? मनमंजुषेतून ?

☆ केसरीया☆ प्रस्तुती – कौस्तुभ केळकर नगरवाला ☆

नेने आजी आणि नेने आजोबा… अख्खी गल्ली त्यांना याच नावाने ओळखते.

दोघंच दोघं. एक दुजे के लिये…

 

मी… मी कोण ? मी शामलाल मिठाईवाला. गेली चाळीस वर्ष मी या दोघांना ओळखतो..

बिल्डींगच्या खाली माझं दुकान. वरच्या मजल्यावर नेन्यांचा फ्लॅट. बिल्डींगच्या जन्मापासूनचे आम्ही सोबती.

कुणी विचारलं तर मी बिनदिक्कत सांगतो… नेने माझे नातेवाईक आहेत म्हणून. आमचं नातं अगदी जवळचंय.

 

काय सांगत होतो ?—- आमच्याकडची जिलेबी पुण्यात नं.1. चाखून बघाच एकदा.

नेन्यांकडचा प्रत्येक ‘आनंद’ आमच्याकडच्या जिलेबीच्या साथीनं सेलीब्रेट झालाय.

नेन्यांच्या शर्वरीचा जन्म… शर्वरीचा दहावीचा रिझल्ट… ती सी. ए. झाल्याचं सेलीब्रेशन… तिला लागलेली पहिली नोकरी… तिचं लग्न… नेने ‘आजोबा’ झाल्याची गोड बातमी.

आमच्याकडच्या जिलबीनंच गोड झालाय .. प्रत्येक आनंदसोहळा.

 

गंमत सांगू ?

मला मुलगा झाला तेव्हाची गोष्ट. माझ्याकडचीच जिलबी विकत घेऊन, नेन्यांनी माझंच तोंड गोड केलंय.

आता बोला ?—- शरूचं सासर तिकडे इंदूरला.. ती इथं आली की ती घरी जायच्या आधी इथली गरमागरम जिलेबी घरी पोचायची.

 

मागच्या वर्षीची गोष्ट. नेने घाईघाईने आले… ” शामलाल, सुटलास तू लेका. जिलेबीचे दोन घाणे कमी काढ उद्यापासून… हा काय ताजा ताजा रिपोर्ट घेऊन आलोय. तो डाॅक्टर गोडबोल्या बोंबलतोय. मधुमेह झालाय या नेन्याला….. पोरकी झाली रे जिलेबी तुझी…”

 

काय सांगू ? खरंच पोरकी झालीय जिलेबी आमच्याकडची. नेन्यांनी गोड बंद केलंय… बंद म्हणजे बंद…

एक कण सुद्धा नाही… नेन्या पक्का गोडखाशी. आमच्याकडची जिलेबी त्याचा जीव की प्राण.

खरं सांगू ? आमचा जीव नेन्यात अडकलेला. किलोकिलोने जिलेबी खपते रोज….. तरीही…गोड नाही लागत आम्हाला. नेन्यानं कसं काय कंट्रोल केलं कुणास ठाऊक ?

 

सांगतो…… 

सोप्पय एकदम. नेन्याला डायबेटिस निघाला आणि… त्या दिवसापासनं वहिनींनी गोड खाणं बंद केलं.

नेन्याचा जीव वहिनींमधे अडकलेला. आपोआप गोड बंद झाला. आता शरू आली तरी…इंदूरचा गजक आमच्याघरी पोचतो. आमच्याकडची जिलबी मात्र….खरंच आमच्याकडच्या जिलबीला वाली राहिला नाहीये…

 

मागच्या फेब्रुवारीतली गोष्ट… नेनेवहिनी कितीतरी दिवसांनी दुकानी आलेल्या. फरसाण, ढोकळा वगैरे ‘अगोड’ खरेदी… इतक्यात डाॅ. गोडबोले आले तिथं… डाॅ. गोडबोल्यांचं क्लिनिक पलिकडच्या गल्लीत.

तेही आमचं घरचं गिराईक.. .डाॅ.मोतीचूराचे लाडू घ्यायला आलेले….. 

“डाॅ., वर्ष झालंय. यांनी गोडाला हात नाही लावलाय. आज एखादी जिलबी खाल्ली तर चालेल काय ?

शरूचा वाढदिवस आहे हो आज”

“चालतंय की. फक्त एकच अलाऊडंय.” डाॅक्टर ऊवाच.

‘वहिनी, तुम्ही डाॅक्टरांना घेऊन वर जा. मी गरमागरम जिलबी घेऊन आलोच.’.. भारी मजा आली.

वहिनींनी नेन्यांना जिलबीचा घास भरवला. आणि नेन्यांनी वहिनींना… अगदी लग्नात भरवतात तसा.

डोळे भरून मी हा सोहळा बघितला. राम जाने कैसे…माझ्याच डोळ्यांचा नळ सुरू झाला.

शरू तिकडे इंदूरला…. .मी, डाॅक्टर, नेने आणि वहिनी. आम्ही तिचा वाढदिवस इथे सेलीब्रेटला.

सच्ची बात कहता हूँ.. आमच्याकडची जिलबी…. आजच्या इतकी गोड कधी लागलीच नव्हती.

तोच गोडवा जिभेवर घोळवत, मी आणि डाॅक्टर खाली आलो.

‘श्यामलाल तुझं तुझ्या बायकोवर प्रेम आहे ?”

“हो.. आहे तर..”

‘मग सांग बरं , प्रेमाचा रंग कुठला असतो ?’

…. पागल झालाय हा डाॅक्टर साला. काहीही बोलतोय.

” प्रेमाचा खरा रंग केसरीया… तुझ्याकडच्या जिलेबीसारखा..’

.. मला काही कळेना.

“तुला या नेन्याचं सिक्रेट सांगतो. डायबेटीस नेन्याला नाही, वहिनींना झालाय. वहिनींना ठाऊक नाहीये हे.

दोघांनी गोड सोडलंय, तरीही संसार ‘गोडाचा’ झालाय…. “

डाॅक्टर ओल्या डोळ्यांनी हसत हसत निघून गेला.

 

पटलं….

प्यार का रंग कौनसा ?

केसरीया….

या व्हॅलेन्टाईनला याच तुम्ही….. वहिनींसाठी आमच्याकडची केसरीया जिलेबी न्यायला. वाट बघतोय…

 

प्रस्तुती –  कौस्तुभ केळकर नगरवाला

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments