श्री विश्वास विष्णु देशपांडे
मनमंजुषेतून
☆ माती भिडली आभाळा… भाग-2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆
(म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या. इथून पुढे…)
तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा ! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. उगीच नाही गोविंदाग्रजांनी ….
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
…असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले ! इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता,तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे.
पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान ! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह.भ.प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे.
पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं ? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे.
समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहूचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले. तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे.
तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं.
– समाप्त –
(कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा.)
©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे
चाळीसगाव.
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈