सुश्री सुलू साबणे जोशी
मनमंजुषेतून
☆ अभ्यासक्रमातील बदल आणि माझं ‘बाल’ पण ☆ सुश्री सुलू साबणे जोशी ☆
नातवाचा अभ्यास घेताना मला हे बदल फार जाणवले, विशेषतः ‘अक्षरबदल’ ! शेंडीवाला ‘श’ शेंडी कापून थेट मुंडक्याने रेषेला चिकटवला. लयदार ‘ल’च्या हाती काठी देऊन टाकली. नातू म्हणाला, ‘ शाळेत असंच शिकवलंय.’ आता नवीन प्रचलित पद्धती आपल्याला माहीत नसतात, त्यामुळे मी गप्प बसले. पण अशा वेळी मी त्याला आवर्जून आपल्या वेळी शाळेत काय शिकवलं, हे सांगत रहाते. पण मजा अशी आहे की, हे बदल कोण, केव्हा, कशासाठी करतं, हेच मुळी कळत नाही. जाग येते तीही कित्येक पिढ्या यात भरडल्या गेल्या की.
— माझ्या आठवणीत माझ्या शैक्षणिक कालात (१९५६ – १९६६) घनघोर बदल झाले. माझे अर्धेअधिक शिक्षण जुन्या पद्धतीने झालेले — म्हणजे —
इंग्लिश भाषेचा समावेश, जो आठवीपासून अभ्यासक्रमात असे, तो पाचवीपासून सुरू झाला. तोवर आम्ही सहावीत सरकलो होतो, मग आम्ही त्या एका वर्षात पाचवी, सहावी अशा दोन पुस्तकात दबलो.
शुद्धलेखन – तेव्हा आठवतंय, शुद्धलेखन घालताना शिक्षिका किती जाणीवपूर्वक उच्चार करायच्या, त्यामुळे कळायचं तरी. (कां, कांहीं, आंत, नाहीं, जेंव्हा, तेंव्हा, कीर्ति, मूर्ति इ.) ह्या अनुस्वारांचा उद्देश त्यावेळी बालबुद्धीला उमगला नाही आणि कळवण्यास अत्यंत खेद होतो की अजूनही कळला नाहीये.
नवीन पद्धतीत किती तरी अनुस्वार गायब झाले, (ते बाकी बरीक झाले.) -हस्व – दीर्घ बदलले.
पण आता संगणकावर काही जोडाक्षरे टंकित केली की चमत्कार होतो – उदा. अद् भुत – आता ‘भ’ द’च्या पायाला लोंबकळतो – अद्भुत / उद् घाटन – यातही तसेच – ‘द’च्या पायाशी ‘घ’ – उद्घाटन.
विचार करा – ‘अब्द’, जो उच्चारतांना ‘ब’चा उच्चार ‘द’च्या आधी आणि अर्धा होतो – अ+ब्+द या पद्धतीने बघायला गेल्यास अ+द्+भु+त अशी उकल करता येते. पण या नवीन टंकपद्धतीने मात्र हा अद्भुत – अ+भ्+दु+त असा वाचला जाईल. तेच ‘उद्घाटना’चे – उ+घ्+दा+ट+न. वा+ङ्+म+य – या नवीन पद्धतीत वाङ्मय – ‘म’चा उच्चार पूर्ण करायचा की ‘ङ्’चा? अशी आपल्या जोडाक्षरांची तोडफोड अपेक्षित आहे का?
‘र’ हे अक्षर अर्धं होऊन विविध प्रकारे जोडाक्षरांत येते. उदा. – अर्धा, रात्र, व्रण, तऱ्हा, कृपा इ. यातील आडवा होऊन जोडला जाणारा ‘रफार’ टंकलिपीत गायब झाला – आता असा ‘र’ जोडायचा तर गो+र्+हा असं टंकित केलं की तो ‘गो-हा’ न दिसता ‘गोर्हा’ असा दिसतो. मग चेहेरा होतो गोर्हामोर्हा!
दशमान पद्धती आणि नाणी – दशमान पद्धत सोपी होती, पण आपण या ‘बदला’च्या (transit period) तडाख्यात (की चरकात?) सापडलो होतो – डझन, औंस, पौंड, इंच, फूट, मैल यांची सांगड कि.मी., सें.मी., किलोग्रॅम वगैरेशी झगडून जमवली. (अजूनही इंच, फूट, डझन सोप्पं वाटतं.) माझी उंची मला फूट-इंचात सांगता येते. पण सें. मी. म्हटलं की झालीच गडबड. फळं डझनाच्या भावात असत, ती वजनावर मिळू लागली. चोवीस रूपयात डझनभर मिळणारे चिक्कू चोवीस रूपये किलो घेताना सहाच मिळू लागले. (एवढेच बसतात वजनात?) नाण्यांनी तर घोळसलंच. पैसे, आणे, रूपये हे आबदार वाटायचे, नाण्यांना वजनही चांगलं असे. कमी किंमतीचा पैसा तांब्याचा, आणि तरी चांगला ढब्बू असायचा, किंवा भोकाचा ! भोकाची नाणी गोफात बांधून ठेवता यायची. (भोकाचे पैसे वापरून लोकरीच्या बाळमोज्याचे छोटे गुंडे करता यायचे.) नाणी – आणा, चवली, पावली, अधेली (अशी गोंडस नावे असली तरी) वजनदार असत. रूपया तर ठणठणीत – त्याला ‘बंदा’ म्हणावा असाच ! सुरुवातीला रूपया चांदीचा होता – त्यातून ब्रिटिश राजवटीतील रूपये तर कलदार चांदीचे – राजा छाप, राणी छाप असे होते. हे चलनातून बाद केल्यावर ते दागिन्यांच्या पेटीत गेले. मग दिवाळीत ओवाळणीपुरते बाहेर येत, परत कडीकुलपात !
नवी नाणी चिल्लर दिसत – एक पैसा – गोल, तांब्याचा – आकार नखावर मावेल एवढा ! पुढे तर तो ॲल्युमिनिअमचा चौकोनी झाला. एक आणा म्हणजे सहा नवे पैसे. दोन आणे म्हणजे बारा नवे पैसे. तीन आण्यांचा भाव एका नव्या पैशाने वधारला – म्हणजे एकोणीस नवे पैसे झाला. का? तर दशमानात एक रूपया = शंभर नवे पैसे, तर त्याचे चार भाग पंचवीस नवे पैसे म्हणजे जुने चार आणे – आता पंचवीसला चाराचा भाग समान कसा बसणार? तीन आण्याच्या पदरात एक नवा पैसा टाकून केली जुळवाजुळव ! त्यातून दोन, तीन, पाच, दहा, वीस पैसे नक्षीदार, पण (जनभाषेत) ती आलमिनची नाणी, वजनाला हलकी – पुढे पुढे ती लमाण्यांच्या पोशाखावर जडवलेली दिसू लागली.
पावलीचं, अधेलीचं रूपांतर पंचवीस पैसे आणि पन्नास पैशात झालं आणि त्यांचे चेहरे पडेल दिसू लागले.
त्यातल्या त्यात रूपया जरा बरा म्हणायचा, तर अलिकडे तोही पन्नास पैशाच्या आकारात गेला आणि त्याचा रुबाबच संपला. पाच आणि दहा रूपयाची नाणी अजून तरी अंग धरून आहेत.
पण काय आहे, शिक्षणातील या बदलांनी बालमनात घातलेले उटपटांग गोंधळ, ‘ बाल ‘ पांढरे झाले तरी अजून ठिय्या मारून आहेत, त्याचं काय करावं बरं????….
© सुश्री सुलू साबणे जोशी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈