सुश्री सुलू साबणे जोशी
☆ ‘शुद्ध भाषा व भाषाशुद्धी’ – श्री दिवाकर बुरसे ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆
मराठी मातृभाषादिनाच्या निमित्ताने…..
फेसबुक, व्हाॕटस् अॕपच्या विविध समूहावर मराठी, काही हिंदी, तर काही इंग्रजी भाषेतील टपाले पाठविली जातात. ती स्वलिखित असतात किंवा अग्रेषित असतात. वाचनात येणाऱ्या अशा लेखनात अनेक दोष आढळतात.
स्वलिखित वा अग्रेषित कोणचीही लेखने असोत, त्यातली बरीच अशुद्ध असतात असे सामान्य निरीक्षण आहे.
आतपुढ (आले तसे पुढे ढकलले) ही व्हाॕटस् अॕप संस्कृती असल्यामुळे असे सदोष लेख या समूहावरून त्या समूहावर आणि जगभर फिरत असतात.
आपण पाठविलेले लिखाण शुद्ध असावे असे ते टपालणाऱ्याला वाटत नाही का? येवढेच काय, आपण अशुद्ध लिहितो हेही काहींना कळत नसेल तर हे दुर्दैव म्हणायचे.
आपली भाषा अशुद्ध, अपरिपक्व आहे याची जाण व खंतही कोणाला वाटत असल्याचे दिसत नाही. माझ्याप्रमाणे ज्या कोणाला हे जाणवत असेल, त्यांना याविषयी बोलण्याचा संकोच वाटतो म्हणून कोणीच बोलत नसावे.
त्याने होतेय काय, दोष तसेच राहतायत. सदोष लेखन तसेच चालू रहाते, फिरत रहाते. ‘उगाच वाईटपणा नको’ म्हणून जे व जसे येते ते तसेच स्वीकारलेही जाते. पुढे पुढे ‘आहे तेच योग्य आहे’ असे समजण्यापर्यंत मजल जाते !
याला काय करायचे ! आपण अशुद्ध भाषा स्वीकारायची की आपली भाषा, मग हिंदी असो, इंग्रजी असो, वा मराठी, ती शुद्ध लिहायची ते आपणच ठरवा.
लेखकाने मांडलेला विचार चांगला असूनही त्याची अशुद्ध भाषा खटकते. सुवासिक केशरी भातात अचानक दाताखाली खडा लागून भोजनाचा रसभंग व्हावा तसेच काहीसे वाटते !
समूहातील सर्वच सभासद लेखकांनी या विषयाकडे जरा गंभीरपणे ध्यान द्यावे असे सुचवावेसे वाटते. साहित्य अग्रेषित असले तरी ‘काॕपी-कट-पेस्ट’ सुविधा वापरून ते अचूक, निर्दोष करून मग पुढे पाठवावे.
लेख लिहिताना, ‘घाईघाईत टंकित करताना एखादी चुकीची कळ दाबली जाते, एखादे अक्षर राहून जाते’ इ. कारणे सांगून वेळ मारून नेणे, ‘वाचकांनी समजून घ्यावे, सांभाळून घ्यावे’ असे म्हणणे, आपले आहे तेच पुढे दामटणे, हे अयोग्य आहे. मला सांगा, वाचकांनी नेहमीच का अशुद्ध वाचावे? का तुम्हाला सांभाळून घ्यावे? आपण लेख पाठवण्यापूर्वी तो काळजीकाट्याने तपासायला नको का? त्याला कितीसा वेळ लागतो? त्यासाठी थोडे कष्ट पडतील, पण ते घ्यावेत. भाषा निर्दोष करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
‘कळतंय ना मला काय म्हणायचंय ते, मग झालं तर’, ‘उसमे क्या है’, ‘उससे क्या फरक पडता है’, ‘चलता है याsर’, ‘टेक इट ईझी’ ही वृत्ती घातक आहे. हा दुर्गुण आहे. या वृत्तीमुळेच जागतिक स्तरावरही इतर राष्ट्रांच्या तुलनेत आपण भारतीय अनेक क्षेत्रात खूप मागे राहिलो आहोत. गुणवत्तेचा, परिपूर्णतेचा, अचूकतेचा, निर्दोषतेचा, नेमकेपणाचा ध्यास असावा. ‘फर्स्ट शाॕट ओके’, ‘झीरो मिस्टेक’ हे आपले उद्दिष्ट असायला हवे, हा आपला ध्यास असावा. ते कठीण असले, सहजसाध्य नसले तरी अशक्य नाहीये, निश्चित प्रयत्नसाध्य आहे.
अर्थात त्यासाठी मुळात स्वतःला पुरेसे भाषाज्ञान असले पाहिजे. आणि केवळ भाषेविषयीच नव्हे तर जीवनाच्या सर्वच क्षेत्रात या मूल्यांचा आग्रह असायला हवा. ‘क्वालिटी लाईफ’साठी त्याची नितांत अवश्यकता आहे.
मराठी तर आपली मातृभाषा आणि हिंदी राष्ट्रभाषा (?). त्यांच्या उपयोजनेतही किती परकीय शब्द, किती ऊर्दू , किती इंग्रजी शब्द!
इंग्रजीचे म्हणाल तर ती परकी भाषा. पण व्यवहारासाठी आवश्यक. आम्हाला तीही धड येत नाही. तिथेही गोंधळ. सदोष वाक्यरचना, सदोष शब्दप्रयोग आणि शब्दांची चुकीची स्पेलिंगे. संगणकीय व्यवहारात अनेक शब्दांची रूपे बदलली गेली आहेत. तिथे ते क्षम्य आहे. पण ती रूपे लेखनात का आणायची? उदा. And ऐवजी नुसताच ‘n’ , please ऐवजी ‘plz’ वगैरे. आपल्याला एक तरी भाषा शुद्ध यावी असे का वाटू नये? भाषेकडे येवढे दुर्लक्ष का व्हावे? भाषांविषयी येवढी अनास्था का असावी?
आपली दैनंदिन विचारविनिमयाची भाषा लालित्यपूर्ण नसली तरी निदान शुद्ध असावी व नेमकी असावी, येवढी तरी अपेक्षा ठेवायला काय प्रत्यवाय आहे?
एका हिंदी लेखातील अवतरण…
… ‘हम प्रतिदिन अगणित उर्दू, अंग्रेजी शब्द प्रयोगमें लेते हैं। भाषा बचाइये, संस्कृति बचाइये। जांच करें कि आप कितने उर्दू या अंग्रेजीके शब्द बोलते है। हर हिंदीप्रेमी इस लेखको पढ़नेके बाद अपने मित्रोंके साथ साझा अवश्य करे। ‘
अवतरण समाप्त
आपण मराठीतही अनेक उर्दू व इंग्रजी शब्द उपयोगात आणतो. या इंग्रजी, उर्दू, फारसी शब्दांना आपल्या मराठी, हिंदीत काही पर्यायी शब्द नाहीत का? नसलेच तर आपण ते निर्माण करू शकत नाही का? आपल्या भारतीय भाषा विशेषतः आपली मराठी मातृभाषा इतकी दरिद्री आहे का, की त्यात पर्यायी शब्दनिर्मिती अशक्य वाटावी? तेव्हा मराठी भाषिकांनीही अवश्य विचार करावा, ह्या सूचनेचा.
अखेर आपली भाषा शुद्ध, सुसंस्कृत, प्रगल्भ असावी, असे ती बोलणाऱ्या वा लिहिणाऱ्या व्यक्तीला स्वतःलाच वाटायला हवे. त्याला मातृभाषेविषयी प्रेम, आस्था, अभिमान वाटायला हवा. अर्थात हे मी एकट्याने म्हणून काय उपयोग?
समूहावर येणाऱ्या लेखांच्या भाषेविषयीची ही माझी अतिसामान्य निरीक्षणे व विचार मी चिंतनासाठी वाचकांसमोर ठेवून आता इथेच थांबणे उचित समजतो.
व्याकरणाविषयी म्हणजे -हस्व-दीर्घ, ‘न’ आणि ‘ण’ मधील भेद किंवा घोळ, ‘स’, ‘श’, आणि ‘ष’ यातील भेद, काळ, लिंग, विभक्ति, वचने, शब्दप्रयोग, म्हणी आणि वाक्प्रचार, शब्दसंग्रह इ. विषयांवर आवश्यकतेनुसार स्वतंत्रपणे बोलू. तेही ते समजून घेण्याची, वाचण्याची, आपली भाषा शुद्ध असावी अशी कुणाची इच्छा असली, कुणाला त्याची आवश्यकता वाटली तर ! तो पर्यंत नमस्कार !!
लेखक:- दिवाकर बुरसे, पुणे
व्हाॕटस् अॕपः ९२८४३००१२५
संग्राहिका : सुश्री सुलू साबणे जोशी.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈