डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ स्मृती… ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

तरुणपणात कुणाची तरी येते ती आठवण…. म्हातारपणात होतं ते स्मरण…. यानंतरही जिवाभावात उरतात त्या मात्र स्मृती…. ! ऑक्टोबर महिन्यामध्ये घडलेल्या प्रत्येक घटना, स्मृती म्हणून माझ्या मनामध्ये कागदावर शिक्का मारावा त्याप्रमाणे उमटल्या आहेत…! 

… काल घडलेल्या सुखद घटना, शिक्का मारलेल्या या स्मृती, आज घरी येऊन घरातल्या आपल्या लोकांना चौखूर बसवून पुन्हा रंगवून सांगण्यात मजा असते… मी त्यालाच लेखा जोखा म्हणतो !!! 

आमच्या खेडेगावात पूर्वी बुधवारी बाजार भरत असे (आताही तो बुधवारीच भरतो)…. लहानपणी आजीच्या बोटाला धरून मी तिच्या मागेमागे फिरून बाजार करत असे….. सगळ्यात शेवटी ती माझ्यासाठी चार आण्याची भजी विकत घेत असे…. कळकट्ट पेपराच्या पुरचुंडीत बांधलेली ही सहा भजी मी जपून घरी आणत असे … बाजारातून घरी चालत जायला किमान एक तास लागे… तोवर मी साठ वेळा आजीच्या पिशवीतून भज्यांचा पुडा नीट आहे की नाही हे तपासात असे…. त्याचा वास घेत असे…. !  भजी खाण्यात जो आनंद आहे…. त्यापेक्षा त्याचा सुगंध नाकात भरून घेण्यात जास्त मजा असते…. ! 

… एखादं ध्येय प्राप्त करण्यापेक्षा त्या ध्येयप्राप्तीपर्यंतचा प्रवास कधीकधी आनंददायी असतो….!!! 

तर…. घरी जाईपर्यंत त्या कळकट पेपरला भज्यांचं तेल लागलेलं असे…. खून दरोडे बलात्कार आणि राजकारण याच बातम्या त्याही वेळी होत्या… आजही त्याच आहेत…. 

या बातम्यांची शाई माझ्या भजाला आपसूक चिटकत असे…. पण मला त्याचं काही सोयर सुतक नव्हतं ! 

आज वयाने मोठा झाल्यानंतर “भजी” म्हणतो…. लहानपणी “भजं” म्हणत होतो…!

वर्तमानपत्राचा कागद आज जरी बदलला असला तरी बातम्या मात्र त्याच आहेत…. वयाने कितीही मोठा झालो असलो, तरीसुद्धा सामाजिक परिस्थिती विशेष बदललेली नाही…

असो….. 

फरक फक्त इतकाच पडला आहे….. भजी विकणारे, पटका बांधणारे आजोबा जाऊन, त्यांच्या जागी त्यांचा मुलगा आला आहे…

आजोबा भजी विक्री करून “व्यवसाय” करायचे, घराचा उदरनिर्वाह भागवयाचे, मुलगा आता ” धंदा ” करतो….!

मातीची घरं जाऊन सिमेंट ची पक्की घरं झाली आहेत….

घरं पक्की झाली पण नाती भुसभूशीत झाली….!

घरासमोरचं अंगण जाऊन, तिथे पार्किंग ची जागा झाली आहे….

पूर्वी पाऊस पडल्यानंतर अंगणातल्या मातीला “सुगंध” यायचा… हल्ली नुसताच चिखल होतो…. या चिखलात घरापासून दूर गेलेल्या कारच्या खुणा फक्त ठळक दिसतात…

गेलेली मुलं, नातवंडे परत घरी येतील या आशेवर दोन म्हातारे डोळे लुकलुकत असतात…. विझत चाललेल्या दिव्यासारखे ! …. 

माझी आजी गेली त्याला कित्येक वर्ष झाली… परंतु पडक्या त्या वाड्याला तिच्या स्मृतीचा सुगंध आहे…!… 

…. चार आण्याला हल्ली भजी मिळत नाहीत…. ते चार आणे भूतकाळात मी हरवून आलो आहे… तेलाचा डाग पडलेला तो वितभर पेपर…. पटका घालणारे ते बाबा… आन् वर दोन भजी जास्त घाल म्हणून वाद घालणारी ती माझी आजी…! 

आज जरी मी हे सगळं हरवलं आहे, तरीसुद्धा….तेलाचा डाग पडलेल्या, त्या कळकट पेपरमधल्या भज्यांच्या सुगंधासारख्या…. या सर्व स्मृती अजूनही मनात दरवळत आहेत… खमंग… खमंग !!! 

या महिन्यात दिवाळी होती….! 

मोठ्या हौसेने आम्ही सुद्धा पणत्या घेतल्या पण आमच्या घरात त्या लावल्या नाहीत…. आम्ही त्या चार जणांना विकायला लावल्या…. ! 

… विकलेल्या पणत्यांनी एका बाजूचं घर उजळेल…. तर दुसऱ्या बाजूला असणाऱ्या घराची भूक शमेल…! 

आम्ही घरीच उटणं केलं …. रस्त्यावरील याचकाकडून त्याचं पॅकिंग करून घेतलं…. त्या बदल्यात त्यांना पगार दिला… या उटण्यात आम्ही चंदनाचे चूर्ण घातले होते… या उटण्याला चंदनाचा सुगंध येतोय की नाही माहित नाही, पण कष्टाचा सुगंध नक्कीच आहे ! 

आमच्या खेडेगावात पूर्वी प्रथा होती…  घरामध्ये फराळ तयार झाला की, ताटंच्या ताटं भरून ती गल्लीतल्या शेजार पाजारच्या लोकांना द्यायची….. जणू शेजारच्यासाठीच घरी फराळ तयार करत आहोत… आम्ही पोरं सोरं ही ताटं लोकांच्या घरी पोहोचते करत असू….  त्यावर एक फडकं झाकलेलं असे…. वाटेत जाताना हे फडकं हळूच बाजूला करून चिवड्यातल्या खमंग तळलेल्या खोबऱ्याच्या चकत्या आणि शेंगदाणे खायला मिळत, म्हणून हे ताट पोहोचवण्याचं काम अंगावर घ्यायला आम्ही प्रत्येक जण उत्सुक असत असू … घरातून भरलेलं ताट दुसरीकडे घेऊन जाईपर्यंत निम्मं व्हायचं… यात खूप “मज्जा” यायची….! 

सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की खेड्यातली ही प्रथा आताच्या आपल्या समाजातल्या अनेकांनी आजही जपली आहे…. 

ताटंच्या ताटं भरून यावेळी समाजातल्या अनेक दानशूरांनी आमच्याकडे फराळ पाठवला… किमान 30 हजार लोकांना पुरेल इतका हा फराळ होता…

… गावाकडल्या स्मृतीचा गंध पुन्हा मनात दरवळला….… लहानपणीप्रमाणेच याहीवेळी आम्ही फडकं झाकून फराळाचं ताट घेऊन रस्त्यावर गेलो…. पण यावेळी तळलेल्या खोबऱ्याच्या खमंग चकत्या आणि शेंगदाणे आम्ही खाण्याऐवजी पोराबाळांची वाट बघणाऱ्या…. लुकलूकणारे डोळे आणि थरथरते हात घेऊन जगणाऱ्या जीवांना भरवल्या … .. आपण घेण्यापेक्षा, दुसऱ्याला देण्यामध्ये जास्त “मज्जा” येते हे आता कळलं…. ! 

वैद्यकीय उपक्रमांतर्गत या महिन्यात जवळपास ९०० रुग्णांवर रस्त्यावरच उपचार केले. आणि १६ गंभीर रुग्णांना विविध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून उपचार करून घेतले आहेत. गरजूंना वैद्यकीय साधने (व्हीलचेअर, कमरेचे पट्टे, कुबड्या,  मास्क, sanitizer, स्टिक, गुडघ्याचे तथा मानेचे पट्टे,) दिले आहेत. 

वृद्ध लोक, ज्यांना कानाने बिलकुल ऐकायला येत नाही, वृद्धापकाळाने डोळ्यांना दिसत नाही आणि त्यामुळे रस्ता ओलांडताना एक्सीडेंट होऊन मृत्यू होतात, अशा सर्वांना कानाची मशीन दिली आहेत, डोळ्यांची ऑपरेशन्स केली आहेत. या सर्व वृद्धांच्या, आवश्यक त्या सर्व तपासण्या आपण  रस्त्यावरच केल्या आहेत. 

शैक्षणिक उपक्रमांतर्गत ज्या मुलांनी शिक्षणाची वाट धरली आहे अशा सर्वांना काय हवं नको ते पाहून गरजेच्या शैक्षणिक बाबी पुरवल्या आहेत. 

या महिन्यात अनेक गोरगरिबांना शिधाही दिला…

आमच्या परीनं आम्ही दिवाळी साजरी केली….

या अल्लाह…. दर्गाहमे हमने कोई चादर नही चढाई…. मगर रस्तेपे जो बुजुर्ग थंडमे मुरझाये पडे थे…. उनके शरीर पे चादर चढाई है …. 

Dear Jejus, we have not offered a single candle to you in this Diwali …. But we have enlightened the houses of many poor people…! 

वाहे गुरूजी का खालसा वाहेगुरूजी की फतह…

इस बार हम ने गुरुद्वारेपे नही….रस्तेपेही लंगर आयोजित किया था…

पंजाबी या गुरुमुखी भाषा तो आती नही मुझे… लेकिन बिना शब्दोंकी बोली जो हमने बोली ….क्या वो आपकी भाषा से अलग है ? … 

देवी माते … नवरात्रात तुला साडी चोळी अर्पण करण्यापेक्षा, फुटपाथवरच्या मातेला आम्ही साडी चोळी अर्पण केली गं … ! त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले…. ते तुझेच तर  होते…..

हे शंकर भगवान…. भोलेनाथा…. लोक तुम्हाला दुधाचा अभिषेक करतात…. तुम्हाला अभिषेक करण्याऐवजी उपाशी आणि नागड्या पोरांना मांडीवर घेऊन, आम्ही त्यांना दूध पाजले आहे… यानंतर तुमच्या मुद्रेवर जे प्रसन्न हास्य उमटलं…. ते मी दिवाळीचा दिवा म्हणून मनात साठवून ठेवलंय…..

हे गजानना…. चतुर्थीला तुला मोदकाचा “नैवेद्य” दाखवण्याऐवजी रस्त्यावर भुकेचा महोत्सव मांडून…. भुकेल्यांना मोदक भरवून त्यांचा आनंद  “प्रसाद” म्हणून  आम्ही मिळवला आहे… ! 

आणि हो… हे सारं करण्याबद्दल मी तुमची मुळीच माफी मागणार नाही…. ! 

कारण…

…. हे सर्व माझ्या हातांनी करणारे…

…. करवणारे…

…. करवून घेणारे…

… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात… तुम्हीच आहात…!!!

 © डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments