डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 1 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
दर पंधरा दिवसातल्या एका वारी मी इथं येत असतो… आंबा खाऊन कोय फेकून द्यावी तशी कोयी सारखी पडलेली अनेक माणसं मला इथे दिसतात…
या कोयीचं भवितव्य काय ? … तरीही मी त्यांना स्वच्छ करून जमिनीत पुन्हा रुजवून झाड लावण्याचा प्रयत्न करत आहे !
… या इथे हे मंदिर दिसतंय… त्या तिकडे मस्जिद आहे आणि पलीकडे चर्च आहे… या तीन कोनाच्या ” पायाशी ” बसलेला मी फक्त एक माणूस !
याचक मंडळींना गोळ्या औषधं देणं हा फक्त एक बहाणा असतो. मी त्यांच्याशी यानिमित्ताने चर्चा करून ते काही काम करतील का ? त्यांच्या अंगात काही स्किल आहे का ? या गोष्टींची चाचपणी करून त्यांना व्यवसाय मांडून देत असतो.
तर, या ठिकाणी मला ठरलेल्या वेळी एक आजोबा नक्की भेटतात. ते पूर्वी काम करायचे, घरातल्या लोकांना पैसे द्यायचे, त्यांना मदत करायचे… घरातले लोक सुद्धा त्यांच्यावर प्रेम करायचे…
एके दिवशी, त्यांना पॅरालिसिसचा झटका आला… नोकरी गेली… घरात पैसे द्यायचे बंद झालं आणि याचबरोबर मग घरातल्या लोकांनी प्रेम करणं सुद्धा बंद केल…. ! बाबांना वाटलं, माझ्याच तर घरचे लोक आहेत, मला सांभाळतीलच… परंतु त्यांचा हा विश्वास फोल ठरला…. घरातल्या प्रत्येकाने स्वतःच्या अडचणी सांगून, आम्ही तुम्हाला सांभाळण्यास असमर्थ आहोत, असं सांगितलं आणि तेव्हापासून बाबा रस्त्यावर आले …
बाबा फक्त सुशिक्षित नाहीत तर सुसंस्कारित सुद्धा आहेत….! सुशिक्षित आणि सुसंस्कारित यामध्ये फरक असतो, सुशिक्षित असेल ती व्यक्ती सुसंस्कारित असेलच याची खात्री नसते !
बाबांना दम्याचा त्रास आहे, ते काहीतरी करून मी जिथे आहे तिथे येतात आणि मला म्हणतात, Hey Sir, give me pump….! दम्याचा अटॅक आल्यानंतर एका छोट्या पंपमधून श्वासाद्वारे औषध घेतलं की हा अटॅक कमी होतो… त्यांना दरवेळी तो पंप लागतो. मी नेहमी त्यांना पंप देतो… मला भेटल्यानंतर, दरवेळी माझ्या शेजारी बसून माझ्याशी ते वैचारिक चर्चा करायचे…. ! नीट बोलता येत नसतानाही बाबा बोलून व्यक्त व्हायचे, परंतु त्यांच्या मनात प्रचंड विचारांची खळबळ सुरू आहे हे मला नेहमी जाणवायचं…!
खरंच आहे…. बोलून व्यक्त होतात ते शब्द….!
न बोलताही व्यक्त होते ती भावना….!!
आणि मनात नुसतेच रेंगाळतात ते विचार !!!
एके दिवशी अचानक बाबा यायचे बंद झाले, आज या गोष्टीला जवळपास आठ महिने लोटले….
बाबा का येत नाहीत ? याची चौकशी मी अनेकांकडे केली, परंतु कोणालाच काहीही माहित नव्हतं. मला वाटलं, कदाचित त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांचा स्वीकार केला असावा ! आणि या विचारांमुळे सुखावून मी त्यांची चौकशी करणे सोडून दिले….
यानंतर बरोबर आठ महिन्यानंतर म्हणजे शनिवारी १७ डिसेंबर २०२२ रोजी, याचकांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी मोटरसायकलवर सर्व साहित्य घेऊन मी निघालो असता, एका रस्त्यात ट्रॅफिक जाममुळे मी अडकलो…. मग वैतागून दुसरा रस्ता घेतला, हा सुद्धा रस्ता पुढे ब्लॉक होता, मला या ट्रॅफिक मध्ये सुद्धा अडकावं लागलं… मग गुपचूप थांबुन राहिलो…
मोटर सायकल बंद करून मी उगीच इकडे तिकडे निरीक्षण करत राहिलो… ट्रॅफिकमध्ये निर्जीव गाड्या अक्षरशः एकमेकांना चिकटून उभ्या होत्या… मला कळत नाही, मग सोबत जगताना जिवंत माणसांत इतकं अंतर का पडतं ?
हल्ली चार माणसं एकाच दिशेने, एकाच विचाराने, तेव्हाच चालतात, जेव्हा पाचव्याला खांद्यावरून पोचवायचं असतं…. ! No Entry मधून Right घेऊन चुकण्यापेक्षा, योग्य रस्त्याने Left घेवून बरोबर राहणं हे केव्हाही चांगलं…मात्र हे कळेपर्यंत उशीर झालेला असतो ! ….
डोक्यात हे असं काही चालू असताना, अचानक विचारांची मालिका खुंटली….
मी थांबलो होतो, त्याच्या बाजूच्या फुटपाथवरून एक दाढी वाढलेले आजोबा, सरपटत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते. अंगावर जे काही कळकट्ट होतं त्याला कपडे का म्हणायचं ? हा मोठा प्रश्न…!
दोन-चार इंच पुढे सरकतानासुद्धा त्यांना वेदना होत असाव्यात, हे दाढी आडून चेहरा स्पष्ट सांगत होता.
दोन-चार इंच पुढे सरकताना सुद्धा त्यांना भयानक दम लागत होता…. आकाशाकडे तोंड करून ते एक मोठा श्वास घ्यायचे आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते… सरपटत चालताना बऱ्याच वेळा त्यांचा तोल जात होता, ते पडत होते… पुन्हा उठून बसत होते आणि पुढे सरकत होते….
ट्रॅफिक मध्ये ताटकळत थांबलेले सर्वजण हा ” तमाशा ” बघत होते….. त्यांचा ” टाईमपास ” होत होता…!
या आजोबांकडे पाहून मला पटलं… पडणं म्हणजे हरणं नव्हे…. पुन्हा उठून उभं न राहणं म्हणजे हरणं ! हरणं ही फक्त एक मानसिक अवस्था आहे…. जोपर्यंत आपली हार आपण मनाने कबूल करत नाही, तोपर्यंत आपण जिंकलेलोच असतो…! … यश म्हणजे हापूस आंबा असेल तर अपयश म्हणजे हापूस आंब्याची कैरी ! प्रत्येक आंबा कधीतरी कैरी असतोच…. कैरी असण्यात गैर काय… ? कैरी परिपक्व होते तेव्हाच तर ती आंबा होते… कैरीपासून आंबा होणे ही फक्त एक नैसर्गिक प्रक्रिया असते….!
… अपयश जेव्हा परिपक्व होतं, प्रयत्न करून आपण या अपयशावर काहीतरी प्रक्रिया करतो, आणि यानंतर जे मिळतं, त्याला यश म्हणतात…!
मी या बाबांकडे एकटक पाहत होतो…. डोक्यात वरील विचार सुरू होते आणि एका क्षणी, माझ्या या विचारांची शृंखला तुटली…. मला जाणवलं, ‘ अरेरे हेच ते बाबा…. जे माझ्याकडून पंप मागून घ्यायचे ! बापरे… यांची अशी कशी अवस्था झाली ? इतके दिवस मी समजत होतो त्यांच्या घरातल्यांनी यांचा स्वीकार केला आहे….’
मोटर सायकल स्टॅंडवर लावून, मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना नावाने हाक मारली… डोळे किलकिले करत त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मला ओळखलं…. मला ते हसत म्हणाले, ‘How are you doc?’
मी म्हणालो, “ मी बरा आहे बाबा, तुम्ही कसे आहात ?”
ते याही अवस्थेत, हसण्याचा प्रयत्न करत, दम लागलेल्या आवाजात म्हणाले, “I am perfectly fine sir, no problem… “
त्यांना दम लागला होता…. वरील चार शब्द बोलण्यासाठी त्यांना चार मिनिट लागले आणि तरीही ते म्हणत होते ‘ मी
“परफेक्टली फाईन” आहे… No Problem!’
आपल्याकडे सगळं काही असून सुद्धा, आपण आयुष्यात कधीही I am perfectly fine असं म्हणत नाही…. मला कोणताही Problem नाही असं कधी म्हणत नाही…. आणि आज आयुष्याच्या अंतिम टप्प्यावर रस्त्यावर उभे राहून हे बाबा म्हणत होते, I am perfectly fine! No problem…
… खरा सुखी कोण ? आपल्याकडे सगळं काही असणारे आपण ?? की सर्वस्व गमावलेले ते ???
— क्रमशः भाग पहिला
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈