डॉ. ज्योती गोडबोले

 ? मनमंजुषेतून ?

☆ रंग माझा वेगळा — सुश्री सुलभा गुप्ते  ☆ डॉ. ज्योती गोडबोले

रंगात रंग तो गुलाबी रंग ।

मला बाई आवडतो श्रीरंग ॥

…. छेः छेः ! गैर समज करून घेऊ नका . माझे नाव गुलाबी नाही आणि मी हा नवऱ्याच्या नावाचा उखाणाही घेतलेला नाही, त्याचे नाव पण श्रीरंग नाही. कोणी म्हणेल लेखिकेच्या मनात आधीच होळीचे रंग भरलेत , तसे पण नाही.

इंद्रधनुष्याचे सात रंग सर्वज्ञात आहेत … ” ता ना पि हि अ नि जा “.. असे इंद्रधनूचे रंग लक्षात ठेवण्याचे सोपे सूत्र शाळेत आम्हाला शिकवले होते . तसेच हे सात रंग एकत्र येतात तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते , जे फक्त आकाशात दिसते ही निसर्गाची किमया . आणि ते बघायला आबालवृद्ध सगळेच धावतात, कारण हे अद्भुत बघून खूप आनंद होतो.

माणसाच्या आयुष्यात देखील हे सात रंग कधी ना कधी डोकावून जातात.

केशरी रंग  त्यागाचा…. 

पांढरा रंग शांतीचा…. 

हिरवा भरभराटीचा…. 

गुलाबी रंग प्रेमाचा…. 

लाल रंग रक्ताचा…. 

काळा म्हणजे निषेध !…. 

अशा सर्व संमत कल्पना आहेत.

…. माझ्या मनात मात्र प्रत्येक रंगाच्या वेगळ्या कल्पना आहेत. रंगांशी निगडित आपल्या भावना, अनुभव असतात. तो तो रंग बघून त्या भावना जागृत होतात….. 

केशरी म्हटले की डोळ्यांसमोर उभा राहतो, डौलाने डुलणारा , शिवाजी महाराजांचा ” भगवा “…  मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक, महाराष्ट्र धर्माची, हिंदू धर्माची शान, देवळांच्या शिखरांवर शोभणारे केशरी ध्वज !

विजय पताका !

पांढरा रंग म्हणताच मला आठवतात  हिमालयाची उंच उंच बर्फाच्छादित शिखरे . त्यागाचे प्रतीक . उन्हातान्हाची पर्वा  न करता वर्षानुवर्षे उभे राहून सीमेचे रक्षण करणारा, आपल्या उंचीने भारताची शान उंचावणारा नगाधिराज हिमालय . मनात अभिमान उत्पन्न करणारा ! पांढरा रंग आणखी एक आठवण करून देतो — – सर्वसंग परित्याग करून पांढरी वस्त्रे  परिधान करणारे श्वेतांबर जैन साधू ! आपोआप आदराने आपण नतमस्तक होतो. 

हिरवा रंग तर सृष्टीचा …. ” हिरवे हिरवेगार गालिचे । हरित तृणांच्या मखमालीचे ” …. 

बारकाईने विचार केला तर निसर्गात हिरव्या रंगाची लयलूट आहे . गवत हिरवे , इवल्या रोपट्यांची पाने हिरवी, वृक्षलतांची पाने हिरवी . झाड – लहान असो की मोठे पाने मात्र हिरवीच ! मातृत्वाची चाहूल लागलेल्या तरुणीसारखी, हिरव्या रंगाने नटलेली सृष्टी ! काय विलोभनीय रूप तिचे !

लाल रंग आणि रक्ताचे जवळचे नाते . माझ्या डोळ्यांसमोर येथे युद्धभूमीवर सांडलेले सैनिकांचे रक्त आणि जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान . रक्तच ! पण एक मातृभूमीसाठी सांडलेले आणि दुसरे कुणा अनोळखीचा जीव वाचवण्यासाठी केलेले रक्तदान. 

काळा रंग निषेधाचा ! मोर्चामध्ये वापरतात काळे झेंडे, पण माझ्या मनात चित्र उभे रहाते – पावसाळ्यातले ते काळे ढग – पावसाच्या आगमनाची शुभवार्ता घेऊन येणारे दूतच ते ! बळीराजाला आनंद देणारे, ग्रीष्माच्या उन्हाने तापलेल्या तृषार्त भूमीला शांतीचा संदेश घेऊन येणारे !

आता मुख्य माझा आवडता रंग – – अहो कोणता काय ? ??

अर्थात गुलाबी….. 

नवजात बालकाच्या ओठांचा गुलाबी…. 

प्रेयसीच्या ओठांचा गुलाबी…. 

लज्जेने प्रियेच्या गालांवर फुलणारा गुलाबी…. 

मधुर, औषधी गुलकंद बनवावा असा गुलाबांचा गुलाबी…. 

आपल्या उमलण्याने आसमंत दरवळून टाकणारा सुंदर गुलाब , रंग गुलाबी ….. 

…. हे सर्व तर अर्थात मोह पाडतातच.  पण मुख्य म्हणजे – लहानपणापासून ऐकलेले, वाचलेले, फोटोत पाहिलेले – सावळ्या घननीळाचे गुलाबी पदकमल….. 

कमलपुष्प अधिक गुलाबी,…. की भगवान श्रीकृष्णाची सुकुमार पावले अधिक गुलाबी ? मनात नेहमीच संभ्रम निर्माण होतो . पण म्हणूनच माझा आवडता रंग….. 

श्रीरंग ! भक्ति प्रेमाचा रंग श्री रंग…. 

आठवा रंग….  श्री रंग…. 

लेखिका : सुलभा गुप्ते, सिडनी .

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments