श्रीमती उज्ज्वला केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘टाहो…’ – भाग – 1 – सुश्री सई परांजपे ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

(विनाकारण इंग्लिश, रोमन लिपी यांचा वापर इतका अतिरेकी वाढलाय की बोलून सोय नाही. सई परांजप्यांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या ज्येष्ठ स्त्रीलाही काळजी वाटावी अशी परिस्थिती खरंच आहे भोवती.)

मराठी भाषेवर चालून आलेली कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं तर मराठी माणूस त्याच्या लढाऊ वृत्तीसाठी ओळखला जातो. मग या भाषा आक्रमणाच्या बाबतीत तो नांगी टाकून स्वस्थ का बसून राहतो? या गोष्टीचा बोध होत नाही. इंग्रजीची झिलई चढली की आपली भाषा आणि पर्यायाने आपण अधिक टेचदार होतो का? कुण्या समाजशास्त्रज्ञाने अथवा भाषातज्ज्ञाने या गौडबंगालाचा छडा लावावा आणि आपल्या न्यूनगंडावर काही इलाज करता येतो का, हे अवश्य पाहावं..  

‘आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी’ कवी यशवंत यांची केवढी हृदयस्पर्शी ही कविता. पण आता ही गोड हाक कानी येत नाही. कारण सुमारे दहा-पंधरा वर्षांपूर्वी पाहता पाहता सगळ्या आया गायब झाल्या. रातोरात घराघरांमधून ‘मम्या’ अवतरल्या. त्यांनी अवघी भूमी व्यापली. ‘का गं?’ मी आमच्या गंगूबाईंना विचारलं, ‘मम्मी कशी काय झालीस? आई म्हणवून घ्यायला लाज वाटते?’ गंगूबाईंनी चोख उत्तर दिलं, ‘अवो साळंतल्या, शेजारपाजारच्या समद्या पोरी ‘मम्मी’ म्हणूनच हाक मारतात की. प्रियांकाबी हटून बसली बगा. काय करणार!’ खरं तर या मम्मीपदामुळे गुदगुल्या होत असणार या तमाम माऊली वर्गाला.

गोरा साहेब गेल्यानंतर, आज इतक्या वर्षांनी त्याच्या भाषेनं मराठी भाषेवर घाला घातला आहे. चोरपावलांनी इंग्रजी शब्द आपल्या भाषेत घुसले. या आक्रमणामुळे भल्या भल्या मराठी शब्दांचं उच्चाटण झालं. साहेबाची भाषा धड न का बोलता येईना, पण त्याच्या शब्दांची उधळण करीत मराठीतून तारे तोडीत राहिलं, की आपला भाव वधारतो अशी समजूत असावी. अशा किती शब्दांनी आपल्या बोलीमध्ये चंचूप्रवेश करून मूळ मराठी शब्द कालबाह्य करून टाकले आहेत. वानगीदाखल सांगायचं म्हटलं तर रंग, खोली, स्वयंपाकघर, मोरी, दिवा, पंखा, रस्ता, रहदारी, गाडी, आगगाडी, इमारत, रजा, सण, इ. इ. आपले रोजचे चलनी शब्द आता वळचणीत दडून बसले आहेत. कलर, रूम, किचन, बाथरूम, लाइट, फॅन, रोड, ट्रॅफिक, कार, ट्रेन, बिल्डिंग, लीव्ह, फेस्टिव्हल या इंग्रजी प्रतिशब्दांनी त्यांचं उच्चाटण केलं आहे. हे घुसखोर शब्द लवकरच टेबल, स्टेशन, मशीन, फ्लॅट या मराठीत सामावून गेलेल्या शब्दांच्या पंगतीला जाऊन बसतील, यात शंका नाही. पण आपल्या साध्या सुटसुटीत शब्दांना का म्हणून रजा द्यावी? ‘लेफ्ट-राइट’च्या कवायतीत बिचारे डावे-उजवे दिशा हरवून बसले आहेत. रिक्षावाल्याला ‘डावीकडे वळा’ सांगितलं, की तो लगेच ‘म्हणजे लेफ्ट ना?’ अशी खात्री करून घेतो. मायबोलीला ही जी लागण झाली आहे, तिचा प्रत्यय रोजच्या जीवनात पदोपदी येतो. पावलोपावली साक्ष पटते. रस्त्यावरून जाताना दुतर्फा दुकानं न्याहाळली तर औषधाला एकही पाटी शुद्ध मराठीमध्ये दिसणार नाही. पैजेवर सांगते. अमुक टेलर, तमुक शू मार्ट, हे फ्रुट स्टोर, ते टॉय शॉप, व्हरायटी आर्केड, स्टेशनरी, ट्रॅव्हल कंपनी, मिनी मार्केट अशीच साहेबी बिरुदं मिरवणारी दुकानं आढळतात. चविष्ट फराळ म्हणायला ओशाळवाणं वाटतं. टेस्टी डिशेश (डिशेसचा अपभ्रंश) घ्यायला रिफ्रेशमेंट हाऊसमध्ये गेलं की कसं फुल सॅटिसफॅक्शन वाटतं. दादरला पूर्वी एक दुकान होतं. लाडूसम्राट. किती गोजिरं नाव! धेडगुजरी बिरुदांच्या दाटीमध्ये ही साधी पाटी कशी शोभून दिसे. अलीकडे नाही दिसली. इंग्रजी नावाच्या सोसाचा एक अतिरेकी नमुना सांगते. ‘शॉप’ या शब्दावरून ‘शॉपी’ म्हणजे छोटेखानी गोदाम हा शब्द प्रचलित आहे. त्याचं स्पेलिंग वेगळं असलं तरी उच्चार ‘शॉप’ असाच आहे, ‘शॉप्पी’ नव्हे. पण बिचाऱ्या हौशी दुकानदारांना हे नाही ठाऊक. त्यांनी जर शब्दकोशात डोकावण्याची तसदी घेतली असती, तर ‘शॉप्पी’चे हास्यास्पद फलक झळकले नसते.

मराठी भाषेवर चालून आलेली ही कमअस्सल लाट समाजाच्या सर्व स्तरांवर एकाच आवेगाने कोसळली आहे, हे मान्य केलं पाहिजे. ही लाट वर्ण, वर्ग, वय, सामाजिक वा आर्थिक दर्जा वा शिक्षण- कोणत्याच बाबतीत भेदभाव करीत नाही. ती खरी लोकशाही पाळते. जरा सुस्थितीमधल्या मंडळींना सगळं काही ‘कूल’ हवं असतं. त्यांना घडीघडी ‘चिल्’ व्हायचं असतं. ती मंडळी ‘जस्ट’ येतात आणि जातात. अशिक्षित वर्गदेखील हौसेहौसेने इंग्रजी शब्दसंपत्ती उधळतो. ‘काल शीक होतो, मिशेश म्हटल्या की काय मोटा प्राब्लेम नाही. टेन्सन घेऊ नका’ अशी भाषा सर्रास ऐकू येते. आमच्याकडे सरूबाई कामाला होत्या. त्यांना मधुमेह असल्यामुळे सतत त्या ‘युवरीन’ (यूरीन) तपासायच्या गोष्टी करायच्या. हल्लीची तरुण मंडळी एकमेकांना ‘डय़ूड’ किंवा ‘ब्रो’ म्हणण्यात धन्यता मानतात. दोन-चार जण असतील तर ‘गाइज्’. गोऱ्यांच्या संभाषणशैलीचं अनुकरण करायला हरकत नाही, पण त्यांच्या शिस्तीचं काय? सुसंस्कृत पाश्चिमात्य पिढी आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही, याबद्दल दक्ष असते. गळ्यात गळे घालून तिघा-चौघांनी रस्ता अडवून चालणं, मोबाइलवर बोलत गाडी हाकणं, ऐन कोपऱ्यावर टोळक्याने ‘शाइनिंग करीत’ उभं राहणं, असले प्रकार सहसा प्रगत देशांमध्ये आढळून येणार नाहीत.

बहुसंख्य जाहिराती या तरुणांना उद्देशूनच योजलेल्या असतात. तेव्हा त्या तरुणाईच्या भाषेतून बोलल्या तर नवल नाही. पण मराठी (वा हिंदी) शब्द न वापरण्याची या जाहिरातवाल्यांनी शपथ घेतली आहे की काय, असा कधीकधी प्रश्न पडतो. ‘राहू यंग’ हे त्यांचं घोषवाक्य; अमुक क्रीम फेस क्लिअर करते; तमुक साबणाने स्किन सॉफ्ट आणि स्मूथ होते; या शांपूने केस सिल्की होतात, तर त्या ऑइंटमेंटने डोळ्याखालच्या ब्लॅक सर्कल्सना गुडबाय करता येते.. तर मंडळी, आता स्पीक!

— क्रमशः भाग पहिला 

लेखिका : सुश्री सई परांजपे

(मी मराठीप्रेमी)

संग्राहिका : सौ उज्ज्वला केळकर 

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments