घेऊन मी पुण्‍याला आलो होतो.

शनिवारी रात्री पूर्ण परिवारासोबत जेवण चालू होते. तेवढ्यात माझा फोन खणखणला. कोलंबिया एशियाच्‍या इमर्जन्‍सी रुममधून फोन होता. डॉक्‍टर बोलत होते. “सर, एका २० वर्षाच्‍या तरुणाला त्याचे नातेवाईक घेऊन आलेत. तीन तासापूर्वी त्याची गाडी स्‍लीप होऊन तो रस्‍त्‍यावर पडला होता. डोक्‍याला मार लागला आहे. सुरुवातीला त्‍याला जवळच्‍या हॉस्‍पिटलमध्‍ये नेले होते. पण त्‍यांना तिथे कळले की, तो  जवळजवळ ‘ब्रेन डेड’ आहे. पुढे काही करुन फार उपयोग होणार नाही. त्‍यामुळे ते पेशंटला इकडे घेऊन आलेत.” 

‘ब्रेन डेड’ म्‍हणजे ज्‍या पेशंटचा श्‍वास बंद झाला असून मेंदूचे कार्य थांबलेले आहे व फक्‍त हृदय चालू आहे असा पेशंट ! मी डॉक्‍टरना विचारले की, “आता काय स्‍टेटस आहे? ” त्‍यांनी सांगितले की, ” सर त्‍याचा श्‍वास बंद पडलेला होता म्‍हणून आम्‍ही कृत्रिम श्‍वासाची नळी बसवली व व्‍हेंटिलेटरने श्‍वास देतोय. त्‍याचे दोन्‍ही प्‍युपिल्‍स (बुबुळ) डायलेट (पूर्णपणे प्रसरण पावलेले) झालेले आहेत.” सहसा नॉर्मल माणसामध्‍ये डोळ्‍यांच्‍या बुबुळावर लाईट पडला की, ती आकुंचन प्रसरण पावतात. (परंतू ब्रेन डेड पेशंटमध्‍ये ती रिअ‍ॅक्‍शन दिसत नाही.) ” सर, मी ब्रेनचा सी.टी. स्‍कॅन करून वॉट्सअ‍ॅपवर पाठवला आहे.”

मी स्‍कॅन उघडून पाहिला तर पेशंटच्‍या मेंदूमध्‍ये उजव्‍या बाजूला मोठा रक्‍तस्त्राव झालेला होता व पूर्ण मेंदू डाव्‍या बाजूला सरकला होता. स्‍कॅन बघितला आणि मी हातातला घास तसाच ताटात ठेऊन ताटावरून उठलो. कपडे बदलत बदलतच मी त्‍यांना सूचना दिल्‍या व ताबडतोब पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेण्‍यास सांगितले. गाडीची चावी घेऊन पळतच मी घराबाहेर पडलो. तोच पप्‍पा म्‍हणाले, ” मी येतो सोडायला, तुम्‍ही केसच्‍या नादात गाडी फास्‍ट चालवाल !” सगळेजणं जेवणावरून उठले. पण मी त्‍यांना सांगितलं, ” काळजी करू नका. मी गाडी सावकाश चालवतो.” मला १० वाजता फोन आला होता. केवळ ०७ मिनिटातच मी हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचलो. गाडी मी इमर्जन्‍सी रूमच्‍या दारापर्यंत नेवून तशीच सोडून दिली. दार उघडे, चावी गाडीलाच आणि मी पळतच हॉस्‍पिटलमध्‍ये घुसलो. सिक्‍युरिटी गार्डनी सांगितले, ” सर पेशंट वरती आय.सी.यू. मध्‍ये शिफ्‍ट केलाय.” लिफ्‍टसाठी न थांबताच जिना चढून मी पळतच आय.सी.यू. मध्‍ये पोहोचलो. पेशंटला बघितलं तर त्‍याची दोन्‍ही बुबुळं प्रसरण पावलेल्‍या अवस्‍थेत होती. श्‍वास पूर्णपणे बंद पडलेला  होता आणि व्‍हेंटिलेटर द्वारा श्‍वास देण्‍यात येत होता. 

नातेवाईकांशी बोलणे गरजेचे होते. मी त्‍यांना म्‍हणालो, ” पेशंट वाचण्‍याचे चान्‍सेस ५% पेक्षाही कमी आहेत. तरी देखील ऑपरेशन करावं हा माझा निर्णय आहे. कारण पेशंट तरुण आहे व मार लागून फार वेळ झालेला नाही. पेशंटला जगण्‍याची एक संधी द्यायला हवी. थोडा देखील वेळ वाया घालवला तर पेशंट हाती लागणार नाही.तुम्‍ही ठरवा ! “

नातेवाईक चांगलेच हडबडले होते.त्यांचा अजूनही विश्‍वास बसत नव्‍हता. तीन तासांमध्‍ये सगळं होत्‍याचं नव्‍हतं झालं होतं ! ते कोणताही निर्णय घेण्याच्या परिस्थितीत नव्हते, पण त्‍यांची परवानगी येईपर्यंत मला थांबणं शक्‍य नव्‍हतं. मी जोरात ओरडलो, ” पेशंट ताबडतोब ऑपरेशन थिएटरमध्‍ये घ्‍या.” आजूबाजूला १०-१५ स्‍टाफ उभे होते. सर्वजण माझं ते रुप पाहून हादरले होते. बेडसकटच पेशंट ऑपरेशन थिएटरमध्‍ये शिफ्‍ट केला. १० वा. १० मि. नी पेशंट ऑपरेशन टेबलवर होता.  जनरली ऑपरेशन करण्‍याआधी इन्‍फेक्‍शन कंट्रोल म्‍हणून पेशंटचं डोकं बिटाडीन आणि सॅव्‍हलॉनने १० मिनिटं स्‍वच्‍छ धुतलं जातं. तसेच ऑपरेशन करणारे डॉक्‍टर व नर्स देखील ७ मिनिटे वॉश घेतात आणि मगच सर्जरीला सुरूवात होते. पण ती १७ मिनिटे सध्‍या मी देऊ शकत नव्‍हतो कारण मेंदूमध्‍ये प्रेशर खूपच वाढत होते, आणि अशा अवस्‍थेत एका सेकंदाला हजारो न्यूरॉन्‍सची(मेंदूच्या पेशी) डेथ होते(मरण पावतात). मेंदूमधील या मेलेल्या पेशी कधीही रिजनरेट (परत तयार )होत नाहीत. त्‍यामुळे लवकरात लवकर ऑपरेशन करून झालेला रक्‍तस्त्राव बाहेर काढणे व मेंदूवरील प्रेशर कमी करणे गरजेचे होते. वॉर्डबॉयनी पटकन पेशंटचे केस कापले आणि तोपर्यंत मी वॉश घेऊन आलो. सिस्‍टरना सांगितले, “ऑपरेशनच्‍या साहित्‍याची ट्रॉली लावत बसू नका. सर्व साहित्‍य पसरून ठेवा. लागेल तसे साहित्‍य मी घेतो.” ऑपरेशन थिएटरमधील सर्वजण अतिशय वेगाने काम करत होते, जणू काही प्रत्‍येकाला चार चार हात फुटले होते. आता प्रश्‍न होता भूलतज्ञांचा. त्‍यांना यायला ४-५ मिनिटे लागणार होती. आणि ते आल्‍यावरही पूर्ण भूल देण्‍यासाठी १०-१५ मिनिटे वेळ गेलाच असता, त्‍यामुळे मी पूर्ण भूल न देता जागीच भूल देऊन (लोकल अनेस्‍थेशिया) ऑपरेशन सुरू केले. मी कवटी ड्रील करण्‍यास सुरूवात केली आणि तोपर्यंत भूलतज्ञ आले. सहसा भूलतज्ञांनी परवानगी दिल्‍याशिवाय कोणताही पेशंट ऑपरेशन थिएटरमध्‍ये घेतला जात नाही, परंतू इथे सर्वच नियमांचे उल्लंघन झाले होते. पण त्‍यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला एक शब्‍दही न विचारता पेशंटचा ताबा घेतला. मी कवटी उघडून रक्ताच्या गाठीपर्यंत पोहोचलो. साधारणपणे अर्धा लिटर रक्‍त गोठून रक्‍ताची गाठ तयार झाली होती व मेंदूवर प्रेशर निर्माण करत होती. मी रक्‍ताची गाठ काढून टाकली व मेंदूच्‍या रिस्‍पॉन्‍सची वाट बघू लागलो. पुढच्‍या १-२ मिनिटात दबलेला मेंदू पूर्वस्‍थितीत आला आणि मेंदूचे पल्‍सेशन (हालचाल) दिसू लागली. आता मी डोके वर काढून घड्याळाकडे पाहिले तर १० वा. २७ मि. झाली होती. म्‍हणजेच मला फोन आल्‍यापासून केवळ २७ मिनिटात ऑपरेशन पूर्ण होऊन त्‍याच्‍या मेंदूवरील प्रेशर काढून घेतले होते. आता मी पूर्ण टीमला रिलॅक्‍स होण्‍यास सांगितले व उर्वरित ऑपरेशन पूर्ण केले.

ऑपरेशन पूर्ण झाले होते. परंतू अजूनही मन बैचेन होते. काहीतरी चुकत असल्‍याची जाणीव होत होती. आज माझा सिक्‍स्‍थ सेन्‍स मला सांगत होता की काहीतरी अपूर्ण आहे. म्‍हणून मी लगेचच सीटी स्‍कॅन करून बघायचे ठरवले. पेशंटला ओ. टी. मधून डायरेक्‍ट सी.टी.स्‍कॅन युनिटमध्‍ये शिफ्‍ट करण्‍यात आले. आणि माझा अंदाज खरा ठरला. आता पेशंटच्‍या मेंदूच्‍या दुसर्‍या बाजूला (डाव्‍या बाजूला) रक्ताची तेवढीच मोठी गाठ तयार झाली होती. पहिल्‍या स्‍कॅनमध्‍ये हा रक्‍तस्त्राव अजिबातच दिसला नव्‍हता. आता दुसरे ऑपरेशन करून तो रक्तस्त्रावही काढणे गरजेचे होते. मी पेशंटचे बुबुळ परत तपासले, त्‍यामध्‍ये कोणतीही रिअ‍ॅक्‍शन दिसत नव्‍हती.आता मला प्रश्‍न पडला की जवळपास ब्रेन डेड झालेल्या अशा पेशंटवर दुसरी सर्जरी करणे योग्‍य आहे का? पण मी घेतलेली जबाबदारी पूर्ण करावयाचे ठरवले. नातेवाईकांना सांगितले की, ताबडतोब दुसरे ऑपरेशन करावे लागेल. पेशंटचे नातेवाईक आधीच भेदरलेले होते.

— क्रमशः भाग पहिला 

लेखक : डॉ. प्रवीण सुरवशे

कन्‍सल्‍टंट न्‍युरोसर्जन, कोलंबिया एशिया हॉस्‍पिटल, पुणे 

फोन : ७७३८१२००६०

प्रस्तुती : पार्वती नागमोती 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments