☆ बोलू कौतिके… अर्थात Art of appreciation… ☆ सुश्री लीना सोहोनी ☆
कौतुक, प्रशंसा, स्तुती हे एकाच वर्गातील पण जरा वेगवेगळ्या भावच्छटा असलेले शब्द आहेत. कौतुक हे मनापासून असतं, प्रशंसा लोकांसमोर, जरा वाजत गाजत करायची असते पण ती खरीच असते, तर स्तुती ही केवळ समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करण्यासाठी, त्या व्यक्तीच्या पुढे पुढे करण्यासाठी करण्यात येते व त्यामागे स्तुतिपाठकांचा बरेचदा सुप्त हेतू ( hidden agenda) असतो. पण आत्ता आपण केवळ कौतुकाविषयीच बोलणार आहोत. एखाद्याच्या achievement बद्दल मनापासून खरं खुरं कौतुक वाटणं आणि ते वाटत असल्याचं आपण शब्दातून किंवा कृतीतून त्या व्यक्तीपर्यंत पोचवणं. मग ते कौतुक शब्दात असेल, नजरेत असेल, कृतीत किंवा पाठीवर दिलेल्या शाबासकीत व्यक्त केलेलं असेल. पण ते व्यक्त होणं महत्वाचं!
बरेच वेळा आपल्या परिचयातील एखाद्या व्यक्तीने काहीतरी वाखाणण्याजोगी कामगिरी करून दाखवलेली असते आणि ही गोष्ट इतकी सोपी नाही किंवा कदाचित ती आपल्यालासुद्धा जमणार नाही, ही गोष्ट आपल्याला मनातून खरंच पटलेली असते. पण तरीही आपण त्या व्यक्तीला मनापासून, भरभरून दाद देत नाही, आपल्या तोंडून कौतुकाचे शब्द बाहेरच पडू शकत नाहीत.
असं का होत असावं?
याचा जर नीट विचार केला, तर याचं उत्तर मनाच्या कोपऱ्यातच कुठेतरी दडून बसलेलं असतं. कदाचित आपण समवयस्क असू, नाहीतर मग समव्यावसायिक असू…कदाचित ती व्यक्ती आपल्याहून वयाने, अनुभवाने लहान असेल आणि तिचं हे अनपेक्षित यश आपल्या अहंकाराला थोडासा धक्का देऊन गेलं असेल. पण मग आपण जर मनातून असं ठरवलं, की हा आपला अहंकार जरा वेळ बाजूलाच ठेवून द्यायचा आणि त्या व्यक्तीचं अगदी मनापासून, दिलखुलासपणे कौतुक करायचं..आणि आपण जर खरोखर तसं केलं, तर त्याचा आपल्या आयुष्यावर फार मोठा, अगदी दूरगामी परिणाम दिसून येतो.
पहिलं म्हणजे तुमच्याकडून अनपेक्षितपणे आलेल्या त्या कौतुकाच्या शब्दांमुळे त्या व्यक्तीला अतिशय अप्रुप वाटतं, दोन मनं जवळ येतात आणि तुमच्यात व त्या व्यक्तीमध्ये एक अतूट नातं निर्माण होतं. दुसरं म्हणजे आपणच निर्मळ मनाने दुसऱ्या व्यक्तीचं जे appreciation केलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला आपलंच कौतुक वाटतं. आपण आपला अहंकार क्षणभर बाजूला ठेवू शकलो, दुसऱ्याच्या आनंदात निरामय वृत्तीने सामील होऊ शकलो, ह्याचा आनंद फार मोठा असतो.
माझ्या मनोवृत्तीत बदल घडायला असाच एक प्रसंग घडला आणि मला त्यातून एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या ओळखीची एक होती. वयाने माझ्यापेक्षा तरुण, हुशार, स्मार्ट, कॉन्फिडन्ट, लोकप्रिय.. तिच्या सहवासात येणाऱ्या इतर स्त्रियांना नक्कीच न्यूनगंड निर्माण होईल, असंच तिचं व्यक्तिमत्व होतं. मीही त्या गोष्टीला अपवाद नव्हते. आमची दोघींची मैत्री होणं शक्यच नव्हतं.
पण एक दिवस एक वेगळीच गोष्ट घडली.
तिने एका स्पर्धेत स्पर्धक म्हणून भाग घेतला होता, त्या स्पर्धेची मी नेमकी एकमेव परीक्षक होते. परीक्षण गुप्तपणे करायचं असल्यामुळे तिला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. अपेक्षेप्रमाणेच ती या स्पर्धेत पूर्ण तयारीनिशी उतरली होती. इतर स्पर्धकही तसे तुल्यबलच होते. थोडक्यात सांगायचं, तर मी त्या स्पर्धेत तिला डावलून दुसऱ्याची निवड केली असती, तरी या कानाचं त्या कानाला कळलं नसतं. स्पर्धेचा निकाल ऐकल्यावर तिचा तो कॉन्फिडन्स, तो नखरा किंचित उतरला असता, ते सुंदर धारदार नाक जरातरी खाली झालंच असतं. केवढी संधी माझ्याकडे आयती चालून आली होती.
काय करू? मीच परीक्षक असून तो मला माझ्या परीक्षेचा क्षण वाटला. मी स्वत:शी भांडले आणि अखेर माझ्या विवेकाने मला हरवलं. मी माझ्या सारासार विवेकाला म्हणाले, “ तुझं खरंय. आज मी जर नि:पक्षपातीपणाने निर्णय दिला नाही, तर मीच माझ्या मनातून उतरेन. मला माझ्या वागण्याची लाज वाटेल आणि मी स्वत:ला कधी माफ करू शकणार नाही. त्यामुळे आज मी तिचा जाहीर हिरमोड करण्याची ही संधी सोडून देते आणि तिला तिच्या पात्रतेनुसार या स्पर्धेत प्रथम क्रमांक देऊन टाकते.
यथावकाश स्पर्धेचा निर्णय जाहीर झाला. तिने मोठ्या दिमाखात मला फोनवर ती बातमी कळवली. मी तिचं मोजक्या शब्दात अभिनंदन केलं. बक्षीस समारंभाला मी हजर राहू शकले नाही, म्हणून माझं मनोगत लिहून संयोजकांकडे पाठवून दिलं. अखेर त्या समारंभात तिला त्या स्पर्धेचं परीक्षक कोण होतं ते समजलं. दुसऱ्या दिवशी तिचा परत माझे आभार मानायला फोन आला. मी म्हटलं, “माझे कशासाठी आभार? You deserved it, so you got it.”
नंतर ती मला तिच्या बक्षिसाची पार्टी द्यायला रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेली. मीही तिला एक छानशी गिफ्ट घेऊन गेले. त्या स्पर्धेचा आणि परीक्षणाचा विषय निघालाच नाही, पण आमच्या चांगल्या ३-४ तास गप्पा रंगल्या. त्या दिवशी मला एक जिवाभावाची मैत्रीण मिळाली. आमची सुमारे वीस वर्षापूर्वी झालेली मैत्री अजूनही तेवढीच घट्ट आहे. तिची मुलगी माझी लाडकी भाची आहे आणि मी तिची फेव्हरिट मावशी. एकमेकींच्या आयुष्यातील सुखदु:खांच्या क्षणाच्या आम्ही साक्षीदार झालो आहेत.
आपल्या मनातल्या सतत वर डोकं काढू पाहाणाऱ्या अहंकाराला जर आपण दडपून गप्प बसवू शकलो, तर आपल्याला जन्मभर पुरेल एवढी प्रेमाची, मैत्रीची शिदोरी प्राप्त होते, हा माझा अनुभव आहे. पुढील आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, पण प्रत्येकवेळी मी मनातल्या अहंकाराला बाजूला ठेवून मनात उमटलेले योग्य ते कौतुकाचे शब्द त्या त्या व्यक्तींपर्यंत पोचवू शकले.
गेल्या आठवड्यात एका कार्यक्रमासाठी परगावी गेले असताना मला तिथे एक मैत्रीण म्हणाली, “ आमच्या इथल्या वर्तुळात खूप हेवेदावे, गटबाजी चालते. तुमच्या पुण्यात तसं काही आहे की नाही?”
त्यावर मी म्हटलं, “तसं पुण्यात आहे की नाही, याची मला खरं तर कल्पनाच नाही, कारण ना मला कुणाचा हेवा वाटतो, ना माझा कुणी हेवा करतं. आपला कुणी हेवा करावा असं माझ्याकडे काहीच नाही आणि मला कुणाचा हेवा वाटावा, असं दुसऱ्या कुणाकडे नाही. ‘सर्वेपि सुखिन: सन्तु’, हा सुखी जीवनाचा मंत्र मी अंगिकारलेला आहे.
जर एखाद्या व्यक्तीने खरंच स्पृहणीय कामगिरी केली असेल, तर आपण कौतुक करण्यात आखडता हात कशासाठी घ्यायचा? तुम्हाला काय वाटतं… ?
लेखिका : ## लीना सोहोनी