सौ.मंजुषा आफळे
☆ भावकोष… ☆ सौ. मंजुषा आफळे ☆
रखमा कामाला आली की, तिच्याशी थोडावेळ बोलावं लागतं. सुखदुःख विचारपूस करावी लागते. मी तिला आज सहजच विचारलं, ” कसा चाललाय ग मुलांचा अभ्यास? बरी आहेत का?” रखमाला, दोन मुलं. एक मुलगा पाचवीत तर एक मुलगा तिसरीत. जखमेवरची खपली काढावी, तशी ती बोलू लागली. ” काय सांगायचं ताई, मुलांचा अभ्यास फोनवर झाला आहे म्हणे, शिकवणी बंद आहेत. आम्हाला शिकवाया येत नाही. त्यात फोनसमोर टाईमात बसायला लागतं म्हणे, आणि सारखं ते फोन रिचार्ज करायचं कसं जमणार आम्हाला? बंद झालाय त्यांचा अभ्यास. नुसतीच फिरत्यात. शाळा कधी सुरू होणार हो ताई?” काकुळतीला येऊन विचारत होती. तिच्या या प्रश्नाला माझ्याकडे तरी कुठे उत्तर होतं. .पण तरी जीव एकवटून मी तिला धीर देऊ लागले, ” सर्वांना लस मिळाली की, होईल कमी हा आजार “. ” कसलं काय. ताई, खरं सांगते, माझा मोठा मुलगा शाळेत लय हुशार होता. बाईंनी सांगितलेलं नीट करायचा. म्हणलं, असाच पुढे पुढे शिकला म्हणजे चांगलं होईल. त्याला उद्या मोठा झाला की, कुठं तरी हापिसात नोकरी लागेल. तर हयो काय संकट आलं. पोरं नुसती इथं बस तिथं बस. रिकामं फिरत्यात. कामात लक्ष लागेना माझं ताई ” आणि ती रडायला लागली. मलाही खूप पोटात कालवाकालव झाली..एका आईची सर्व स्वप्नं काचेसारखी ताडताड तुटत होती.आता मी तिला आणखी धीर देऊ लागले. ” हे सगळं लवकर संपेल गं. तूर्त मोबाईलवर अभ्यास परीक्षा चालूच राहतील.” त्यावर ती म्हणाली, “अहो ताई, मुलांना फोनवर अभ्यास करायला जमेना. अभ्यासावरचं लक्ष उडालं. समोर बाई नाहीत, फोटोत दिसतात. त्यामुळे भीती राहिली नाही. आणि आदरबी वाटे ना. त्यांना फोन घेता येत नाही. काही कळत नाही. जून महिन्यात दरवर्षी शाळेची फी, शिकवणीच्या बाईंची फी, दप्तर, डबा देऊन मुलांना शाळेला धाडीत होते. आता सगळं संपलंच ना.” तिच्या डोळ्यात भीती व बोलण्यात निराशेचा सूर होता. मी पुन्हा धीर देत म्हणाले,. ” शाळा बंद आहेत गं,पण अभ्यास चालू ठेवायचा आहे. आता असं कर, तू त्यांना मोबाईल घेऊन माझ्याकडे पाठव. मी सांगेन कसं पाहायचं ते. सगळी पुस्तकं असतात मोबाईलमध्ये. मी घेईन त्यांचा
अभ्यास “. झाले… हे ऐकून मात्र तिचे डोळे हसू लागले. मनातली निराशा आता निघून गेली. तिच्या मनाने उभारी घेतली, व मला म्हणाली, ” खूप उपकार होतील ताई, आत्ता घरी जाते. आणि लावून देतो त्यास्नी तुमच्या घरी. चालंल का?” मी म्हणाले, ” पाठव की “. आणि मग खूप उत्साहाने झपाझप पाऊले टाकीत ती निघून गेली. तिची स्वप्नं पूर्ण करण्याचा तिला मार्ग सापडला होता. तिची पाठमोरी आकृती पाहून मला भरून आले. किती वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत समाजात. लोकांचा आत्मविश्वास ढळतो आहे. कधीकधी आपण अशांसाठी मदतीचा हात पुढे केला पाहिजे.मनामनांतील अशांतता मिटवू या. धीर देऊ या. मदत करू या. कधी शब्दाने तर कधी कृतीतून. त्या़च्या इवल्या इवल्याशा स्वप्नांना खतपाणी घालू या. मग त्यातूनच येणाऱ्या रंगीबेरंगी फुलपाखराची वाट पाहूया. असाच निश्चय करूया…… भावकोश जपू या.
© सौ.मंजुषा सुधीर आफळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈