डाॅ. निशिकांत श्रोत्री
मनमंजुषेतून
☆ शब्द देवते… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
जीवन हा प्रचंड रंगमंच आहे. या मंचावर मनुष्य अनेक अनुभूती घेत असतो, अनुभव घेत असतो.
शास्त्रीय ज्ञानानुसार एकदा अनुभवलेले मनुष्याच्या स्मरणात कायम राहते. तथापि मानवी स्वभावानुसार मात्र काही प्रसंग त्याला कधीच विसरू नये असे वाटते तर काहींची आठवण कधीच येऊ नये असे वाटत असते. त्यातही काही घटना तर अकल्पित असतात, अविश्वनीय असतात, अद्वितीय असतात.
माझ्याही आयुष्यात अशीच एक अभूतपूर्व घटना ६ जानेवारी २०२३ रोजी घडली. काय घडले ते कथन करण्यापूर्वी, तिचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी आधी मी थोडी पूर्वपीठिका सांगतो.
अठ्ठेचाळीस वर्षांपूर्वी मला खेळतांना एक अपघात झाला होता. दुर्घटनेत माझा उजवा डोळा अधू झाला होता. तरीही मी जवळजवळ पंचवीस वर्षे व्यवस्थित शस्त्रक्रिया करू शकत होतो, प्रसूति करू शकत होतो. नंतर मात्र त्या डोळ्याला मोतीबिंदू, काचबिंदू वगैरे त्रास सुरु झाले. त्यावर तीन-चार शस्त्रक्रिया करायला लागल्या आणि अखेरीस त्याचे नेत्रपटल आतून फाटले. लगेच केलेल्या शस्त्रक्रियेमुळे डोळा आणि दृष्टी वाचली, पण ते नावापुरतेच ! मला उजव्या डोळ्याने समोरची माणसे देखील ओळखता येत नाहीत.
तथापि माझा डावा डोळा मात्र विलक्षण कार्यक्षम होता. उजवा डोळा इतकी वर्षे अधू असून देखील मी पन्नासपेक्षा अधिक पुस्तके लिहू शकलो…. अन् अचानक गेले महिना-दीड महिना मला साधे वर्तमानपत्र देखील वाचता येईना झाले, पानात आलेली मिरची देखील ओळखता येईना.
नेत्रपटल विशारद नेत्रतज्ज्ञाला दाखवायला गेलेलो असतांना तपासणीच्या आधी माझ्या डोळ्यात वरचेवर औषध टाकून मला डोळे बंद करून बसविले होते. माझ्या या डोळ्याचे काय होणार या विचाराने मी विलक्षण अस्वस्थ झालो होतो. आता हाही डोळा गेला तर मी करायचे काय – कसे वाचायचे, कसे लिहायचे आणि कसे जगायचे? माझ्या मस्तकात विचारांचे प्रचंड मोहोळ उठले होते. सूरदास व्हायची भीती मला भेडसावत होती. सूरदासांनी उदंड काव्य केले खरे; पण कुठे त्यांच्यासारखे प्रासादिक व्यक्तिमत्व आणि कुठे माझ्यासारखा सामान्य माणूस ! ज्या शब्दांची आणि अक्षरांची मी आयुष्यभर सेवा केली तेच आता मला पारखे होणार की काय या विचाराने माझे डोके फुटायची वेळ आली; मस्तकात गरगरायला लागले. अखेरीस मी तेथील एका डॉक्टरांकडे एक कागद मागितला. तिला वाटले मला डोळे पुसायला कागद हवा आहे. तिने मला एक टिश्यू पेपर आणून दिल्यावर मी तिला सांगितले, ‘मला लिहायला कागद हवा आहे.’
आणि माझ्या आयुष्यातील ती अद्वितीय अनुभूती मला आली. बंद डोळ्यांनी मी शब्ददेवतेची आळवणी करणारी कविता लिहिली.
शेजारीच बसलेल्या माझ्या मुलाच्या तोंडून शब्द बाहेर पडले, ‘आम्हाला उघड्या डोळ्यांनी देखील इतके सरळ रेषेत लिहिता येणार नाही, तितके सुबक तुम्ही बंद डोळ्यांनी लिहिलेत !’
… ही अनुभूती आणि ती कविता आज मी माझ्या समस्त वाचकांसाठी घेऊन आलो आहे :
☆ शब्ददेवते… ☆
☆
शब्ददेवते रुसू नको गे अपुल्या भक्तावरी
लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||ध्रु||
☆
कुवत जशी मी सजवीत आलो अलंकार चढवुनी
कथा कविता कादंबरीना नटविले रूपांनी
अगतिक झालो वयोपरत्वे दृष्टी झाली अधुरी
लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||१||
☆
सादाविले तुम्हाला येता ओथंबुन भाव मना
निराश कधी ना केले माझ्या भावभावनांना
असे कसे मी सांडू माझ्या कवीकल्पनांना तरी
लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||२||
☆
देवी शारदे कृपा करावी जागृत ठेवी कविता
अमर करी मम साहित्याला देऊनिया शाश्वता
सारे सोडून गेले तरीही ते पावो अक्षरी
लीन दीन मी शरण पातलो तुझिया चरणांवरी ||३||
☆
© डॉ. निशिकान्त श्रोत्री
संपर्क – एम.डी., डी. जी. ओ., श्रोत्री निवास, ४०/१-अ, कर्वे रस्ता, पुणे ४११ ००४
मो – ९८९०११७७५४ ईमेल – [email protected].
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈