सौ. सुचित्रा पवार

??

स्त्री… आज व उद्या… ☆ सौ. सुचित्रा पवार ☆

सावित्री ज्योतिबाने स्त्रियांच्या उद्धारासाठी स्त्री शिक्षणाचा पाया घातला अन स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली .जिथं माणूस म्हणून जगण्यास देखील ती लायक नव्हती, ती आता शिक्षण घेऊन साक्षर झाली ,अक्षर ओळख पाप नसून अक्षरे जीवनाची दशा आणि दिशा बदलतात हेच जणू ज्योतिबाना सिद्ध करायचे होते ! अन फल निश्चिती स्वरूपात अनेक स्त्रिया शिकल्या ,सुशिक्षित झाल्या ,कुणी उंबऱ्याबाहेर पडल्या ,कुणी हक्कासाठी ,न्यायासाठी लढू  झगडू लागल्या ,उच्च पदावर गेल्या ,जग भ्रमंती करू लागल्या ,मनातल्या भावना कागदावर उतरू लागल्या ,आज विविध क्षेत्रातली त्यांची कामगिरी पहाता त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व सिद्ध होते ,घर नोकरी या जबाबदाऱ्या पार पाडत दमछाक झाली पण त्यांनी त्यांची स्वप्ने सत्यात उतरवली .हा झाला एक भाग.

शिक्षण सर्वदूर पसरले ,स्त्रिया जागरूक झाल्या समान संधी ,समान अधिकार मिळाले,आर्थिक स्वावलंबी झाली आर्थिक परावलंबित्व सम्पले, स्वतःची प्रगती झाली आणि आज ही गोष्ट सर्व सामान्य झालीय पण अपवाद वगळता असे दिसते की स्त्रियांची आत्मिक, वैचारिक प्रगती झालीय का ? त्याचे उत्तर ‘नाही’ असेच दिसून येते. आमचे शिक्षण  फक्त साक्षरता अन करिअर नोकरी याभोवती फिरतेय,अजूनही आम्ही जुन्या ,बुरसटलेल्या रुढींचे, परंपरांचे,अन वैचारिक गुलामगिरीचे प्रतिनिधित्व करतो. आमच्याकडे सारासार विवेक बुद्धीचा अभावच दिसून येतो. अजूनही आमच्याकडे निर्णयक्षमता नाहीये ,आमची तेजस्विता ,तपस्विता संपून आम्हाला चमकण्यात धन्यता वाटू लागलीय. मनावर ,आत्म्यावर उत्कृष्ट संस्काराचा अभाव दिसून येतोय. भौतिक सुखांचा हव्यास अन अट्टाहास धरत आम्ही आत्मोन्नतीस हद्दपार केलेय. अन म्हणूनच कर्तृत्वाच्या पायऱ्या चढताना आम्ही त्याग ,संयम ,आत्मिक सुख ,समाधान ,शालीनता ,नात्यातले समर्पण ही अदृश्य पण सदृश्य चिरंतर परिणामकारक मूल्य विसरतोय.  कुणी तरी सुंदर म्हणावे , कुणाला तरी खूश करण्यासाठी धडपडत असतो ,  बाह्य सौंदर्यावर  मग मिळवलेले पैसे खर्च करतो .अजूनही आम्हाला शोभेची बाहुलीच होणे मान्य आहे. क्षणिक सुखासाठी आम्ही रात्रदिन झटतो पण आत्मिक सुखासाठी कमी झटताना दिसतो . अपवाद आढळतात पण अपवाद नियम होत नाही . आम्ही मग शिक्षणाच्या मूळ उद्देशापासून दूर चाललो आहोत भरकटतोय असे वाटते कारण वैचारिक प्रगतीचा अभावच दिसतोय ही झाली दुसरी बाजू !

आता तिसरी बाजू…   स्त्री कितीही शिकली तरी तिच्या आत्मसन्मानाला कुटुंबात किंवा समाजात खरेच प्रतिष्ठा आहे ? तर ‘नाहीच !’ असेच म्हणावे लागेल , अजूनही कुटुंबातील तिचे स्थान दागिने ,साडी एवढेच मर्यादित आहे आणि आम्हालाही अजून यातच धन्यता वाटते ,आम्ही आमच्यासारख्या प्रगतीपासून दूर असलेल्या स्त्रियांसाठी काही करू इच्छित नाही , समाजात अजूनही आम्हाला एकटे रहाता येत नाही , एकट्याने जीवनाची मौज अनुभवता येत नाही कारण जिथे तिथे उरी भयच बाळगावे लागते एकविसाव्या शतकात आमच्या प्रति पुरुषांची ,समाजाची दृष्टी निकोप ,स्वच्छ नाही अन आम्हा स्त्रियांची देखील नाही आम्ही अजूनही पूर्ण भयमुक्त नाहीत ही खरेच शोकांतिका आहे ! 

कधी कधी वाटते की स्त्रियांचे मूळ प्रश्न थोड्याफार फरकाने तसेच आहेत. जेव्हा माणूस म्हणून ती स्वतःचा  विचार करेल व समाजही तिचा  विचार करेल, तेव्हाच आमचा खऱ्या अर्थाने उद्धार झाला असे म्हणता येईल अन उद्याची स्त्री आनंदाने आकाशात स्वैर भरारी घेईल  आकाश स्पर्शून माणूस म्हणून स्वतःकडे पाहील…..  

…  ” तू स्वयं दीप हो ,अक्षदीप हो …”

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments