प्रा.डॉ.सतीश शिरसाठ
☆ गाडगेबाबांची अभिनव संवाद कौशल्ये ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆
(Innovative Communication Skills of Gadgebaba.)
आज २० डिसेंबर —- आज संत श्री गाडगे महाराज यांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ …….
☆ वंदन दीपस्तंभाला … ☆
बाबांचा संवाद होता ,
संवेदना गोठलेल्या कुष्ठरोग्यांशी ;
भारतवर्षातल्या प्रकांडज्ञानी,
संविधाननिर्मात्या बाबांशी |
पोटतिडीक होती,
वंचितांच्या शिक्षणाची;
विषमतेच्या चिखलात रुतलेल्या –
माणसाच्या उत्थानाची |
घेतला ध्यास ग्रामस्वच्छतेचा
आणि माणसांच्या मनांच्या
आंतरबाह्य स्वच्छतेचा;
बाबा दीपस्तंभ अवघ्या मानवतेचा !!!
— संत श्री. गाडगे महाराजांना माझी ही शब्दरूपी श्रद्धांजली. त्यांचे कार्य आठवून त्यांच्याबद्दलची आणखी काही महत्वपूर्ण माहिती वाचकांना द्यावी असे अगदी आतून वाटले. म्हणून हा एक छोटासा लेख प्रपंच —
गाडगेबाबा हे भारतीय समाजाला पडलेलं सोनेरी स्वप्न आहे.समाजातील उपेक्षित, वंचित, आदिवासी, स्त्रिया, खेडूत आणि वेगवेगळया स्वरूपाच्या संवेदना गोठून गेलेल्यांच्या प्रबोधनाबरोबरच, त्यांच्यातील आत्मविश्वास जागवून त्यांना स्वयंनिर्भर बनवण्याचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. १८७३ ते १९५६ हा त्यांचा जीवनकाळ होता. लहानपणी वडिलांचे छत्र हरवल्यावर त्यांनी जो समाज पाहिला, त्या निरीक्षणातून नकळत मिळालेल्या प्रेरणेतून त्यांनी पुढे, सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध संघर्ष, हे सारे बदलण्यासाठी स्वतःशी साधलेला आत्मसंवाद, कीर्तनाच्या स्वरूपात जनसंवाद आणि इतर कितीतरी कार्यातून, कोणत्याही चॅनेलच्या मदतीशिवाय समाजात नैतिक मूल्यांची केलेली प्रतिष्ठापना—- अशी जी खूप मोठी,अवघड आणि महत्वपूर्ण कामे केली, त्यात त्यांचे संवाद कौशल्य त्यांना फार उपयोगी पडले होते. त्यांचे हे कौशल्य म्हणजे एक “अभिनव संवाद सिद्धांत” समजला जातो.
गाडगेबाबांनी पुढील माध्यमांतून आपली अभिनव संवाद कौशल्ये लोकांना दाखवून दिली—
कीर्तन – अतिशय साधे,काळजाला भिडणारे आणि लोकांच्या हिताची भाषा सांगणारे शब्द त्यांनी कीर्तनातून पेरले.
पत्रव्यवहार – शाळेचा उंबरठाही न चढलेले गाडगेबाबा आपले विचार इतरांना सांगून त्यांच्याकडून पत्रे लिहून घेत. सामाजिक विषमता, पैसा आणि इतर साधनांची उधळपट्टी थांबवा, माणसाला देवपण देऊ नका, असे संदेश ते आपल्या पत्रांतून देत.
समाजकार्याचे संस्थाकरण आणि समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती यांना सहकार्य – सामाजिक, शैक्षणिक तसेच समाजहिताची कामे करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी सर्व प्रकारचे सहकार्य करून त्यांना स्वयंपूर्ण केले.
गाडगेबाबांचा संदेश आणि त्यांचे मिशनरी कार्य – गाडगेबाबांच्या शब्दांतील रोकडा धर्म त्यांच्या मानवतावादी सामाजिक कार्याचे दर्शन घडवतो. बाबांचे अतुलनीय कार्य पाहून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘त्यांचे हे कार्य मिशनरी वृत्तीचे आहे’ असा निर्वाळा दिला होता.
नियतकालिकातून केलेले कार्य – ‘जनता जनार्दन’ या नियतकालिकातून गाडगेबाबांच्या सामाजिक कार्याचे दर्शन ठायी ठायी दिसते.
अशा संवादाचे अनेक पुस्तकी सिद्धांत आहेत. गाडगेबाबांनी विकसित केलेला ‘ नैतिक मूल्यांचा प्रसार ‘ हा त्यापेक्षा श्रेष्ठ वाटतो.
संदर्भ —
१) श्री.संत गाडगे महाराज- इरगोंडा पाटील.
२) श्री.संत गाडगे बाबा – प्रबोधनकार के.सी.ठाकरे.
३) श्री.गाडगे महाराज- गोपाल नीलकंठ दांडेकर.
४) लोकशिक्षक गाडगेबाबा – डाॅ.रामचंद्र देखणे.
५) श्री.देवकी नंदन गोपाला- गो.नी.दांडेकर.
६) श्री.गाडगे महाराज गौरव ग्रंथ- संपादक- प्राचार्य रा.तु .भगत.
७) गाडगेमहाराजांची पत्रे – इरगोंडा पाटील.
श्री. गाडगे महाराजांना त्यांच्या आजच्या स्मृतिदिनी श्रद्धापूर्वक विनम्र अभिवादन.
© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ
सेवानिवृत्त प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२, ईमेल- sks.satish@gmail.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈