सुश्री प्रभा हर्षे
☆ लेकी … लेखिका- डाॅ.नयनचंद्र सरस्वते ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
ओठांचे कोपरे विलग करत
फुलासारख्या हसत राहतात लेकी
आणि
नाचरी पावले नुसती वाहत राहतात
निर्झराच्या उत्कट आनंदाने…
लेकी रंगीत साड्या नेसतात म्हणे… कानात डूल डुलतात
हातात सुगंधी फुले आणि वाऱ्यावर उडणारे केस
लेकी नाजूक दिसतात…लेकी आकर्षक असतात म्हणे ……
अरे, याच नाजूक-साजूक लेकी
कठीण कातळाला धडका देत
शोधत राहतात निरंतर जिवंत झरे
हे दिसत नाही कुणाला
आणि….
दिसले तरी, करत नाहीत कधीच मान्य…….
पांडुरंगा…
आसुसून-आसुसून कुशीत शिरतात लेकी
तेव्हा शब्द बोलतात वेगळे…स्पर्श सांगतो दुसरे काही……
तुला सांगू का…
काय मागतात रे लेकी…???
नाचऱ्या पावलांमागील समर्थ कर्तृत्व पहा
हसणाऱ्या चेहऱ्यामागील वेदना न्याहाळा
नाजूक हातांनी दिलेल्या धडका अनुभवा
मान्य करा….”अहं ” सोडून…एकदा मान्य करा……
“स्त्री” म्हणून दिसण्यापेक्षा “असणे “…मान्य करा..
काय मागतात रे लेकी…?
आमच्या प्राक्तनातले कातळ आम्ही सांभाळू,
तुम्ही तरी वाटेत उभे राहू नका
नवीन “वांझ कातळ” होऊन…..
कुशीत शिरलेल्या लेकी…
सांगत राहतात ना मूक राहून
तेव्हा…. जीव जळतो पांडुरंगा… जीव जळतो…
असो….
तू “माऊली” म्हणून बोलले हो…
अन्यथा
माऊलीचे जळणे फक्त तिलाच ठाऊक बाबा……..
लेखक : डॉ. नयनचंद्र सरस्वते
संग्राहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈