सौ. उज्ज्वला केळकर
मनमंजुषेतून
☆ ऐसी कळवळ्याची जाती – भाग -2 ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
(मागील भागात आपण पहिले, संध्याकाळी बाजार उठायच्या वेळी आई बाजारात जाई. खंडून भाजी आणे. त्याचे वाटे घालत असू. शेजारी-पाजारी विकत देत असू. त्यातच आमची भाजी सुटायची. त्या काही वर्षात आम्ही तांदूळ घरात आणलाच नाही. रेशनवर कण्यांचं पोतं मिळे. कण्यांचाच भात घरात होई.’) आता इथून पुढे )
नाना गेल्यानंतर ओढगस्तीची दोन वर्षे सरली. दादा मॅट्रिक झाले आणि सगळ्यांच्या सांगण्यावरून कॉलेज शिक्षणासाठी पुण्याला गेले. ते होते ४३ साल. पुण्याला त्यांचे एक दूरचे नातेवाईक दातार यांच्याकडे ते राहिले. कॉलेजची पहिल्या वर्षाची परीक्षा झाली. मग सुट्टीत दोन महिने त्यांनी देहूरोडला नोकरी केली. मग त्यांनी विचार केला, ‘नोकरीच करायची, तर पुण्यात कशाला? सांगलीलाच जाऊ या.’ मग ते पुना ४४साली सांगलीला परतले. इथे त्यांना माधवनगर कॉटन मिल्सला नोकरी लागली. दरम्यान ते कॉलेजची परीक्षा पास झाले. इथेही त्यांनी विलिंग्डन कॉलेजला नाव घातले, पण नोकरी आणि कॉलेज दोन्ही जमेना, तेव्हा त्यांनी शिक्षणाचा विचार सोडून दिला. माधवनगर कॉटन मिल्सला त्यांची ५० वर्षे नोकरी झाली.
४६ साली दादांना कंपनीच्या व्यवस्थापनाने, माधवनगर येथे कंपनीच्या घरात रहायला येण्याविषयी विचारले. त्यांनी लगेच होकार दिला. तीन खोल्यांचं छोटसं घर . पुढे अंगण. मागे परस. परसात भाजीपाला होऊ लागला. पुढे आपली कार्यनिष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा, दूरदर्शित्व, व्यावहारिक शहाणपण, या गुणांच्या बळावर पदवीधर नसूनही दादा माधवनगर कॉटन मिल्सचे मॅनेजर झाले. दादांना नोकरी लागली. घरात निश्चित असे उत्पन्न येऊ लागले आणि कुटुंबाची विपत्तीतून सुस्थितीकडे वाटचाल सुरू झाली.
परिस्थिती कशीही असली, तरी कोंड्याचा मांडा करायची हातोटी आजींना छान साधली होती. माझ्या चुलत वन्स पमाताई म्हणतात, ‘आम्ही भावंड अधून मधून माधवनगरला राहायला जात असू. काकू स्वयंपाक छान करत असे. साधं पिठलं भाकरीच, पण ती इतकी चविष्ट होत असे, त्याची चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे. मला तर वाटतं, तिच्या हातात अन्नपूर्णेचा वास होता. ‘ कुणाला त्यांनी केलेल्या खव्या-रव्याच्या साटोर्या आठवतात, तर कुणाला त्यांनी केलेल्या साध्या भाकरीचा कुस्करा.
सगळं ठाक-ठीक होतं म्हणेपर्यंत आणखी एक आपत्ती येऊन ठाकली. मात्र ही आपत्ती केवळ केळकर कुटुंबावरच आलेली नव्हती, तर सार्या गावावर, किंबहुना सगळ्या महाराष्ट्रावर ही आपत्ती ओढवली होती. ४८ साली गांधीजींचा खून झाला. तो करणारा ब्राम्हण. त्यामुळे ब्राम्हणांच्या विरुद्ध वातावरण अतिशय तापले. ब्राम्हण अन्य समाजाच्या रोषाचेच नव्हे, तर द्वेषाचेही बळी ठरले. त्या निमित्ताने लुटालूट झाली. जाळपोळ झाली.
माझे दीर दादा संघाचे असल्यामुळे त्यांना अटक करून तुरुंगात ठेवले. (कदाचित त्यामुळे ते सुरक्षितही राहिले.) गावात काही जणांची धिंड काढली गेली. त्यांना मारण्याचाही जमावाचा मनसुबा असावा, पण तेवढ्यात गावात मिल्ट्री आली आणि लोक वाचले. दादा तुरुंगात, उषाताई, कुसुमताई, सुशीताई, बाळू ही मुले घरात. माझ्या सासुबाईंची, आजींची ही सत्वपरीक्षाच होती. पण मोठ्या धीराने त्यांनी ते दिवस काढले. त्यांचा माणसाच्या चांगुलपणावर विश्वास होता. त्यांच्या शेजारी देशिंगचे घोरपडे म्हणून रहात होते. जे काही घरात किडूक मिडूक होतं, ते आजींनी गाठोड्यात बांधलं आणि विश्वासाने घोरपड्यांकडे सुपूर्त केलं. घर लुटलं गेलं, जाळलं गेलं, तरी निदान तेवढं तरी वाचावं, म्हणून धडपड. घोरपडे मंडळींनी तितक्याच खबरदारीने त्याचं जतन केलं आणि सगळं वातावरण निवळल्यावर ते आजींच्या स्वाधीन केलं. माणसांवर असलेला आजींचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. आमचं घर जाळायला लोक आले होते, पण तेवढ्यात कर्फ्यू लागला आणि आमचं घर वाचलं. नंतर लगेचच दादाही तुरुंगातून सुटून आले. त्या काळाबद्दल आणि त्यावेळच्या वातावरणाबद्दल ऐकलं की मला रविंद्रनाथ टागोरांचं एक मुक्तकाव्य आठवतं. त्यांनी लिहिलंय ,
‘किती कोमल असतो माणूस आणि किती क्रूर असतात माणसं. ‘
निपाणीला आजींचे भाऊ रहात. पंचनदीकर वैद्य म्हणून ते सुप्रसिद्ध होते. पडत्या काळात त्यांचीही आजींना खूप मदत झाली होती. आमचं सगळं कुटुंबच त्यांच्याबद्दल मनात आदर आणि कृतज्ञता बाळगून होतं. त्यांचे हे भाऊ माझ्या लग्नानंतरही माधवनागरला आमच्या घरी खूपदा आलेले आठवतात. माझ्या मनात संशोधक मामा म्हणून त्यांची प्रतिमा रुजलेली आहे. ते आले, की घरी भट्टया लावत. पार्यापासून सोनं करण्याचे त्यांचे प्रयोग चालत. त्यांना हवं असेल ते सगळं, आजी आणि घरातील इतर माणसं तत्परतेने उपलब्ध करून देत. पार्यापासून त्यांना सोने काही मिळवता आले नाही, पण ज्या एकाग्रतेने, तन्मयतेने ते प्रयोग करत, त्याचं आणि त्यांच्या प्रयोगाचं आम्हाला खूप अप्रूप वाटे.
५० साली दादांचं लग्न झालं. आजींच्या हाताखाली सून आली. हाताखाली सून आली असं म्हणण्यापेक्षा आजींनी कोठीची किल्लीच सुनेकडे सोपवली. म्हणजे आमच्या घरी कोठीला काही कुलूप नव्हतं, पण पुरवणं-उरवणं, ठेवणं- टाकणं, देणं- घेणं, मुलींची माहेरपणं, हे सगळे व्यवहार त्यांनी मुलाच्या आणि सुनेच्या हाती सोपवले आणि घरात राहूनही त्या वानप्रस्थात असल्यासारख्या राहिल्या. गरज असेल तेव्हा स्वैपाकघरात मदत, एरवी त्यांचे पोथीवाचन वगैरे चाले. भाजी आणणे, निवडणे, चिरणे ही कामे मात्र त्या मोठ्या हौसेने करत. बाहेरच्या सोप्यावर बसून त्यांचे हे काम चाले. बाहेर कुणी आलं गेलं तर लक्ष राही. तिथेच बसून त्या पोथी, ज्ञानेश्वरी, गाथा, दासबोध वगैरे वाचायच्या. देवळात भजन –कीर्तन असे, तेव्हा देवळात जात.
सुनेकडे आजींनी सगळी जबाबदारी सोपवली खरी, पण त्यावेळी असेही ठरले की घरातील मिळवत्या व्यक्तीने दरमहा आजींना शंभर –दीडशे रुपये द्यायचे. मला नोकरी लागल्यावर मीही द्यायला लागले. या पैशांचा खर्च त्यांनी कसाही करावा. त्याचा त्यांना कुणी हिशेब मागू नये. त्याचं काय केलं हे विचारू नये. त्यातून त्यांचा देव-धर्म होई. कुणा गरजू व्यक्तीला पैसे द्यावेसे वाटले, तर त्यातून दिले जात. नातवंडांना त्या पैशातून बक्षिसे मिळत. सणावाराला जो नमस्कार करे, त्याला आशीर्वादासोबत एक रुपया मिळे. आजही आपण आर्थिक स्वातंत्र्याबद्दल चर्चा करतो. ६०- ७० वर्षापूर्वी आमच्या आजींनी ते मिळवलं होतं. मला ही गोष्ट खूप महत्वाची वाटते.
माहेरवाशिणी असोत, किंवा नाती, भाच्या वगैरे असोत, देण्या-घेण्याचे व्यवहार त्यांनी केव्हाच दादा-वहिनी कडे सोपवले होते, पण घरातल्या देण्या-घेण्याव्यतिरिक्त आजींचा एक स्वतंत्र खाऊ असे. तो म्हणजे, शेवया, साबुदाण्याच्या पापड्या, तसेच उकडलेले बटाटे, आणि भिजवलेला साबुदाणा घालून केलेल्या व वाळवलेल्या चकल्या असा तो खाऊ असे. सकाळी शेवयाचं पीठ भिजवायचं किवा साबुदाणा भिजवायचा आणि बटाटे उकडायचे. दुपारी जेवणं झाली की आजींचा हा कारखाना सुरू होई. हा लघूद्योग पैशासाठी नसे. बनवणे आणि घरी आलेल्यांना तो खाऊ म्हणून वाटणे हा आजींचा छंद होता. आम्ही घरातल्या दोघी जणी त्यांच्या हाताखाली असूच. मुली-नातींना आणि आल्या-गेल्यांना हा खाऊ देताना, त्यावर त्यांचं भाष्य असे, ‘आपापली दूध-साखर घाला आणि खा’ किंवा ‘आपापल्या तेला-तुपात तळा आणि खा.’ या शेवया, पापड्या नि उपासाच्या चकल्या केवळ माहेरवाशिणींकडेच नव्हे, तर मी माहेरी निघाले की माझ्या माहेरीही आजींनी त्या दिलेल्या असत. माझ्या वडलांना डायबेटीस होता. त्यांच्यासाठी गव्हाच्या पोह्यांचा चिवडा आणि गव्हाचे पोहे घेऊन जा, असं त्यांचं खास सांगणं असे. एरवी मुली माहेरून आल्या की काही ना काही घेऊन येत, अशी रीत होती. आमच्या घरी उलटं होतं. आम्ही माहेरी जाताना सासरहून काही ना काही घेऊन जात असू. मुली आणि सुना यात त्यांनी कधी फरक केला नाही. मुलीही माहेरी आल्या आणि हात-पाय पसरून गप्पा मारत बसल्या असं कधी झालं नाही. आजी म्हणत, ‘कामावे ते सामावे.’
क्रमश: – भाग २
© सौ उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170ईमेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈