मनमंजुषेतून
☆ “बॅग कशी भरायची?…” लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री वीणा छापखाने ☆
आयुष्याच्या परतीच्या प्रवासासाठी….
बॅग कशी भरायची ते *आता मला कळले आहे ! *
फापट पसारा आवरून सारा ,
आता सुटसुटीत व्हायचं आहे !
याच्यासाठी त्याच्यासाठी , हे हवं , ते हवं
इथे तिथे – जाईन जिथे , तिथलं काही नवं नवं
हव्या हव्या चा हव्यास आता प्रयत्नपूर्वक सोडायचा आहे,
*बॅग हलकी स्वतः पुरती * आता फक्त ठेवायची आहे !
बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे !
अपेक्षांच्या ओझ्याखाली आजवर त्रस्त होतो
*आयुष्याच्या होल्डॉल मध्ये *काय काय कोंबत होतो !
किती बॅगा किती अडगळ ! साठवून साठवून ठेवत होतो
काय राहिलं, कुठे ठेवलं आठवून आठवून पाहत होतो
त्या त्या वेळी ठीक होतं आता गरज सरली आहे,
कुठे काय ठेवलंय ते ते *आता विसरून जायच आहे *
बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे !
खूप जणांनी खूप दिलं .. सुख दुखाःचं भान दिलं
आपण कमी पडलो याचं शल्य आता विसरायचं आहे !
मान, अपमान, ‘मी’ , ‘तू’ यातून बाहेर पडायचं आहे !
बॅग कशी भरायची ते *आता मला कळले आहे ! *
आत बाहेर काही नको .. आत फक्त एक कप्पा,
जना – मनात एकच साथी सृष्टी करता एकच देवबाप्पा !
सुंदर त्याच्या निर्मितीला डोळे भरून पाहायचं आहे !
रिक्त -मुक्त होत होत अलगद विरक्त होत जायचं आहे .
… बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे…
… बॅग कशी भरायची ते आता मला कळले आहे…
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सुश्री वीणा छापखाने
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈