मनमंजुषेतून
☆ नात्यांची “स्माईलिंग फोडणी!”… अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री माधुरी परांजपे ☆
आमटीला फोडणी घातली की कसा चर्र असा आवाज येतो, आणि घरभर घमघमाट सुटतो. तेल, मोहरी, जिरं, हिंग, मेथी, कढीपत्ता, मिरची, हळद यांचा स्वतःचा गंध आणि त्यांच्या एकत्रित झालेल्या सुवासानं सगळ्यांच्या नाकाचा ताबा घेतला जातो!!
ही अशी स्वैपाकातली फोडणी, मग ती भाजीची असो वा आमटीची, सगळ्यांचीच भूक चाळवते, भुरळ घालते, एकत्र आणते आणि तृप्त करते.
नाती पण अशीच हवीत ना !! सगळ्यांना जवळ आणणारी, एकत्र ठेवणारी, हवीहवीशी वाटणारी, तृप्त करणारी !!
— फक्त “अंदाज” बरोबर यायला हवा. प्रत्येक घटक अंदाजानेच, पण प्रमाणात पडायला हवा. नाही समजलं?? अहो, समजा फोडणीत मोहरी, जिरंच जास्तं पडलं, तर भाताशी, पोळीशी खाताना किंवा अगदी पिताना, जिरं मोहरी सारखं दाताखाली आलं तर वैतागायलाच होतं, म्हणून ते प्रमाणातच घालायला हवं. नात्यातही तसंच असतं. कुठल्या नात्यात किती इंटरफिअर करायचं (नाक खुपसायचं) हे समजलं की कोणतंच नातं खुपत नाही.
हिंग कितीही औषधी असला तरीही जास्त पडला की तोंड वाकडं करुन डोळे मिटले जातात आणि राग येतो !!! आपणही कधीतरी प्रमाणाबाहेर बोलतो, पद्धत सोडून बोलतो, तीव्र बोलतो आणि मग ते बोलणं कितीही समोरच्याच्या भल्यासाठी असलं तरी, नात्यांमधे वितुष्ट यायला वेळ लागत नाही.
मेथी जराजरी जास्त पडली, तर जेवणात कडवटपणाच येतो. आपणही कधी कधी राग आला की अगदी टाकून बोलतो, टोकाचं बोलतो, इतरांच्या मनाचा विचार करत नाही. मग नात्यात अढी निर्माण होतेच ना!! अगदीच कबुल आहे, आपल्या माणसांना हक्कानं बोलावं…पण प्रमाणात. एक वेळ स्वैपाक कडवट झाला तरी चालेल, पण नाती नको!!
कढीपत्ता हा सुगंध येईल इतकाच घालावा, नाहीतर जेवण उग्र होतं. माणूस हा कायमच प्रेमात पडत असतो, कधी व्यक्तींच्या, तर कधी वस्तूंच्या !! एकमेकांवर अतोनात प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात गुदमरायला लावणं वेगळं !! स्वतःला आणि इतरांना झेपेल इतकंच प्रेम करावं, नाहीतर नात्यातला सुगंध हरवून जातो.
हळदीचा रंग मोहक, अगदी प्रमाणात घातली की तिच्या गुणांबरोबर तिचं अस्तित्वही प्रेमात पाडतं. गरज असेल तेव्हा मदत जरुर करावी, पण समोरच्याला “स्पेस” ही द्यावी. आपण आहोत, आपलं अस्तित्त्वं आहे, इतकं जरी समोरच्याला जाणवलं ना, की मग सगळंच सोप्पं होतं.
तेलही आवश्यक इतकंच !! भसाभसा ओतून किंवा अगदी थेंबभर घातलं की फोडणी बिघडलीच म्हणून समजा !! जास्त तेल पडलं तर मूळ पदार्थापेक्षा तेलाचीच चव जिभेवर रेंगाळेल, आणि कमी पडलं तर ते इतर घटकांना सामावून कसं घेणार?? नात्यात ओशटपणा नको. आपल्यात इतरांना सामावून घेण्याइतका मोठेपणा असावा, पण आपण किती महान आणि किती चांगले हे त्यांना न जाणवता, कसलाच दिखावा न करता !! तरच मनं एकमेकांत सामावली जातील.
आपल्या स्वैपाकात मिरचीचं प्रमाण कसं आणि किती असावं ? तसंच मुळमुळीत नाती नकोशी होतात अन तिखटपणा, जहालपणा नात्याला सुरुंग लावतो.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आच !! फोडणी फक्कड तेव्हाच जमते, जेव्हा भांड्याखालची आच योग्य प्रमाणात असते अन भांडं योग्य प्रमाणात तापतं तेव्हा !! जर आच प्रमाणापेक्षा कमी असेल, तर फोडणी कच्चीच राहील आणि सगळ्या स्वैपाकाची मजाच जाईल. जर आच प्रमाणापेक्षा जास्त असेल तर रागाप्रमाणे त्यातला प्रत्येक घटक तडतडून अंगावर उडेल, इजा होईल, मोहक हळद काळी पडेल आणि फोडणी जळेल.
—आपल्या नात्यातही आच योग्यच हवी.—- नाती कच्चीही रहायला नकोत अन जळायलाही नकोत.
— तरच नात्यांची फोडणी अचूक जमली, असं म्हणता येईल.
लेखक : अज्ञात
संग्रहिका – सुश्री माधुरी परांजपे
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈