सुश्री सुनिता गद्रे

??

 ☆ नातवंडांचे दादाजी… ☆ सुश्री सुनिता गद्रे ☆ 

बारा वर्षांपूर्वीची गोष्ट… त्यावेळी आम्ही मुलाकडे बेंगलोरला गेलो होतो. दीड एक वर्षाचा मोठा नातू  बोलायला लागला होता. समोर राहणाऱ्या सिंधी परिवारात तो खूप रमायचा. त्यांच्यात जे आजोबा (दादाजी) होते, त्यांना तो ‘दाद्दाजी’ म्हणायला लागला होता. मग काय त्याने ‘ह्यांना’ही दाद्दाजी म्हणायला सुरुवात केली. आबा,आजोबाऐवजी ह्यांचे दादाजी हेच संबोधन रुढ झाले.. आणि त्यांना ते आवडले ही !

२०१९ मध्ये आम्ही ऑक्टोबर महिन्यात बेंगलोरला गेलो होतो. परत यायची काही गडबड नव्हती. तिथे नेहमीप्रमाणेच आमचं छानपैकी  रुटीन सुरू झालं होतं. दादाजींचं मॉर्निंग वॉकला जाणं, कूक अम्मा घरात किती चांगला नाश्ता बनवत असली तरी बाहेरून इडली- वडे, उपीट, सेट डोसा असं काहीतरी खाऊन येणं, घरात कुठली भाजी आहे कुठली भाजी नाही हे न बघता खूप सगळी भाजी घेऊन येणं, वेळ मिळेल तेव्हा नातवंडांना शिस्त लावणं, त्यांच्याकडून योगाभ्यास करून घेणं  इत्यादी!

एक फरक मला यावेळी जाणवला तो म्हणजे आपल्या पाच आणि नऊ वर्षाच्या नातवंडांबरोबर ते त्यांच्या वयाचे होऊन खेळू लागले होते. आपलं  वय वर्षं 78 विसरून!

एक दिवशी मला ग्राउंड फ्लोअर मधूनच मुलांच्या आयाचा फोन आला, ” मॉंजी, दादाजी ध्रुव, मिहीर के साथ फुटबॉल खेल रहे है .” मी दचकले. ताबडतोब तिथे पोहोचले. एक बेंचवर दादाजी आपले दोन्ही गुडघे चोळत बसलेले दिसले. “आजी, दादाजीनं जोरात किक् मारली” ध्रुवनं माहिती पुरवली. ” ते ना पळत जाऊन फुटबॉल पण पकडत होते.” त्याचं गुडघ्याचे दुखणे, चालतानाही होणारा त्रास. याची सगळी आठवण मला करून द्यावी लागली. त्यानंतर त्यांचे फुटबॉल खेळणे थांबले. पण दिवसेंदिवस मी पाहत होते, त्यांचं मुलांच्या वयाचं होऊन खेळणं वाढतच होतं. कॅरम खेळताना, पत्ते खेळताना जरा मुलांना जिंकून द्यायचं…. जसं मी करते… हे माझं म्हणणं त्यांच्या कानापर्यंत पोहोचायचंच नाही. हळूहळू मी पण दुर्लक्ष करायला सुरुवात केली. ‘ चालू दे दादाजी आणि नातवंडांच्या दंगा ‘ असा विचार करून !

मग एक दिवस त्यांचं लहान मुलांबरोबर छोट्या सायकलवरून अपार्टमेंटला चकरा मारणं, ही तक्रार माझ्या कानावर पडली. ग्राउंड फ्लोअरवरून  शाळेतून आलेल्या नातवांबरोबर लिफ्ट सोडून जिन्यावरून सातव्या मजल्यापर्यंत जिने चढून येणं…. ही त्या तक्रारीत पडलेली भर. एकदा तर छोटा नातू सांगू लागला, “आजी आज तिकदे कोणीही बघायला नव्हतं ना तल दादाजी माझ्याबलोबल घसलगुंदीवल चधला. आणि अगं खूप जोलात खाली आपतला, पदला.. मी खलं सांगतोय.. विचाल त्याला बाऊ झालाय का ते.”

हे मोठ्या मजेत हसत उभे होते. मी कपाळाला हात लावला.. त्या क्षणी एकदमच माझ्या मनात विचार आला,

‘लहानपणी कधी घसरगुंडीवर बसायला मिळालेच नसेल. तेव्हा कुठे होते असले चिल्ड्रनपार्क.. घसरगुंडी… झोपाळे.. सिसॉ… आणखी काय काय! मनात खूप खोलवर दडलेल्या सुप्त इच्छेनेच त्यांना असं करायला भाग पाडलं असेल.

तीन महिने असेच दादाजींनी त्यांचे बालपण जपण्यात व्यतीत  केले. आम्हाला माधवनगरला परत यायला चार-पाच दिवसच उरले होते. एक दिवस दादाजींनी स्वतःबरोबरच ‘विटामिन सी’ ची एक एक टॅब्लेट मुलांच्या हातात ठेवलेली मी पाहिली.” अरे मिहीर, ते औषध आहे .नका खाऊ. कडू कडू आहे.” मी जरा जोरातच ओरडत तिथे जाऊन पोहोचले. तोपर्यंत दोघांनी गोळ्या चोखायला सुरुवात केली होती. ” नाही आजी, गोली कदू नाहीय.. गोली आंबत गोद आंबत गोद.. छान छान आहे, ए दादाजी आजीला पण दे एक गोली ” धाकटं मापटं खूप खुशीत येऊन बोललं.” ‘विटामिन सी’ ची गोळी खाऊन नातवंडं खूप खुश झाली होती.

काही बोलायला मला जागाच राहिली नव्हती. नेहमीच एक गोष्ट मी मार्क केली होती की हल्ली जे  सुना-मुलींचे नवऱ्याला नावाने हाक मारणे, किंवा मुलांचे वडिलांना” ए बाबा,ए डॅडी”म्हणणे हे ह्यांना अजिबात पसंत नव्हते. पण नातवंडे पहिल्यापासून ए दादाजी म्हणायची. त्यावर त्यांचा अजिबात आक्षेप नव्हता. उलट खूप समाधान त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले असायचे.

मुलगा डॉक्टर… मी लगेच विटामिन सी बाबतची गोष्ट त्याला सांगितली .”जाऊ दे आता, चार-पाच दिवसांचा प्रश्न आहे ना? ते काही ऐकणार नाहीत. तू काळजी करू नको. पाहिल्यात मी त्यांच्याकडच्या टॅब्लेट्स. जास्त स्ट्राँग नाहीत.” मुलाने मला समजावले.

माधव नगरला परत जाण्यासाठी आम्ही स्टेशनवर पोहोचलो.तेव्हा माझ्या लक्षात आलं की बेंगलोरला येताना दादाजींच्या हातात काठी होती. गुडघेदुखीमुळे चालताना सपोर्ट म्हणून ते हातात नेहमी काठी बाळगायचे .पण या तीन महिन्याच्या मुदतीत त्यांच्या हातून काठी कधी सुटून गेली कळलेच नाही. नातवंडांबरोबर खेळून एक वेगळीच शक्ती त्यांच्यात आली होती. त्यांना एक छान टॉनिक मिळालं होतं.

यथावकाश फेब्रुवारी 20 मधे आम्ही माधवनगरला येऊन पोहोचलो .करोनाची थोडीशी सुगबुगाहट सुरू झाली होती. नंतर पुढे 2020 साल आणि अर्धे 21साल करोनामय झाले.  आम्हीही बेंगलोरला जाऊ शकलो नाही …आणि ते लोकही इकडे येऊ शकले नाहीत. दादाजी आणि नातवंडांची गाठ भेटही झाली नाही.

कधी कधी माझ्या मनात यायचं की खरेच सत्तरी पार केलेले आम्ही सगळेजण आणि ऐशी गाठलेले ते …. सर्वजणच आपापल्या घसरगुंड्यांवर बसलो आहोत. काही घसरगुंड्या कमी उताराच्या… काही जास्त उताराच्या… काही खूप उंच.. काही घुमावदार, प्रत्येक जणाला उतारावरुन घसरत जायचेच आहे. पण कोणी मुंगीच्या वेगाने,कोणी रखडत रखडत ,कोणी वेग आला की रडतडत, तर कोणी क्षणार्धात घसरून जाणार आहे.      

दादाजींनी जोरात घसरत जाण्याचा मार्ग स्वीकारला. 14 सप्टेंबर 2021 ला हसत बोलत चहा पिता पिता ते क्षणार्धात त्या अदृश्य घसरगुंडी वरून सरकन् घसरत आमच्यापासून दूर गेले.. पुन्हा परत न येण्यासाठी ! आम्हा सर्वांसाठी तो अविश्वासनीय असा खूप मोठा धक्का होता. पण काय करणार…. रिवाजाप्रमाणे सगळे धार्मिक क्रियाकर्मं पार पडले. आणि मुलांबरोबर मी ही बेंगलोरला गेले.     

एके दिवशी संध्याकाळची वेळ… अंधार पडू लागला होता. हळवं मन कावरं बावरं झालं होतं .”आजी ही बघ दादाजीची काठी”. नातवंडे मला म्हणाली .वस्तुस्थिती समजून ती दोघेपण आता नॉर्मल झाली होती .”आजी लोकं डाईड झाली की ती स्काय मध्ये जातात नां.  आणि मग देवबाप्पा त्यांना स्टार बनवतो नां!…मी नकळत मान हलवली. “आजी आम्ही दादाजीची काठी खेळायला घेऊ शकतो?” ते दोघं विचारत होते……. आणि काहीच न बोलता बधिर मनाने मी एकदा त्या काठीकडे आणि एकदा आकाशातल्या एका.. इतरांपासून दूर एकट्याच मंदपणे चमकणाऱ्या ताऱ्याकडे विमनस्कपणे पाहत राहिले होते.

संग्राहिका – सुश्री सुनीता गद्रे

माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments