डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ माफीनामा… भाग – 3 ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(आज निसर्गाने पुन्हा हे नागडं…. म्हातारं पोर माझ्या ओंजळीत घातलं होतं…. मी पुन्हा बाप झालो…. पुन्हा बाप झालो यार….!!!) इथून पुढे —
शरमलेल्या बाबांना मी म्हणालो, “ बाबा लाजू नका, आपण आता मस्त आंघोळ करू….”
तेवढ्यातूनही बाबा म्हणाले, “ माझ्या लोकांनी मला नागडं करून जेवढी लाज आणली, त्यापेक्षा ही लाज काहीच नाही बाळा …”
यानंतर बाजूच्या दुकानदारांकडून बादली, पाणी आणि मग आणून, फुटपाथवर सूर्यानं जिथं ऊन दिलं होतं, तिथं या उन्हामध्ये बाबांना बसवलं आणि साबणाने त्यांना आंघोळ घातली….डोक्यावर प्रत्येक वेळी पाण्याचा तांब्या मी उपडा केला की ते म्हणायचे ….”शंभो”…! — इथे मला जाणवलं, की मी कुण्या माणसाला आंघोळ घालत नाहीये…. तर मी अभिषेक करतोय…. !!!
निर्वस्त्र बसलेल्या त्या बाबांचा पाय मी धुवायला घेतला…. आणि सहज त्या निर्वस्त्र रूपातल्या बाबांकडे माझं लक्ष गेलं…. त्या क्षणी मला वाटलं… आता मला कोणत्याही मंदिरात जाऊन साष्टांग नमस्कार घालण्याची गरज नाही… माझ्या हातात साक्षात पाय आहेत !
खरंतर आठ महिने अंघोळ नसताना, शौच वगैरे गोष्टी कपड्यातच घडत असल्यामुळे त्यांच्या अंगाला एक विचित्र असा वास येत होता…. खरंतर त्यांच्या आसपास, चार फुटाच्या परिसरात जाणेसुद्धा अतिशय क्लेशदायक होतं…
याची जाणीव त्या बाबांना सुद्धा असावी…. प्रत्येक वेळी ते म्हणत होते, “ माझ्या जवळ येऊ नकोस, मी अत्यंत घाणेरडा झालो आहे… I am infected…!!!”
मी मनात हसत त्यांना म्हणालो, “ जाऊ दे बाबा , आमच्यापैकी सर्वच जण असे आहेत, तुम्ही ते कबूल करत आहात, आम्ही ते कबूल करत नाही, इतकाच काय तो फरक ! “
कडक टॉवेलने अंग पुसून, बाबांना पांढराशुभ्र सदरा आणि लेंगा घातला. मघाचे बाबा ते हेच काय ? असे वाटावे इतका कायापालट झाला होता. यानंतर कडेवर घेऊन मी त्यांना ॲम्बुलन्समधील स्ट्रेचरवर झोपवलं…. एका मिनिटात ते गाढ झोपी गेले…. लहानपणी सोहमला मी असाच अंघोळ घालून, कडेवर फिरवत कॉट वर ठेवायचो आणि तो गाढ झोपी जायचा…. !
का कोण जाणे, परंतु या बाबांमध्ये मला माझा मुलगा दिसत होता…. !
” एकरूप ” होणं हा भाव असेल, तर ” एकजीव ” होणं ही भक्ती आहे असं मला वाटतं… !
नकळतपणे मी या बाबांशी एकरूप नव्हे…. एकजीव झालो होतो !
मी हळूच झोपलेल्या बाबांच्या अंगावर चादर टाकली….
याचवेळी पलीकडच्या मशिदीतून आवाज आला…. कानावर अजान आली…. “अल्लाह हु अकबर”
— चला, बाबांच्या अंगावर टाकलेली माझी चादर मंजूर झाली तर….!
सोमवार १९ डिसेंबर रोजी या बाबांना आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आहे.
बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून मी परत निघालो, बाबा आता प्रसन्न हसत होते. जाताना मला म्हणाले, “ बाळा इतकं केलंस. आता आणखी एक शेवटचं कर… माझ्या घरातल्या लोकांशी संपर्क कर आणि त्यांना माझा निरोप दे, म्हणावं…. मी खुशाल आणि आनंदात आहे. माझ्या अडचणीच्या काळात तुम्ही जे वागलात, त्यात तुमचीही काहीतरी अडचण असेल, फक्त त्यावेळी मला ती समजली नाही इतकंच…. हरकत नाही, माझ्या मनात तुमच्याबद्दल कोणतीही अढी नाही. मी तुम्हाला माफ केलं आहे… त्यांना सांग, मी सर्वांना खरोखर मनापासून माफ केलं आहे “.
— खूप मोठ्या मुश्किलीने शून्यात पहात नमस्कार करण्यासाठी त्यांनी हात जोडले…. नजरेच्या या शून्यात त्यांना त्यांच्या घरातले सर्वजण दिसत असावेत…
इतका वेळ शांत असणारा मी… त्यांची ही वाक्ये ऐकून मात्र चिडलो… रागाच्या भरात ओरडून, मी त्यांना म्हणालो,
“ मी त्या तुमच्या लोकांशी कोणताही संपर्क करणार नाही…. तुमचा माफीनामा पोचवणार नाही… ज्यांनी तुम्हाला इतका त्रास दिला त्या लोकांची थोबाडं मला पाहायची नाहीत… मी काय रिकामा बसलो नाही तुमचा माफीनामा पोचवायला, बाकीची अजून शंभर कामं आहेत मला….”
माझा तोल सुटला होता… म्हाताऱ्या या माणसाला त्यांच्याच घरातल्या सर्वांनी इतकं अडचणीत टाकलं होतं , त्याचा राग मला येत होता आणि हे बाबा त्यांना माफ करायला निघाले होते, त्याचा दुप्पट राग मला आला होता …
यानंतर, तितक्याच शांतपणे हे बाबा मला म्हणाले, “ अरे बाळा चिडू नकोस…. माझ्या घरातल्या लोकांना मी प्रेम, माया, आनंद, सुख, समाधान, दया, क्षमा, शांती या पुस्तकातल्या सर्व शब्दांचा अर्थ आयुष्यभर समजावण्याचा प्रयत्न केला…. परंतु त्यांना हे अर्थ संपूर्ण आयुष्यात कधीही समजले नाहीत… या आजारपणात मी टिकेन की नाही याची खात्री तुलाही नाही आणि मलाही नाही… जिवंत असताना त्यांना कोणत्याही शब्दाचा अर्थ शिकवू शकलो नाही … आता मरताना ” माफी ” या शब्दाचा अर्थ तरी मला त्यांना शिकवू दे बाळा….!!! प्लीज बाळा …. प्लीज हा निरोप त्यांना दे … आयुष्याच्या उताराला, माफी हा शब्द तरी त्यांना शिकण्याची संधी देऊ आपण…! नाही म्हणू नकोस बाळा. माझा “माफीनामा” त्यांना पोचव…. “.
आज मला पुन्हा एकदा पटलं…. सतारीवर दगड जरी मारला तरी तिच्यातून मधुर झंकारच बाहेर येतात…!!!
बाबांनी जे विचार मांडले, त्यात माझ्या खुजेपणाची मला जाणीव झाली…! डॉक्टर झालो …खूप शिकलो … सुशिक्षित सुद्धा झालो, परंतू या सर्व प्रवासात सुसंस्कृतपणा शिकायचं माझ्याकडून सुद्धा राहूनच गेलं यार….!
रस्त्यावरच्या बाबांनी आज मला “ माफी “ या शब्दाचा अर्थ त्यांच्या वागण्यातून समजावून सांगितला…!
बाबांनी पुन्हा हात जोडण्याचा प्रयत्न केला…. काही केल्या नमस्कारासाठी हात जुळत नव्हते…. मी ते दोन्ही हात माझ्या हाताने जुळवले…!
जुळवलेल्या या दोन्ही हातांना कपाळाशी लावून मी फक्त इतकंच म्हणालो, “ बाबा मला माफ करा…!!! “
माफी …. क्षमा …. या पुस्तकात वाचलेल्या शब्दांचा अर्थ मी आज खऱ्या अर्थाने हृदयात घेऊन सुसंस्कृत झालो होतो…. बाबा माझा प्रणाम स्वीकार करा !!!
— समाप्त —
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈